‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कृष्णा राज कपूर मुलाना घेवून घरातून कां बाहेर पडल्या होत्या?
पन्नासच्या दशकामध्ये राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांनी देश आणि विदेशातील प्रेक्षकांना भारावून टाकले होते. राज कपूर (Raj kapoor) आणि नर्गिस हे त्या काळातील सर्वांचे लाडके आयकॉनिक रोमँटिक कपल होते. त्या दोन कलावंतांची केमिस्ट्री पडद्यावर आणि पडद्याच्या मागे खूप चांगली जुळून आली होती. या दोघांनी तब्बल १६ सिनेमे एकत्र केले पण ‘जागते रहो’ या चित्रपटानंतर या दोघांमधील मधुर संबंधाना बाधा आली आणि नर्गिस राजच्या चित्रपटातून आणि जीवनातून बाहेर पडल्या.
अर्थात त्यानंतर नर्गिसने ‘मदर इंडिया’ सारखा तिच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने आकार देणारा चित्रपट केला. आपल्या आयुष्यातून कला आणि जीवनातून नर्गिस गेल्यानंतर राज कपूर (Raj kapoor) काहीसा सैरभैर झाला हे नक्की. पण व्यावसायिकता त्याच्या अंगात पुरेपूर मुरली होती त्यामुळे लगेच त्याने स्वतःला सावरले, पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीच्या मागे तो लागला. चित्रपटाच्या नायिकेच्या प्रेमात पडणारा दिग्दर्शक अशी त्या काळात त्याची प्रतिमा बनली होती.
‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटाच्या वेळी तो बऱ्यापैकी पद्मिनीमध्ये इन्व्हॉल झाला होता असे त्या काळातील सिने मॅगझिन वाचल्यानंतर कळते. राज कपूरची सिनेमामधील इन्व्हॉलमेंट इतकी प्रचंड असायची की दिवस रात्र तो फक्त आणि फक्त सिनेमाचा विचार करायचा. आपलं सर्वस्व झोकून तो सिनेमा दिग्दर्शित करायचा आणि त्यातून कदाचित नायिके बाबतचा त्याचा पझेसिव्हनेस वाढत असावा. ‘संगम’ या चित्रपटाच्या वेळी तो वैजयंतीमालाच्या प्रेमात पुरता पागल होता! इतका की, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये या वादळाचे तडाखे बसू लागले. राज-वैजयंतीमाला प्रकरणाचा सुगावा लागल्यावर राज कपूरची (Raj kapoor) पत्नी कृष्णा कपूर चिडून लहानग्या ऋषी आणि राजीवला घेऊन राज कपूरच्या घरातून बाहेर पडल्या होत्या आणि मरीन ड्राईव्हच्या नटराज हॉटेलमध्ये जाऊन राहू लागली होती!
ही त्या काळातील मोठी ब्रेकिंग न्यूज होती. या वादळात राज कपूरचे घरटे तुटते की काय असे वाटत होते. पण पेशावर येथील कपूर (Raj kapoor) कुटुंबाचे स्नेही लेखक मुल्कराज आनंद त्यांनी आणि दिलीप कुमार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि कृष्णा कपूरची समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले. ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील या घटनेचा उल्लेख केला आहे. वैजयंतीमाला यांनी मात्र आपल्या एका पुस्तकात या प्रकरणाबाबत बोलताना ‘असे काहीही झाले नव्हते’ असे सांगितले. ‘राज कपूरला पब्लिसिटीची प्रचंड मोठी भूक होती त्यामुळे त्यांच्या कडूनच मुद्दाम अशा वावड्या उठवल्या गेल्या’ असे वैयंतीमाला यांचे म्हणणे होते.
अर्थात ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात यावर देखील भाष्य केले आहे. ‘वैजयंतीमालाने राज कपूर गेल्यानंतर त्यांच्यावर अशी एकतर्फी टीका करणे बरोबर नाही’ असे यात लिहिले आहे. कारण या प्रकरणातील सत्य आणि राज कपूरची (Raj kapoor) बाजू मांडायला ते स्वतः जगात नाहीत असे असताना एकतर्फी असे लिहिणे बरोबर नाही याची नोंद ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात घेतली होती!
राज कपूर (Raj kapoor) आणि वैजयंतीमाला यांनी फक्त दोनच चित्रपटात एकत्र भूमिका केल्या. १९६१ साली आलेल्या ‘नजराना’ या चित्रपटात ते पहिल्यांदा एकत्र आले. यानंतर १९६४ सालच्या ‘संगम’ या आर केच्या पहिल्या रंगीत चित्रपटात हे दोघे एकत्र आले. यानंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा योग आलाच नाही. अर्थात ‘संगम’च्या नंतर वैजयंतीमालाने देखील मोजून आठ–दहा चित्रपटात भूमिका केल्या. सूरज, आम्रपाली, ज्वेल थीफ, दुनिया, प्रिन्स, प्यार हि प्यार, छोटी सी मुलाकात, गंवारसाठी असे मोजकेच सिनेमे तिने केले. १९६८ साली डॉ. चमनलाल बाली यांच्यासोबत लग्न करून तिने सर्वांनाच धक्का दिला. लग्नानंतर त्यांनी मायानगरी मुंबई सोडली आणि ती मद्रासला जाऊन राहू लागली.
=========
हे देखील वाचा : रिमझिम गिरे सावन : अमिताभ – मौसमीचा ‘मंझिल’ आठवतो कां?
=========
त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट निर्मात्यांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊन चित्रपटात पुन्हा काम करण्याची विनंती केली होती. पण त्यांनी सर्व ऑफर नाकारल्या. यश चोप्रा यांनी ‘दिवार’ (१९७५) या चित्रपटात अमिताभ आणि शशी कपूरच्या आईची भूमिका वैजयंतीमाला ऑफर केली होती. लग्नानंतर वैजयंतीमालाने आपले सर्व लक्ष नृत्य आणि समाजकार्यावर केंद्रित केले. नंतर त्या राजकारणात देखील आल्या. लोकसभा आणि राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम देखील केले. आज वैजयंतीमाला ९१ वर्षाच्या असून निरोगी आयुष्य जगत आहेत! नुकतंच त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देवून भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सन्मानित केलं!