‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दोन सुपरस्टार्सनी नकार दिल्यानंतर अनिल कपूरला मिळाला हा सिनेमा!
ऐंशीच्या दशकामध्ये अनिल कपूर (Anil kapoor) यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने आबाल वृद्धांना सुखावले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कलेक्शन केले. खरंतर त्या काळात व्हिडिओ पायरसीने बॉलीवूड अक्षरशः खिळखिळे झाले होते. कुठलाही नवीन चित्रपट आला की दोन दिवसात त्याची व्हिडिओ कॅसेट मार्केटमध्ये येत होती आणि लोक थिएटरमध्ये जायचा कंटाळा करत होते. अशा परिस्थितीमध्ये ‘मिस्टर इंडिया’चे यश खरोखरच घवघवीत असे नेत्रदीपक होते. हा चित्रपट सलीम जावेद यांनी लिहिला होता. या दोघांनी एकत्रित लिहिलेला हा आणि प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल.
खरंतर ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच सलीम आणि जावेद यांच्यामध्ये फूट पडली आणि दोघेजण स्वतंत्र काम करू लागले तरी देखील १९८५ साली आलेला ‘जमाना’ आणि १९८७ साली आलेला ‘मिस्टर इंडिया’ हे त्यांनी आधी साइन केलेले चित्रपट होते. या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचा नायक अनिल कपूर जरी असला तरी जेव्हा हा चित्रपट लिहिला गेला तेव्हा सलीम जावेद यांच्या डोळ्यासमोर अनिल कपूर (Anil kapoor) निश्चितच नव्हता. मग त्यांनी कुठल्या अभिनेत्याला डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट लिहिला होता? त्या अभिनेत्याने का नकार दिला? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
सत्तरच्या दशकामध्ये सलीम जावेद म्हणजे अक्षरशः मिडास झाले होते. ते ज्या कलाकृतीला स्पर्श करत ती कलाकृती सुपर डुपर हिट होत असायची. अमिताभ बच्चन आणि सलीम जावेद हे समीकरण त्यावेळी यशस्वी सिनेमाचे फॉर्मुला असे होते. ‘शोले’ या चित्रपटानंतर दिवार, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, दोस्ताना, शान हे सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले. या सोबतच अमिताभ बच्चन नायक नसलेले परंतु हिट झालेले असे त्यांचे क्रांति, चाचा भतिजा, हाथ की सफाई, यादो की बारात, हाथी मेरे साथी सीता और गीता, अंदाज हे सर्व सिनेमे म्हणजे बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातलेले चित्रपट.
ऐंशी दशकाच्या अखेरीस सलीम जावेद यांना स्वतः प्रोड्यूसर व्हावे असे वाटले. त्या पद्धतीने त्यांनी काम देखील सुरू केले आणि त्यातूनच ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले गेले. या स्क्रिप्टवर चित्रपट बनवावा आणि त्याचा नायक अमिताभ बच्चन असावा असे त्यांनी सुरुवातीलाच ठरवले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी करावे असे देखील त्यांच्या मनात होते. त्या पद्धतीने त्यांनी अमिताभ बच्चन यांना या सिनेमाचे कथानक ऐकवले. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे सर्व व्यवहार अजिताब बच्चन पाहत होते. “आमचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे अमिताभ बच्चनने त्याचे मानधन देखील कमी करावे” अशी त्यांची अपेक्षा होती.
स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले “तुम्ही जाणताच की लोक मला पडद्यावर पाहायला येतात. तुमच्या सिनेमात जर मी इनविजीबल असेल तर कोण पाहायला येईल?” त्यावर सलीम जावेद यांचे असे म्हणणे होते की, ”तुमचा आवाज हे तुमचे खरे अस्त्र आहे आणि आपण त्याचा इथे पुरेपूर उपयोग करून घेत आहोत. त्यामुळे तुम्ही पडद्यावर दिसला जरी नाही तर तुमच्या आवाजावर हा चित्रपट हिट होईल!” पण अमिताभ बच्चन यांना हा प्रोजेक्ट तितकाच आवडला नाही त्यांनी सरळ नकार दिला.
अमिताभ बच्चन यांचा अनपेक्षित नकार ऐकल्यानंतर सलीम जावेद प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम करायचे नाही असे म्हणून ठरवले. सलीम-जावेद यांची जोडी फुटण्याला सुद्धा ही घटना कारणीभूत आहे असे समजले जाते. दीप्तकीर्ती चौधरी यांनी लिहिलेल्या ‘रिटन बाय सलीम जावेद’ या पुस्तकात याचे स्पष्ट संकेत आहे. २१ जून १९८१ या दिवशी या दोघांनी ऑफिशिअल ब्रेकअप केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत जावेद अख्तर यांनी मात्र जुळवून घेतले आणि ‘सिलसिला’ या चित्रपटापासून त्यांनी गीतलेखनाचा प्रारंभ केला.
========
हे देखील वाचा : आधी जी भूमिका नाकारली तीच भूमिका बावीस वर्षानंतर कुणी साकारली?
========
अमिताभ बच्चन यांचा नकार ऐकल्यानंतर सलीम जावेद माजी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याकडे गेले. राजेश खन्ना आणि जावेद अख्तर यांच्यात पूर्वी मतभेद झाले होते परंतु जावेदने त्यासाठी माफी मागून राजेश खन्नाला सिनेमात काम करण्याची विनंती केली. परंतु राजेश खन्नाने देखील या चित्रपटात ‘अदृश्य’ भूमिका असल्याने काम करायला नकार दिला. अशा पद्धतीने स्क्रिप्ट बाजूला पडले नंतर या दोघांची जोडी देखील फुटली. १९८३ साली बोनी कपूरचा भाऊ अनिल कपूर यांचा ‘वो साथ दिन’ हा चित्रपट हिट झाला आणि बोनी कपूरने या स्क्रिप्टवर चित्रपट निर्माण करायचे ठरवले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आता शेखर कपूरची निवड केली आणि अनिल कपूर (Anil kapoor) अशा पद्धतीने ‘मिस्टर इंडिया’मध्ये प्रवेश करता झाला आणि ‘मिस्टर इंडिया’ बनला!