‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ या चित्रपटाने भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय सिनेमा अशी कीर्ती प्राप्त केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. ही कमाल पटकथाकार आणि संवाद लेखक सलीम जावेद आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची होती या चित्रपटात आपल्या सचिन पिळगावकर (Sachin) यांनी ‘अहमद’ची भूमिका साकारली होती. ही भूमिका लांबीने छोटी जरी असली तरी महत्त्वपूर्ण अशी होती. अमिताभ बच्चन आणि सचिन पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करत होते.
त्यातील एक सीन तुम्हाला आठवतच असेल अहमद (सचिन)ला गब्बरचे लोक पकडतात आणि त्याची हत्या करून त्याची डेड बॉडी घोड्याच्या पाठीवर टाकून गावात पाठवून देतात. गावात आल्यानंतर ही डेड बॉडी अमिताभ बच्चन खाली उतरवतो. खूप तणाव वाढवणारा आणि काळजाचा ठाव घेणारा हा सीन होता. या प्रसंगाची चित्रीकरण होणार होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी एक सीनियर आर्टिस्ट म्हणून एका तरुण कलाकाराला एक सल्ला द्यावा म्हणून सचिनला काही टिप्स दिल्या. अमिताभ बच्चन सचिन (Sachin) यांना असं म्हणाले की, “हा प्रसंग चित्रित होत असताना तुझी बॉडी शक्य तेवढी स्टिफ ठेव कारण मृत्यूनंतर माणसाची शरीर हे कडक बनलेले असते!” सचिनने देखील खूप चांगल्या पद्धतीने हा शॉट दिला.
अमिताभ बच्चन यांनी सचिनचे (Sachin) अभिनंदन करून विचारले, ”तुझा हा कितवा चित्रपट आहे?” त्यांना वाटले सचिन हा नवीन कलाकार आहे त्याचे पाच सहा चित्रपट आले असतील म्हणून त्यांनी विचारले, ”हा तुझा कितवा चित्रपट आहे?” त्यावर सचिनने सांगितले, ”हा माझा साठावा सिनेमा असेल!” अमिताभ बच्चन याला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सचिनला विचारले, ”तुझे आता वय किती आहे?” त्याने सांगितले “सतरा!” अमिताभला हा एक मोठा धक्का होता. ”तू चित्रपटात काम करायला कधी सुरुवात केलीस?” त्यावर सचिन म्हणाला, ”वयाच्या चौथ्या वर्षी. तुम्हाला १९६२ सालचा राजा परांजपे यांचा ‘हा माझा मार्ग एकला’ हा सिनेमा माहित असेलच. तो माझा पहिला सिनेमा. ज्याला राष्ट्रपती पदक मिळाले होते!”
आता अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारले सोडून दिले. तो थक्क झाला होता. कारण अमिताभ बच्चन १९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमामध्ये पहिल्यांदा आला होता तर सचिन १९६२ साली! ‘शोले’ पूर्वी अमिताभ बच्चन यांचे वीसेक सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यातील ‘जंजीर, अभिमान, बॉम्बे टू गोवाचा अपवाद वगळता बहुतांशी फ्लॉप झाले होते. तर दुसरीकडे सचिनचे (Sachin) त्याच्या तिप्पट सिनेमे तोवर प्रदर्शित झाले होते! तेव्हा अमिताभ बच्चन हात जोडत सचिन यांना म्हणाले, “‘यु आर सीनियर दॅन मी’ तू माझ्यापेक्षा वयाने लहान असलास तरी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये तू मला सीनियर आहेस!” म्हणून त्याने कडक सॅल्यूट ठोकला.
बालकलाकार म्हणून सचिनचा साठच्या दशकामध्ये मोठा दबदबा होता. मीनाकुमारीसोबत मझली दीदी, शम्मी कपूरसोबत ब्रह्मचारी, देवानंदसोबत ज्वेल्थ थीफ, दिलीप कुमारसोबत बैराग, संजीव कुमारसोबत बचपन हे त्याचे त्या काळातील गाजलेले सिनेमे. या सर्व चित्रपटांमध्ये सचिन जवळपास लीड रोलमध्ये असायचे. बालकलाकार म्हणून सचिनला (Sachin) दोन वेळेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलावंत म्हणून पारितोषिके मिळाली. १९६२ साली ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी जेव्हा सचिन दिल्लीला गेला होता त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रेमाने त्याला आपल्या मांडीवर बसून घेतले होते.
========
हे देखील वाचा : शाहरुख खान हा ‘देवदास’चा पहिला चॉईस नव्हता?
========
त्यानंतर १९७१ साली ‘अजब तुझे सरकार’ या चित्रपटासाठी सचिनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर (Sachin) यांची कारकीर्द जितकी गाजली तितकी नायक म्हणून गाजली नाही. पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी जबरदस्त कामगिरी सिनेमाच्या दुनियेत केली. नव्वदच्या दशकाच्या अखेरीस त्यांनी टीव्ही चॅनलवर देखील अनेक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला त्यांच्या गाजलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शोले’ अमिताभ आणि सचिन यांच्यातील रिलेशन हे कायम चांगले राहिले. सचिन याच्या ‘हाच माझा मार्ग’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला अमिताभ बच्चन उपस्थित होते.