रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी भावनिक पोस्ट लिहीत व्यक्त केले दु:ख
हैदराबादच्या रामोजी राव ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांच्या संदर्भात अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज सकाळी हैदराबाद येथे निधन झाले. प्रसिद्ध मीडिया दिग्गज आणि चित्रपट सम्राट रामोजी राव यांचे हैदराबादच्या स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव हे 87 वर्षांचे होते. रामोजींच्या निधनाच्या बातमीनंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. रामोजी राव यांच्या निधनामुळे अनेक सेलेब्स आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. (Ramoji Rao Passes Away)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया एक्सवर रामोजी राव यांच्या निधनावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे आणि म्हटले आहे की, ‘श्री रामोजी राव गारू यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये क्रांती घडवून आणणारे ते द्रष्टे होते आणि त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट विश्वावर अमिट ठसा उमटवला. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांतून त्यांनी माध्यमे आणि मनोरंजन विश्वात नावीन्य आणि उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित केले. रामोजी राव गारू यांना भारताच्या विकासासाठी खूप तळमळ होती. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. या कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना.’
राव यांच्यावर हैदराबादच्या स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी या घटनेवर व्यक्त होताना म्हणाले, “रावजी राव यांच्या निधनाने दु:खी झालो असून तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेतील त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी संवेदना आहे. ओम. शांति।'(Ramoji Rao Passes Away)
==============================
हे देखील वाचा: Kangana Ranaut ला काना खाली मारणारी सीआयएसएफ जवान निलंबित
==============================
रामोजी राव यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ५ जून रोजी हैदराबादमधील नानकरामगुडा येथील स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.