
‘सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है……’
सुभाष घई (Subhash ghai) हिंदी सिनेमाच्या दुनियेत खरंतर अभिनेता बनायला आले होते. राजेश खन्ना यांच्या सोबत ‘आराधना’ या चित्रपटात त्यांना भूमिका देखील मिळाली होती. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची अभिनयाची डिग्री त्यांच्यापाशी होती. परंतु अभिनेता म्हणून ते यशस्वी होऊ शकले नाही म्हणून त्यांनी रायटिंग स्किल वापरायचे ठरवले आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांची पहिली डायरेक्शनल डेब्यू फिल्म होती ‘कालीचरण’ एन सी सिप्पी निर्मित हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता.

शत्रुघ्न सिन्हाला खऱ्या अर्थाने सोलो हिरो म्हणून एस्टॅब्लिश करणारा हा पहिला चित्रपट होता. सुभाष घई यांचे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्या काळात मोठा चर्चेचा विषय झाला होता कारण या जबरदस्त हिट चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा, रिना रॉय, प्रेमनाथ, अजित अशी जबरदस्त स्टार कास्ट होती. चित्रपटाची कथा सुभाष घई दोन वर्षांपासून लिहीत होते. ही कथा त्यांनी प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई यांना दाखवली होती पण कुणीही त्याचा स्वीकार केला नाही.

‘खान दोस्त’ हा त्यांनी लिहिलेला एक चित्रपट यशस्वी झाल्यानंतर एन सी सिप्पी यांनी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतल स्क्रिप्ट बाबत विचारून घेतले, सुभाष घई (Subhash ghai) यांनी ज्या पद्धतीने ही स्क्रिप्ट त्यांच्यासमोर सादर केली त्यावेळी त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घईच करतील असे मनोमन ठरवले. या चित्रपटातील प्रमुख खलनायकाची भूमिका अजित या अभिनेत्याला दिली होती. ही भूमिका खरोखर त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक होती. ‘सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है’ हा त्यांचा डायलॉग त्या काळात जबरदस्त लोकप्रिय ठरला होता. LION आणि NO17 हा ट्विस्ट त्या काळात खूप लोकप्रिय झाला होता. इंग्रजी लॉयन हा शब्द उलट करून पाहिला तर नंबर सेव्हन्टीन दिसतो ही गंमत भारतीय प्रेक्षकांना खूप आवडली होती.
अजित ही भूमिका करेल की नाही याबाबत सुभाष घई (Subhash ghai) यांच्या मनात शंका होती कारण सुभाष घई यांचा तो पहिला चित्रपट होता. तरी धीर एकवटून यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी गेले आणि त्यांना संपूर्ण कथानक ऐकवले. अजित देखील त्यांच्या स्टोरी टेलिंगने जबरदस्त प्रभावित झाले आणि या भूमिकेसाठी तयार झाले. शिवाय जाताना म्हणाले मला तुम्ही सांभाळून घ्या. सुभाष घई यांना अजित यांचा हा साधेपणा खूप आवडला नंतर त्यांनी अजित यांची भूमिका चित्रपटात नायक शत्रुघ्न सिन्हा सहनायक प्रेमनाथ यांच्या बरोबरीला आणून ठेवली. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाचा डबल रोल होता.

कालीचरण चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. चित्रपटातील गाणी ठीकठाक होती. पण कल्याणजी आनंदजी हे लक्की संगीतकार होते. बऱ्याच दिग्दर्शकांच्या पहिल्या चित्रपटाचे संगीतकार ते होते आणि त्या दिग्दर्शकांची यशस्वी खेळी त्या चित्रपटापासून सुरुवात झाली होती. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा तर प्रकाश मेहरा (हसीना मान जाएगी), मनमोहन देसाई (छलिया) फिरोज खान (अपराध) मनोज कुमार (उपकार) यांचा समावेश करता येईल. या चित्रपटानंतर प्रेमनाथ सुभाष घई यांच्या चित्रपटातील अविभाज्य घटक बनले. तिथून पुढच्या प्रत्येक चित्रपटात म्हणजे विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज या चित्रपटात प्रेमनाथ यांची जबरदस्त भूमिका असायची. अभिनेता शत्रुघन सिन्हा यांचा पहिला सोलो हिरो असलेला सुपरहिट सिनेमा कालीचरण होता.
========
हे देखील वाचा : खोया खोया चांद खुला आसमान… गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी
========
आज जवळपास ५० वर्षे झाली तरी ‘सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है’ हा अजितचा आयकॉनिक डायलॉग आज देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘कालीचरण’ त्यावर्षीच्या ब्लॉक ब्लस्टर टॉप टेन चित्रपटात होता. या वर्षीचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट होता मनोज कुमारचा ‘दस नंबरी’ यानंतर नागिन, लैला मजनू, चरस आणि कालीचरण हे सुपरहिट सिनेमे होते.
‘कालीचरण’ हा चित्रपट सुभाष घई यांच्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता कारण याच चित्रपटापासूनच त्यांनी दिग्दर्शन करायला सुरुवात केली होती. खरं तर राजेश खन्ना ज्या टॅलेंट हंट स्पर्धेतून चित्रपटात आले होते; त्याच स्पर्धेतून सुभाष घई (Subhash ghai) देखील आले होते. यांच्यासोबत आणखी एक अभिनेता होता तो होता धीरज कुमार. पण धीरज कुमार आणि सुभाष घई या दोघांनाही अभिनयाच्या क्षेत्रात फारच करिअर करता आलं नाही!