‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘स्वदेस’मधील या गाण्याचे रेकॉर्डिंग हॉटेलच्या एका रूममध्ये केले होते!
शाहरुख खानच्या कला जीवनातील महत्त्वाचा चित्रपट होता ‘स्वदेस‘ (Swades) जो १७ डिसेंबर २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा होता. याचं संगीत ए आर रहमान यांनी दिले होते. चित्रपटाच्या कथानकासोबत त्याला साजेस प्रवाही संगीत होतं. या चित्रपटातील एका गीताचा किस्सा गायिका मधुश्री हिने टीव्ही चॅनेलवरील एका कार्यक्रमात सांगितला होता.
संगीतकाराकडे जर कसब असेल तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतोच. या गाण्याच्या बाबतीत असंच झालं होतं. ‘स्वदेस’ (Swades) चित्रपटातील रामलीला प्रसंगाच्या वेळचे ‘पल पल है भारी’ या गाण्याचे रेकॉर्डिंग राहिले होते आणि त्याचे चित्रीकरण मात्र लगेच करायचे होते! त्यामुळे घाईघाईत हे गाणं रेकॉर्डिंग करावं लागलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणं कुठल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड न होता ते महाबळेश्वर जवळच्या पाचगणी इथल्या एका हॉटेलच्या रूममध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं! खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
हे गाणं खरंतर गाणार होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक. परंतु इतके शॉर्ट पिरेडमध्ये ते येणे शक्यच नव्हते आणि मुंबईला जाऊन रेकॉर्डिंग करणे हे देखील शक्य नव्हते. तेव्हा संगीतकार ए आर रहमान यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी चक्क हॉटेलच्या रूममध्येच गाण्याचे रेकॉर्डिंग करायचे ठरवले. त्यासाठी गायिका मधुश्री आणि गायक विजय प्रकाश यांना त्यांनी पाचगणीला बोलावले. ए आर रहमान यांचा कॉल आहे म्हटल्यानंतर हे दोघेही तिथे ताबडतोब पोहोचलो. (Swades)
खरंतर गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आधी भरपूर रिहर्सल होणे गरजेचे असते परंतु आता प्रसंग असा होता की गाण्याचे शूटिंग उद्याच करायचं होतं त्यामुळे आजच्या आज गाणे रेकॉर्ड करणे गरजेचे होते. मधुश्री हिने सात ते आठ वेळा हे गाणे गाऊन रिहर्सल केली आणि मग डायरेक्ट टेक घ्यायचे ठरवले. त्या हॉटेलच्या रूममध्ये त्यावेळेला दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर, अभिनेता शाहरुख खान, गीतकार जावेद अख्तर तसेच संगीतकार ए आर रहमान यांचे म्युझिशियन असे वीस पंचवीस लोक होते. त्यांच्यासमोर फारशी प्रॅक्टिस न केलेले गाणे तिला गायचे होते.
तिने गायला सुरुवात तर केली पण पहिल्याच ओळीमध्ये ती अडकू लागली. ‘पल पल है भारी जो विपदा है आई…’ अशी ती ओळ होती. यातील ‘विपदा’ हा शब्द तिला नीट उच्चारता येत नव्हता. समोर सर्व मान्यवर मंडळी होते. त्यात जावेद अख्तर देखील होते ज्यांनी हे गाणं लिहिलं होतं. मधुश्रीने जावेद अख्तर यांच्याकडे पाहिले त्यांना त्या शब्दाचा उच्चार खटकत होता. ते बोलत जरी नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरूनच तिला सर्व स्पष्ट कळत होते. त्यामुळे ती खूप नर्वस होत होती. काही केल्या तिला तो शब्द नीट गाता येत नव्हता. काय करायचे?
संगीतकार ए आर रहमान यांना मधुश्रीची मनोव्यथा लक्षात आली. त्यांनी आपण एक कॉफी ब्रेक घेऊ यात आणि नंतर गाण्याचे रेकॉर्डिंग करू असे सांगितले. कॉफी ब्रेक घेतल्यामुळे वातावरण थोडेसे नॉर्मल झाले. या ब्रेकच्या काळामध्ये ए आर रहमान यांनी थोडीशी रचना बदलली. आता माईक अशा ठिकाणी लावला की मधुश्री जाताना तिच्यासमोर भिंत असेल. तिच्यासमोर कोणीच नसेल. सर्व मान्यवर मंडळी तिच्या पाठीशी असतील.
ही मात्रा मात्र लागू पडली. कारण मधुश्री आता भिंतीकडे पाहून गात होती. तिला कोणत्याही कलाकाराच्या चेहऱ्यावरची भावना दिसत नव्हती. एकाच टेकमध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं! त्यावेळी तिला असं सांगितलं होतं की आजची ही स्क्रॅच रेकॉर्डिंग आहे यानंतर याची फायनल रेकॉर्डिंग मुंबईला किंवा मद्रासला अलका याज्ञिकच्या आवाजामध्ये होईल. त्यामुळे मधुश्री थोडीशी रिलॅक्स होती. या गाण्यात तिच्यासोबत विजय प्रकाश यांचा स्वर होता. (Swades)
या गाण्यात आणखी एक तिसरा स्वर होता. तो कुणाचा माहिती आहे का? ऍक्च्युली हे गाणे रामलीला प्रसंगातील असल्यामुळे सीतेवर हे गाणे चित्रीत होतं. सीते करीता स्वर मधुश्रीचा होता. रामासाठी स्वर विजय प्रकाश यांचा होता. या गाण्यात रावण देखील काही ओळी गातो. या ओळी गाण्यासाठी मुंबईहून एक गायक कलाकार येणार होता. पण तो काही कारणामुळे न आल्याने रावणाच्या तोंडच्या ओळी चक्क आशुतोष गोवारीकर यांनी गायल्या!! सर्वांना असं वाटत होतं की स्क्रॅच रेकॉर्डिंग आहे त्यामुळे आशुतोष गोवारीकर यांनी देखील वेळ मारून दिली.
========
हे देखील वाचा : लता– मदनमोहन: भावा बहिणीच्या निरागस प्रेमाची सुरीली गाथा!
========
पण गंमत म्हणजे गाणं इतकं चांगलं झालं होतं की पुन्हा हे रेकॉर्डिंग झालंच नाही. सिनेमाच्या म्युझिक लाँचला जेव्हा मधुश्रीला बोलवलं त्यावेळी तिला आश्चर्य वाटलं कारण तिला वाटलं आपलं गाणं फक्त शूटिंग करीता रेकॉर्ड केलं आहे. पण जेव्हा म्युझिक लॉन्च करताना मधुश्रीने आपल्या स्वरातील गाणे ऐकले तेव्हा तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ए आर रहमान यांनी मोठ्या चलाखीने हे गाणं पाचगणीच्या एका हॉटेलच्या रूममध्ये गाणे रेकॉर्ड केले हे खरंतर खरं वाटत नाही पण ही बाब १००% सत्य आहे.
जाता जाता: थोडंसं स्वदेश या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचे कथानक एका रियल स्टोरीवरून घेतले आहे. मोहन भार्गव हे पात्र आणि त्याने नासामधील नोकरी सोडून भारतात परत येणे हा सर्व प्रकार एका भारतीय संशोधकाबद्दल झालेला आहे. त्यांचे नाव अरविंद पिल्लारमारी आणि रवी कुच्चीमंची त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव येथे हा प्रोजेक्ट सक्सेसफुली पूर्ण केला होता. (Swades)