……आणि ‘उपकार’ सिनेमातून राजेश खन्नाचा पत्ता कट झाला!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात फार गमतीशीर योगायोग घडतात. कधी कधी कुणाच्या आयुष्यात आलेली संधी गमावल्यामुळे करिअर बरबाद होते तर कधीकधी ती संधी गमावल्यामुळे करियर बहारदार देखील बनते! असाच काहीसा प्रकार अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या बाबत झाला होता. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. राजेश खन्नाला मिळालेली एक भूमिका त्याच्या हातातून निसटली परंतु या निसटलेल्या भूमिकेनेच तो सुपरस्टार बनला! काय होता हा किस्सा? कोणती होती ती भूमिका?
राजेश खन्ना (Rajesh Khanna) चित्रपटात येण्यापूर्वी रंगभूमीवर कार्यरत होता. परंतु त्याला सिनेमात यायचे होते त्या दृष्टीने त्याने प्रयत्न देखील सुरू केले होते. १९६५ साली मनोज कुमार यांचा ‘शहीद’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या सिनेमाचा खास शो त्यांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासाठी दिल्लीत अरेंज केला होता. त्या वेळेस पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना भारतातील शेतकरी आणि सैनिक यांच्यावर चित्रपट काढण्याचे सुचवले. मग काय? मनोज कुमार यांनी दिल्ली ते मुंबई प्रवासातच ‘उपकार’ या सिनेमाची स्टोरी फायनल केली आणि या सिनेमाची स्टार कास्ट त्यांनी लगेच ठरवली.
या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच प्राण या खलनायकाला एका सद्वर्तन असणाऱ्या व्यक्तीची भूमिका दिली होती. या सिनेमात मनोज कुमारची नायिका आशा पारेख होती तर या सिनेमातील एका खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांनी अभिनेता राजेश खन्नाला साईन केले. राजेश खन्ना या चित्रपटात मनोज कुमारच्या भावाची भूमिका करणार होता. राजेश खन्नाला (Rajesh Khanna) अर्थातच खूप आनंद झाला कारण चित्रपटात काम करण्याची ती देखील मनोज कुमारच्या चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. या चित्रपटाच्या अनेक मीटिंगला राजेश खन्ना स्वतः उपस्थित रहात असे.
मनोज कुमार यांनी दिलेल्या एका रेडीओवरील इंटरव्यूमध्ये हा सर्व किस्सा सांगितला होता. परंतु याच काळात राजेश खन्नाने फिल्मफेअर आणि फिल्म प्रोड्युसर असोसिएशन यांनी घेतलेल्या एका टॅलेंट हंट सर्च स्पर्धेत भाग घेतला आणि तिथे त्याचा पहिला नंबर आला! या टॅलेंट हंट स्पर्धेचे जे जज होते ते सर्व नामवंत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक होते आणि त्यांनी सर्वांनी राजेश खन्नाला चित्रपटात नायकाची भूमिका देण्याचे ठरवले! परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आले की राजेश खन्ना (Rajesh Khanna) एका आगामी सिनेमांमध्ये निगेटिव्ह भूमिका करत आहे तेव्हा त्यांनी राजेश खन्नाला एग्रीमेंट दाखवले आणि तो बाहेरच्या कुठल्याही चित्रपटांमध्ये भूमिका करू शकत नाही असे सांगितले. राजेश खन्नाला हा मोठा धक्का होता.
दुसऱ्या दिवशी तो प्रचंड नाराज होऊन राजकमल स्टुडिओमध्ये मनोज कुमार यांना भेटायला गेला. तिथे ‘उपकार’ या सिनेमाचा सेट लावला होता. राजेश खन्नाने एग्रीमेंटचा कागद मनोज कुमार यांना दाखवला आणि त्यांनी रडत रडतच मनोज कुमारला सांगितले की, ”या एग्रीमेंटमुळे मी तुमच्या चित्रपटात काम करू शकत नाही!” मनोज कुमारने तो कागद काळजीपूर्वक पाहिला आणि त्यांनी सांगितले, ”अरे मित्रा तुला खूप मोठी संधी मिळते आहे. अभिनंदन. हे सर्व निर्माते दिग्दर्शक बॉलीवूडचे ख्यातनाम व्यक्ती आहेत. तेव्हा त्यांच्याकडेच काम करणे जास्त योग्य आहे. माझ्याकडेची तुझी खलनायक भूमिका मी दुसऱ्या कुठल्यातरी कलाकाराला देऊ शकतो. पण हातात आलेली संधी सोडू नकोस. गो अहेड. ऑल द बेस्ट. तुला फार मोठी संधी मिळालेली आहे!” तरी राजेश खन्ना (Rajesh Khanna) याला मनोज कुमारला असे वाऱ्यावर सोडणे योग्य वाटत नव्हते.
=========
हे देखील वाचा : राजेश खन्नासाठी किशोर कुमारने गायलेलं पाहिलं गाणं!
=========
”माझ्यामुळे तुमचे खूप नुकसान होते आहे.” असे देखील तो वारंवार म्हणत होता. मनोज कुमार यांनी त्याला सांगितले, ”तसे काही नाही. तुझ्यापुढे आता मोठे क्षितिज आहे. त्याकडे धावण्याचा प्रयत्न करा.” अशा पद्धतीने मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ या चित्रपटातील राजेश खन्नाचा पत्ता कट झाला आणि तिथे प्रेम चोपडा आला. त्याला ती भूमिका मिळाली. हायपोथेटिकली विचार केला जर राजेश खन्नाने ‘उपकार’ मधली व्हिलन भूमिका केली असती आणि तो खलनायकच राहिला असता आणि तो जर त्याच चक्रात अडकला असता मग त्याच्या सुपरस्टार पदाचे काय झाले असते?
या जर तरच्या विचारातच मोठी गंमत असते. राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि मनोज कुमार यांच्यातील मैत्री कायम अबाधित राहिली. सत्तरच्या दशकामध्ये मनोज कुमार ‘नया भारत’ हा चित्रपट तयार करणार होते. त्यात राजेश खन्नाला त्यांनी कास्ट केले होते. परंतु हा चित्रपट नंतर बंद पडला. राजेश खन्ना आणि मनोज कुमार यांना पडद्यावर मात्र कधीच एकत्र येता आले नाही!