‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आधी जी भूमिका नाकारली तीच भूमिका बावीस वर्षानंतर कुणी साकारली?
दूरदर्शनवरील महाभारतामुळे घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक बी आर चोप्रा हे भारतीय चित्रपट सृष्टीतील उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत कलावंत होते. २२ एप्रिल १९१४ रोजी जन्मलेल्या बी आर चोप्रा (b r chopra) यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब लाहोर येथून एम ए इंग्लिश ही पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर काही दिवस लाहोरला सिने पत्रकारिता आणि सिने हेरॉल्ड या मासिकाच्या संपादन केल्यानंतर फाळणीनंतर ते मायानगरीमध्ये आले. १९५१ साली त्यांनी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. चित्रपटाचे नाव होते ‘अफसाना’.
या चित्रपटाची कथा दुसऱ्या एका उच्चविद्याविभूषित कलाकाराने लिहिली होती हा कलाकार होता आय एस जोहर! आय एस जोहर यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयात एम ए केले होते तसेच त्यांनी एल एल बी ही विधीशास्त्राची पदवी देखील प्राप्त केली होती. पुढे चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले. प्रेक्षक त्यांना फक्त कॉमेडियन म्हणून ओळखत असले तरी ते एक बहुआयामी असे कलावंत होते. या ‘अफसाना’ चित्रपटात नायकाची दुहेरी भूमिका होती.
आपल्या पहिल्याच चित्रपटात अशोक कुमार यांनी ही भूमिका करावी असे चोप्रा यांना वाटले. ते अशोक कुमारला याना भेटले आणि चित्रपटाचे कथानक त्यांना ऐकवले. पहिल्या भेटीत अशोक कुमार यांना ते काही कथानक फारसे आवडले नाही त्यांनी नम्र निकाल दिला! त्यानंतर चोप्रा हेच कथानक घेऊन दिलीप कुमार यांच्याकडे गेले. दिलीप कुमार यांना कथानक आवडले परंतु त्यांनी सांगितले की, ”माझ्यापेक्षा ही भूमिका अशोक कुमारच चांगल्या पद्धतीने निभावू शकतील!” त्या काळात सर्व कलाकारांच्यामध्ये एक निकोप स्पर्धा होती. त्यामुळे एक दुसऱ्याच्या रेकमेंडेशन ते करत असायचे.
अशोक कुमारचे नाव ऐकल्यानंतर चोप्रा यांनी दिलीप कुमार यांना सांगितले की, ”मी त्यांच्याकडे आधीच जाऊन आलो. परंतु त्यांना फारसे कथानक आवडले नाही.” पण तरीही दिलीप कुमार म्हणाले, ”माझ्या मते ही भूमिका अशोक कुमार यांच्यासाठीच आहे आणि त्यांनीच ती पडद्यावर साकारली पाहिजे!” बी आर चोप्रा (b r chopra) तेव्हा नवीन होते त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांनी दिलीप कुमार यांना त्यांनी विनंती केली की, ”तुम्ही आत्ता जे काही तुमचे मत व्यक्त केले ते मला एका कागदावर लिहून द्या. मी तो कागद अशोक कुमार यांना देतो.” त्यावर दिलीप कुमार म्हणाले, ”कागद कशाला? मी अशोक कुमार यांना एक पत्रच देतो.” असे म्हणून त्यांनी एक पत्र लिहिले ज्यात ही भूमिका करण्याचा आग्रह त्यांनी त्यांच्याकडे धरला.
जेव्हा साक्षात दिलीप कुमारच या भूमिकेसाठी आपण योग्य आहोत हे पत्रातून सांगत आहे असे कळाल्यानंतर अशोक कुमार यांनी या चित्रपटात काम करणारा होकार कळवला! आणि चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटात अशोक कुमार, वीणा, प्राण, कुलदीप कौर, जीवन, कुक्कु यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला संगीत हुस्नलाल भगतराम यांनी दिले होते. जुन्या रसिकांना या चित्रपटातील एक गाणे आजही आठवत असेल. या गाण्याच्या टायटलवरून रेडिओ सिलोन वर एक अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम अनेक वर्ष सदर होत होता.
========
हे देखील वाचा : शम्मी कपूरने दिग्दर्शित केलेला पहिला ॲडल्ट कॉमेडी सिनेमा!
========
गाण्याचे बोल होते ‘अभी तो मै जवान हु…’ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले होते. चित्रपटाचे कथानक भन्नाट आणि वेगवान होते. अशोक कुमारने यातील डबल रोल खूप चांगल्या पद्धतीने वठवला होता. चित्रपट सुपरहिट झाला आणि बी आर चोप्रा (b r chopra) यांची सिने कारकीर्द इथूनच बहरली. गंमत म्हणजे १९५१ साली या चित्रपटात काम करायला नकार देणाऱ्या दिलीप कुमारने पुढे २४ वर्षांनी याच कथानकावरील याच चित्रपटाच्या रिमेक मध्ये स्वतः ती भूमिका केली! चित्रपट होता ‘दास्तान’. चित्रपटाचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनीच केले होते संगीत मात्र लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. ‘दास्तान’ चित्रपटात दिलीप कुमारची नायिका शर्मिला टागोर होती. या दोघांचा हा एकमेव चित्रपट. ‘दास्तान’ चित्रपट उत्तम बनला होता पण दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला!