देखा है पहली बार साजन कि आंखो प्यार…..
साठ आणि सत्तरच्या हिंदी चित्रपट संगीताचा चाहता जसा एक रसिक वर्ग आहे तसाच एक नव्वदच्या संगीताचा देखील आहे. नव्वदच्या दशकातील संगीताची जादू काही वेगळीच होती. खूप वैविध्यपूर्ण प्रयोग या काळामध्ये झाले. मुख्य म्हणजे अनेक नवीन संगीतकार, नवीन गीतकार आणि नवी गायक मंडळी या क्षेत्रात आली. त्यामुळे संगीताला एक फ्रेश फ्लेवर होता. (saajan)
आपला भारत देश देखील या दशकात नव्याने कात टाकून प्रगतीची नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करत होता. त्याच काळात भारतीय चित्रपट संगीतात देखील खूप वेगळे असे चांगले प्रयोग होत होते. या नव्वदच्या दशकातील एक महत्त्वाचा म्युझिकल हिट सिनेमा होता ‘साजन’(saajan). लॉरेन्स डिसूजा दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीत नदीम, श्रवण यांनी केले होते. चित्रपटाची गाणी समीर अंजान यांनी लिहिलेली होती. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात वेगवेगळ्या व्हर्शनची एकूण तब्बल दहा गाणी होते. पण तुम्हाला माहिती आहे का? या सिनेमात एक गाणे अक्षरशः चित्रपट पूर्ण झाल्यानंतर टाकले गेले होते! अगदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी हे गाणे चित्रपटामध्ये इन्सर्ट करण्यात आले. कोणते होते ते गाणे? काय होत हा किस्सा?
जेव्हा नदीम, श्रवण हा चित्रपट स्वरबध्द करत होते तेव्हा गीतकार समीर अंजान कायम म्हणत होते, ”मला काहीतरी कमी वाटतेय! या इतक्या सुंदर संगीतप्रधान सिनेमात टायटल सॉंग नाही. ते असायला हवे होते.” पण तसे काही झाले नाही. शीर्षक गीता शिवायच चित्रपट पूर्ण झाला. रिलीजची तारीख देखील ठरली. त्याच काळात एकदा समीर, नदीम आणि श्रवण हे तिघेजण संध्याकाळी जेवायला एका ठिकाणी गेले होते. तिथे गेले असताना अचानक समीर, नदीम श्रवण यांना म्हणाले, ”माझ्या मनात एक ओळसारखी उमटत आहे. आपण त्यावर गाणे बनवूया!” संगीतकार म्हणाले, ”कोणती लाईन?” त्यावर समीर यांनी सांगितले, ”देखा है पहली बार साजन की आंखो मे प्यार!”
नदीम यांना ती ओळ आवडली. लगेच नदीमने ती गुणगुणायला सुरुवात केली आणि श्रवण त्याला चाल देखील लावली. समीर म्हणाला, ”आता हे गाणे पूर्ण करू आणि आपण ‘साजन’(saajan) या चित्रपटाचे टायटल सॉंग म्हणून घेवूत.” त्यावर नदीम म्हणाला, ”आता कसे शक्य आहे? आता चित्रपट पूर्ण झाला आहे. सेन्सॉरकडे पाठवायला तयार आहे आणि पुढच्या महिन्यात तो रिलीज देखील होतो आहे. आता शक्य नाही.” “तरी देखील प्रयत्न करूयात” असे समीर म्हणाला.
आता फक्त गाण्याचा मुखडा आणि चाल बनली होती. समीरने तिथेच त्याचे अंतरे लिहून काढले. संगीतकार नदीम यांनी लगेच रात्रीच चित्रपटाची निर्माते सुधाकर बोकाडे यांना फोन लावला आणि सर्व घटना सांगितल्या. ते म्हणाले, ”आता कसं शक्य आहे” आम्ही तर चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहोत.” त्यावर नदीम म्हणाले, ”ते मला माहित नाही. पण आम्ही या गाण्याचे उद्या रेकॉर्डिंग करत आहोत. रेकॉर्डिंगचा सर्व खर्च आम्ही करून तुम्ही काही काळजी करू नका. जर तुम्हाला आणि कलाकारांना गाणे आवडले तरच सिनेमात घ्या. अन्यथा हे गाणे आम्ही दुसऱ्या कुठल्यातरी चित्रपटासाठी वापरतो.”
=======
हे देखील वाचा : गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!
=======
सुधाकर बोकाडे यांना तो पर्याय आवडला नंतर लगेच अलका याज्ञिक आणि एस पी बालसुब्रमण्यम यांना बोलवून घेतले आणि गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. या रेकॉर्डिंगला सलमान खान आणि माधुरी दीक्षित देखील उपस्थित होते. सलमानला ते गाणे प्रचंड आवडले तो म्हणाला, ”आपण लगेच या गाण्याचे शूट करू. आजच्या आज उटीचे तिकीट बुक करून टाका!” म्हणजे जे गाणे २४ तासापूर्वी तयार देखील नव्हते त्याचे रेकोर्डिंग देखील पूर्ण झाले!
अशा पद्धतीने दोन दिवसात सर्व क्रू मेम्बर्स उटीमध्ये दाखल झाले आणि दोन दिवसात गाण्याचे शूट होऊन सर्व मंडळी मुंबईत परत आली. चित्रपटात योग्य ठिकाणी गाणे इन्सर्ट करण्यात आले आणि नंतर चित्रपट सेन्सॉरकडे पाठवण्यात आला आणि ३० ऑगस्ट १९९१ या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणेच हे झटपट तयार झालेले गाणे प्रचंड गाजले. संपूर्ण चित्रपट(saajan) पूर्ण झाल्यानंतर लिहिलेले गाणे नंतर इन्सर्ट करण्यात आले आणि सिनेमाच्या यशात या गाण्याचा देखील मोठा सहभाग राहिला! गाणे होते ‘देखा है पहली बार साजन कि आंखो प्यार…’