‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
व्ही शांताराम यांचा ‘अपना देश’ सिनेमा ठरला होता वादग्रस्त ?
भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील त्या काळातील काही किस्से, काही वाद, काही भांडणे वाचून आज आपली करमणूक होते पण त्या काळात जे लोक यात इन्व्हॉल होते त्यांना मात्र या साऱ्या प्रकाराचा खूप त्रास झाला होता. चित्रपती व्ही शांताराम (V. Shantaram) यांनी १९४९ साली एक चित्रपट बनवला होता ‘अपना देश’. फाळणीच्या प्रश्नावर फोकस करीत यात एक सामाजिक समस्या त्यांनी मांडली होती.
या चित्रपटात नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या देशात भ्रष्टाचाराने कसा शिरकाव केला आहे आणि याला वेळीच जर अटकाव नाही घातला तर देश पुन्हा कसा रसातळाला जाईल याचा इशारा त्यांनी या चित्रपटातून दिला होता. खरंतर चांगला सामाजिक संदेश या चित्रपटातील त्यांनी दिला होता. हा सिनेमा मुंबईला वेस्टएंड (ज्याचे नाव नंतर नाज झाले) मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटांमध्ये पुष्पा हंस, उमेश शर्मा, चंद्रशेखर, केशवराव दाते यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मुंबईमध्ये चित्रपटाने चांगला लौकिक प्राप्त केला. लोकांची चांगली गर्दी होत होती. परंतु एकेकाळचे शांताराम बापूंचे मित्र फिल्म इंडियाचे मासिकाचे संपादक बाबुराव पटेल यांना मात्र हे काय पटत नव्हते. व्ही शांताराम आणि बाबुराव पटेल यांच्यामध्ये त्या काळात बऱ्यापैकी कटूता निर्माण झाली होती. त्यांनी फिल्म इंडिया या आपल्या मासिकातून Apna Desh? No its Apna Trash! अशी संभावना केली. बाबुराव पटेल यांनी शांताराम बापूंना (V. Shantaram) फोन करून सांगितले की, ”तुमचा चित्रपट हा देशद्रोही आहे. स्वतंत्र भारताची एक चुकीची प्रतिमा तुम्ही निर्माण करत आहात आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाबाबत अशा प्रकारचे सिनेमे समाजामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमच्या या चित्रपटावर बंदीच आणली पाहिजे!”
ते एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी भारतातील राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, ”हा चित्रपट तुमच्या राज्यात प्रदर्शित होऊ देऊ नका. हा देशद्रोही चित्रपट आहे.” असे सांगितले. शांताराम बापूंच्या बऱ्याच मित्रांनी बाबुराव पटेल यांनी चालवलेल्या मोहिमेच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी बापूंना असे देखील सांगितले की, ”तुम्हीसुद्धा प्रत्येक मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून आपली बाजू सांगा.” त्यावर बापूंचे (V. Shantaram) म्हणणे असे होते की, ”जी बाजू सत्य असते तिला कुठल्याही पुराव्याची गरज नसते. त्यामुळे सत्य माझ्या बाजूने आहे माझा विजय होईल.”
‘फिल्म इंडिया’ या मॅगझिनची देशभर मोठी चलती होती. त्यामुळे बाबुराव पटेल यांच्याकडून आलेल्या पत्राची दखल प्रत्येक मुख्यमंत्र्याला घ्यायला लागली. या चित्रपटातील नायिका पंजाबी दाखवली होती. ती अवैध शस्त्रांचा व्यापार करते असे यात दाखवले होते. त्यामुळे हा चित्रपट ‘पंजाबी लोकांची बदनामी करतो’ असा दावा बाबुराव पटेल यांचा होता. दिल्लीमध्ये तेव्हा शीख समुदाय मोठ्या संख्येने राहत होता. बाबुराव पटेल यांचे अनेक मित्र दिल्लीत देखील होते. त्यांच्या थ्रू बाबूराव पटेल यांनी या चित्रपटाच्या विरोधी वातावरण दिल्लीत तयार केले. दिल्लीत सर्वत्र या सिनेमाच्या विरुद्ध पोस्टर्स लागली. परंतु गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा चित्रपट पाहिला आणि त्याला ग्रीन सिग्नल दाखवला. त्यामुळे दिल्लीतील संघर्ष टळला.
पण खरा संघर्ष मात्र पंजाबमध्ये होणार होता. पंजाबमधील माहिती आणि प्रसारण खात्याचे एक अधिकारी वर्मा बाबुराव पटेल यांचे मित्र होते पटेलांनी त्याला तिखट मीठ लावून सिनेमा कसा पंजाबी समाजाच्याविरुद्ध आहे हे सांगितले. पंजाबमध्ये होणारा मोठा विरोध लक्षात घेऊन शांताराम बापूंनी (V. Shantaram) पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री भीम सेन सच्चर यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्र्यांनी शांताराम बापूंना पंजाबला बोलवले आणि त्यांच्यासोबतच सिनेमा पाहायचे ठरवले. या सिनेमाला वर्मा देखील उपस्थित होते. सिनेमा सुरू झाला अर्धा एक तास झाल्यानंतर मुख्यमंत्री भीम सेन सच्चर जोरात म्हणाले “वर्मांजीsss “
========
हे देखील वाचा : अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है….
========
व्ही शांताराम (V. Shantaram) यांना वाटले गेला आता आपला सिनेमा बाराच्या भावात. पण चमत्कार झाला. मुख्यमंत्री वर्मांना म्हणाले, ”तुम्ही तर म्हणत होता हा चित्रपट देश विघातक आहे. देशाची बदनामी करणारा आहे. पण मी तर इथे वेगळेच पाहतोय. काय सुंदर चित्रपट बनवला आहे.” मुख्यमंत्रीच असे बोलल्याने वर्मा यांनी मान खाली घातली. मुख्यमंत्री सच्चर यांनी चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले. शांताराम बापूंना शुभेच्छा दिल्या आणि देशभर हा सिनेमा नंतर प्रचंड गाजला!