गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
खोया खोया चांद खुला आसमान… गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी
भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील गाण्यांच्या गोष्टी आज देखील तितक्याच मनाला गुलकंदी आनंद देतात. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या एका गाण्याच्या मेकिंगची ही भन्नाट गोष्ट आहे. या गाण्याचे गीतकार होते शैलेंद्र (Shailendra). त्या काळात शैलेंद्र प्रचंड बिझी असायचे. एक तर त्यांचे मोठे असोसिएशन आर के फिल्म आणि एस जे यांच्या सोबत असायचे. सोबतच इतर संगीतकारांसोबत देखील ते भरपूर काम करत असायचे. त्यामुळे गाणे लिहून द्यायला कधी कधी खूप वेळ लागायचा.
पन्नासव्या दशकाच्या शेवटी नवकेतन फिल्म्सचा ‘कालाबाजार’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला संगीत एस डी बर्मन यांचे होते तर गाणी शैलेंद्र यांची होती. यातील एक गाणे अर्जंटली पाहिजे होते. अभिनेता देव आनंद आणि दिग्दर्शक विजय आनंद या गाण्याचा इंतजार करत होते. सचिन देव बर्मन तर वैतागले होते. शैलेंद्र यांच्याकडून काही केल्या गाणं लिहिणं होत नव्हतं. सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक त्यांचे पुत्र राहुल देव बर्मन होते. त्यावेळी त्यांचं वय अवघे वीस वर्षे होते.
सचिनदा यांनी राहुल देव बर्मन यांना शैलेंद्रकडे पिटाळले आणि सांगितले, ”आज शैलेंद्रकडून गाणं लिहून आणल्याशिवाय घरी यायचं नाही! कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडून आज गाणं लिहून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच!” पंचम आपल्या वडिलांचे आज्ञा ऐकून ताबडतोब शैलेंद्र (Shailendra) यांच्या मागावर गेला. तेव्हा ते शंकर जयकिशन यांच्या एका गाण्याचा मीटिंगमध्ये बसले होते. जय किशन यांनी पंचमला विचारले, ”तू इथे काय करतोयस?” तेव्हा त्याने नजरनेच शैलेंद्रकडे कटाक्ष टाकून यांच्यासाठी आलोय असे सांगितले. दिवसभर शैलेंद्र आणि शंकर जय किशन यांच्यात म्युझिक मीटिंग चालू होती. पंचम चांगलाच वैतागला होता. पण काय करणार? वडिलांची आज्ञा होती.
संध्याकाळी पंचम आणि शैलेंद्र दोघेही बाहेर पडले. पंचमने शैलेंद्र गाण्याची आठवण करून दिली. तो म्हणाला “मला माहिती आहे रे.” पण शैलेंद्रला काही केल्या शब्द सुचत नव्हते. तो पुन्हा पुन्हा पंचमला गाण्याची ट्यून वाजवून दाखवायला सांगत होता . असे करत करत रात्रीच्या अकरा वाजले. शैलेंद्र (Shailendra) म्हणाले, ”चला आपण जुहू बीचवर जाऊ या. बघूया तिथे काही सुचते का.” तिथे गेल्यावर शैलेंद्रचे अखंड धूम्रपान चालूच होते. पुन्हा त्याने पंचमला सांगितले, ”मला एकदा पुन्हा सचिनदा यांनी बनवलेली ट्यून वाजवून दाखव.” पंचमने काडीच्या पेटीवर ती ट्यून वाजवून दाखवली. आता मात्र शैलेंद्रची ट्यूब पेटली त्यांची प्रतिभा जागृत झाली.
समुद्रावर मस्त गार गार वारे येत होते. ती पौर्णिमेची रात्र होती. पूर्ण चंद्र समोर होता. लगेच शैलेंद्र (Shailendra) यांनी शब्द लिहिले, ”खोया खोया चांद खुला आसमान आंखो मे सारी रात जायेगी तुमको भी कैसे नींद आयेगी…” सिगारेटच्या पाकिटावरच त्यांनी या दोन ओळी लिहून दिल्या आणि पंचमला म्हणाले, ”जा आता.. मी उद्या सकाळी पूर्ण गाणे झाले करून आणतो.” पंचमने त्या ओळी वाचल्या आणि त्याला परमानंद झाला. कारण अशाच लाईन्स त्यांना अपेक्षित होत्या. लगेच पंचम ते सिगारेटचे पाकीट घेऊन घरी गेला. सचिनदाला त्या ओळी दाखवल्या. सचिनदा देखील एकदम खुश झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेंद्र संपूर्ण गाणे घेऊन आले आणि दोन दिवसातच या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. मोहम्मद रफीने अतिशय धुंद स्वरात हे गाणे गायले.
========
हे देखील वाचा : रिमझिम गिरे सावन : अमिताभ – मौसमीचा ‘मंझिल’ आठवतो कां?
========
आज साठ वर्षाहून अधिक कालावधी झाला असला तरी या गाण्याची खुमारी अजून कमी झालेली नाही! ‘काला बाजार’ या चित्रपटात तीन ही आनंद बंधूंनी एकत्र काम केले होते. यातली देव आनंद वर चित्रित सर्व गाणी मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांनी गायली होती. लता मंगेशकर आणि सचिन देव बर्मन त्या काळात एकत्र काम करत नसल्यामुळे यातील स्त्री स्वर आशा भोसले, गीता दत्त आणि सुधा मल्होत्रा यांचा होता.