सिनेमाचा ‘ट्रेंड’ बदलवणारा सनी देओलचा ‘घायल’!
दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Santoshi) यांनी १९९० साली आपल्या पहिल्याच चित्रपटाने क्लास आणि मास या दोन्ही क्षेत्रातील रसिकांना आकर्षित केले. चित्रपट होता “घायल”. हा सिनेमा १९९० चा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट होता. पहिला होता आमिर खानचा ‘दिल’. या ‘घायल’ चित्रपटाच्या मेकिंगची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे सुरुवातीला दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे असिस्टंट होते. ऐंशीच्या दशकातील निहलानी यांच्या हरेक चित्रपटाचे ते सहाय्यक होते. याच काळात त्यांनी घायल या सिनेमाचे स्क्रिप्ट लिहिलं.
या सिनेमाच्या मुख्य नायकाच्या भूमिकेत कमल हसन यांना घ्यावे असे त्यांच्या मनात होते पण हिंदी सिनेमामध्ये त्या वेळी कमल हसन डाऊन मार्केट होते. कमल हसन नायक आहे समजल्यावर कुणीही पैसे लावायला तयार नव्हते. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपल्या पहिल्या चित्रपटात कमल हसनला हिरोची भूमिका देता आली नाही. नंतर त्यांनी या भूमिकेसाठी सनी देओलचा विचार केला.
पुन्हा एकदा फायनान्सरने हात आखडता घेतला कारण तेव्हा सनीचे दोन चित्रपट ‘राम अवतार’ आणि ‘डकैत’ फ्लॉप झाले होते. त्यामुळे फायनान्सर कमल हसन आणि सनी देवल या दोघांवर पैसे लावायला तयार नव्हते. मग संतोषी (Santoshi) यांनी मिथुन चक्रवर्तीला प्रमुख भूमिका द्यायचे ठरवले आणि ते निर्मात्याच्या शोध घेवू लागले. मिथुनला भूमिका तर आवडली होती पण डेट्सचा प्रॉब्लेम होता.
याच काळात राजकुमार संतोषी यांची ए सुब्बाराव या निर्मात्यासोबत भेट झाली. त्यांना देखील कथानक आवडले आणि चित्रपट प्रोड्युसर होण्याचे त्यांनी मान्य केले. पण त्यांची अट एकच होती या चित्रपटात हिरो म्हणून संजय दत्त यांना घ्यावे. कारण त्यांच्या आधीच्या ‘जीते हे शान से’ या चित्रपटाचा नायक संजय दत्त होता. संजय दत्तला कथानक आवडले पण त्याने लगेच हा चित्रपट तो करू शकत नाही कारण त्याच्याकडे वेळच नव्हता असे सांगितले. आता काय करायचे? पुन्हा गाडी सनी देओलचा नावापाशी येवून थांबली. नंतर संतोषी (Santoshi) यांना असे लक्षात आले की निर्माते ए सुब्बाराव यांच्याकडेच पैशाची कमतरता आहे. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. काय करायचे?
शेवटी संतोषी (Santoshi) राजस्थानला ‘गुलामी’ या जे पी दत्तांच्या चित्रपटाच्या सेटवर जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी धर्मेंद्रची भेट घेतली आणि त्यांना ते कथानक ऐकवले. धर्मेंद्र त्यातील स्टोरी लाईन ऐकून प्रचंड प्रभावी झाले. ते म्हणाले, ”इतकी चांगली स्क्रिप्ट तू कशी काय लिहिलीस? तू काही यश चोप्राचा असिस्टंट नव्हता किंवा मेहरा यांचा. मग?” त्यावर संतोष यांनी सांगितले, ”सर, मी पी एल संतोषी यांचा मुलगा आहे!” पी एल संतोषी हे नाव ऐकल्यानंतर धर्मेंद्रने त्याला मिठीच मारली.
कारण धर्मेंद्रच्या स्ट्रगलिंग पिरेडमध्ये पी एल संतोषी यांनी त्यांना खूप मदत केली. धर्मेंद्रने संतोषी (Santoshi) यांना सांगितले, ”तू काही काळजी करू नको. हा चित्रपट आता मी प्रोड्यूस करत आहे. पैशाची काही काळजी करू नकोस. कामाला लाग.” चित्रपटातील हिरोचा विषय निघाला नंतर धर्मेंद्रने सनीचे नाव पुढे केले. परंतु संतोषी यांनी मिथुन चक्रवर्तीची माझे ऑलरेडी बोलणे झाले असे सांगितले. त्यावर धर्मेंद्रचे म्हणणे असे होते “मी मिथुनशी बोलून घेतो.” मिथुनसोबत धर्मेंद्रची बोलणे झाले. मिथुनने मोठ्या मनाने ही भूमिका सनी देओल देऊन टाकली. अशा प्रकारे सनी देवलचा ‘घायल’ या चित्रपटाचे शूट सुरू झाले.
‘घायल’ हा अतिशय जबरदस्त असा सिनेमा बनला होता. या सिनेमाने चित्रपटाची भाषा बदलवून टाकली. सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, अमरीश पुरी, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा. राज बब्बर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत बप्पी लहरी यांचं होतं. या सिनेमाला सात फिल्मफेअरचे अवॉर्ड्स आणि नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सनी देओलला स्पेशल ज्युरी अवार्ड मिळाले.
=========
हे देखील वाचा : ‘स्वदेस’मधील या गाण्याचे रेकॉर्डिंग हॉटेलच्या एका रूममध्ये केले होते!
=========
अमीर खान याचा ‘दिल’ आणि सनी देओलचा ‘घायल’ एकाच दिवशी म्हणजे २२ जून १९९० रोजी प्रदर्शित झाले आणि दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. असाच काहीसा प्रकार १९९६ साली ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘घातक’च्या रिलीजच्या वेळी आणि त्या नंतर २००१ साली ‘गदर: एक प्रेम कथा‘ आणि ‘लगान’च्या वेळी झाला होता. ‘घायल’ मधील ‘सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा…’ या गाण्याची ट्यून lambada band वरून घेतली होती. पंचवीस वर्षानंतर २०१६ मध्ये सनी देओलने ‘घायल’चा रिमेक स्वत: दिग्दर्शित केला!