आशय कुलकर्णीची ‘सुख कळले’ मालिकेत दमदार एन्ट्री! सौमित्रच्या भूमिकेने येणार रंजक वळण
कलर्स मराठीवरील ‘सुख कळले‘ या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवीन रंजक वळण येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. माधवच्या आकस्मिक निधनाने मिथिला कोलमडलीय खरी पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलल्याशिवाय गत्यंतर नाही हे तिला माहिती आहे. अनेक आव्हानं आता तिच्यासमोर आहेत पण मिथिलाला आता खंबीर व्हावेच लागणार आहे. एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता तिला घराबाहेर पडावे लागणार आहे. 10 वर्षे गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता मिथिला आयुष्याच्या या कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रूजू होण्यासाठी सज्ज होणार आहे.(Sukh Kalale Marathi Serial)
तर दुसरीकडे बाईने घरच सांभाळावं, तिनं कामासाठी बाहेर पडू नये, अशी विमल आत्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोट्यांवर परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. ‘सुख कळले‘ मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की ,सौमित्रच्या आगमनामुळे मालिकेत एक नवं वळण आलं आहे. सौमित्रचे साधेपण, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे दिसून येत आहे. सौमित्रला कवितांचा शौक आहे आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा खरेपणा आहे. ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करेल. हसमुख, मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्रचा स्वभाव आहे.
पैशापेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देणाऱ्या सौमित्रच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल. आशय कुलकर्णीने साकारलेली सौमित्रची भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरेल, यात शंका नाही. ‘सुख कळले‘ मालिकेत पुढे काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
============================
============================
सौमित्रच्या प्रवेशाने मालिकेत नवी उर्जा आणि नवे वळण आले असून अभिनेता आशय कुलकर्णीच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सौमित्रची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल हे नक्कीच!’सुख कळले’ ही मालिका सोमवार ता शुक्रवार रात्री 9 वाजता आपल्या कलर्स मराठीवर आपल्याला पाहता येईल.