‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला?
सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमाचा सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) याच्या सुरुवातीच्या सिनेमात येण्यापूर्वीच्या कालखंडाबद्दल रसिकांना फारशी माहिती नाही. जतिन खन्ना या नावाने त्याने थिएटर केले होते. अनेक नाटकातून भूमिका केल्या. मग जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला? आणि त्यापूर्वी एक नाव जे त्याला खूप आवडत होतं; ते फिल्मी नाव त्याला घ्यायचं होतं. परंतु ते का घेता आलं नाही? याचा एक मजेशीर किस्सा आहे. कोणतं होतं ते नाव? आणि जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला?
जतीन खन्नाचे कुटुंबीय १९३५ साली लाहोरहून मुंबईला आले. त्यांच्या आजोबा आकुडूमल खन्ना यांचा बिजनेस होता. ते रेल्वेसाठी कॉन्ट्रॅक्टरशिप करत होते. त्यांच्या घरात कुणीच नोकरी करत नव्हते. सर्वजण बिझनेसमध्ये होते. तीन मुले होती. त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचा मुलगा म्हणजे जतीन खन्ना. तिन्ही भावांमधील दहा-पंधरा मुलांपैकी हा सर्वात धाकटा. त्यामुळे त्याला लहानपणापासून सर्वजण ‘काके’ (Rajesh Khanna) म्हणून बोलवायचे. जतीन खन्नाचे दोन नंबरचे काका चुनीलाल यांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे त्या काळातील पद्धतीनुसार आपल्या भावाचा एक मुलगा दत्तक घ्यायचे त्यांनी ठरवले आणि धाकट्या भावाचा सर्वात छोटा मुलगा काके म्हणजेच जतिन खन्ना याला त्यांनी दत्तक घेतले!
आता जतिन खन्नाचे (Rajesh Khanna) ऑफिशियल अडॉप्टर पेरेंट्स चुनीलाल खन्ना आणि लीलावती खन्ना झाले. चुनीलाल आणि लीलावती हे खूप वर्षापासून अपत्याच्या प्रेमापासून वंचित होते त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या प्रेमाचा वर्षाव जतीन वर केला. त्यामुळे लहानपणापासूनच जतीन हा खूपच लाडोबा, हट्टी आणि अहंकारी बनला. त्याचे आई-वडील त्याच्या हरेक इच्छा तात्काळ पूर्ण करत होते. त्याला झोपेतून कोणीही उठवत नसायचे. तो जे मागेल ते लगेच त्याच्यापुढे हजर व्हायचं. शाळेत असताना पॉकेट मनी इतर मुलांना दोन रुपये मिळत असेल तर याला पाच रुपये मिळत होते. त्यामुळे लहानपणापासूनच जतीन हट्टी होत गेला. पुढे राजेश खन्नाने एका फिल्मी मॅगझिनला मुलाखत देताना सांगितलं, ”माझे पालन पोषण व्यवस्थित झाले नाही. त्यातूनच माझा असा स्वभाव बनत गेला!”
जतीन खन्ना गिरगावच्या गोवन स्कूलमध्ये जात होता. खन्ना परिवार तेव्हा गिरगावच्याच सरस्वती निवासमध्ये राहत होते. इथे गिरगावात त्याला आणखी एक मित्र भेटला त्याचे नाव रवी कपूर. तो देखील गर्भ श्रीमंत बापाचा मुलगा. दोघांनाही मस्ती खूप आवडत होती. अभ्यासात दोघांची फारशी गती नव्हती. जतीन पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये बीए करण्यासाठी आला. इथे दोन वर्ष केल्यानंतर फायनल इयरला पुन्हा के सी कॉलेज मुंबई येथे गेला. तिथे पुन्हा त्यांची गाठ रवी कपूरशी पडली.
जतीन खन्नाचे (Rajesh Khanna) तेव्हा मुंबईतील थिएटरमधील एक मोठं नाव झालं होतं. नाटकं तो आवडीने करायचा. पण त्याला खरंतर सिनेमात काम करायचं होतं. ती संधी काही मिळत नव्हती. तिकडे रवी कपूर एकदा राजकमलमध्ये गेला असता व्ही शांताराम यांनी त्याला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. आता जतीन देखील सिनेमासाठी प्रयत्न करू लागला. याच काळात त्याला त्याची पहिली गर्लफ्रेंड अंजू महेंद्र भेटली. ती देखील थिएटर करत होती. १९६५ साली मात्र जतीन खन्नाच भाग्य उजळलं.
========
हे देखील वाचा : किशोर कुमार स्वत: प्रचंड मोठा फॅन होता या हॉलीवुड मूव्हीचा!
========
फिल्म फेअरने देश पातळीवर एक टॅलेंट हंट स्पर्धा घेतली आणि त्यात जतीन खन्ना (Rajesh Khanna) भारतात पहिल्या क्रमांकाचे जिंकला. अनेक निर्मात्यांनी लगेच त्याला म्हणून आपल्या मुव्हीजमध्ये लिड रोलमध्ये घेतले. त्यावेळी जतीन खन्नाने आपले नाव बदलायचे ठरवले आणि त्याला खरंतर फिल्मी नाव जितेंद्र घ्यायचं मनात होतं. पहिलेपासून त्याने तेच ठरवलं होतं. पण आता ते शक्य नव्हतं. कारण त्याचा मित्र रवी कपूर यांनी ते नाव घेतलं होतं. कारण रवी कपूरचा पहिला चित्रपट १९६४ साली ‘गीत गाया पत्थरोने’ आला होता. त्यात त्याचे नाव जितेंद्र व्ही शांताराम यांनी केले होते. त्यामुळे जतीन खन्नाने आपल्या मित्रांसोबत/ कुटुंबीयांसोबत विचार करून एक नाव फायनल केलं ते होतं राजेश! अशा प्रकारे जतीन खन्नाचा राजेश खन्ना झाला आणि लवकरच तो सुपरस्टार झाला!