‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बेटे से बाप सवाई?
सर्वसाधारणपणे आपल्याकडे असा प्रघात आहे की आई-वडिलांनी आधी गायलेली गाणी पुढे त्यांची मुले गातात. यामध्ये आपल्या पालकांच्या कलेला ती एक प्रकारची आदरांजली असते. पण एकदा मात्र प्रकार उलटा झाला. गायक अमित कुमार (Amit kumar) यांनी एक बंगालीमध्ये गाणं गायलं होत. काही वर्षानंतर याच चालीवर त्यांचे वडील किशोर कुमार यांनी हिंदीमध्ये गाण गायलं. दोन्ही गाणी एकाच संगीतकाराने स्वरबद्ध केली होती. त्यामुळे ट्यून ढापाढापीचा काही प्रश्न नव्हता. गंमत म्हणजे किशोर कुमार यांनी गायलेले गाणं हे जास्त लोकप्रिय झालं. त्या मानाने ओरिजनल अमित कुमार यांचे गाणे आज कुणाला आठवत देखील नाही.
‘बापसे बेटा सवाई’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण इथे मात्र ‘बेटे से बाप सवाई!’ असा उलटा प्रकार झाला होता. कोणतं होतं ते गाणं? आणि काय होतं नक्की हा किस्सा? गायक अमित कुमार यांनी अलीकडेच एका रेडिओवरील मुलाखतीत हा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता. किशोर कुमार यांची गायकी बघत बघतच अमित कुमार (Amit kumar) मोठा झाला होता. त्यामुळे संगीतकार राहुल देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी तो एक फॅमिली मेंबरच होता.
किशोर कुमारच्या बऱ्याच रेकॉर्डिंगला तो सोबतच असायचा. त्यामुळे अनेक म्युझिशियनसोबत सुद्धा त्याची चांगली दोस्ती झाली होती. पंचम यांच्याकडे एक म्युझिशियन होते भानू गुप्ता ते स्वतः चांगले हार्मोनिका प्लेयर तर होतेच शिवाय ते गिटार देखील चांगली वाजवायचे. ‘शोले’ चित्रपटातील हार्मोनिका पिसेस सर्व त्यांनीच वाजवले होते. ते एक प्रतिभाशाली कलाकार होते.
एकदा अमित कुमारसोबत बोलता बोलता त्यांनी एक ट्यून ऐकवली होती. अमितकुमारने (Amit kumar) ही ट्यून पंचमला ऐकवली. पंचमला देखील ती धून खूप आवडली. ते प्रचंड प्रभावित झाले. नंतर भानु गुप्ता, पंचम आणि अमित कुमार या तिघांनी या ट्यूनला आणखी रिफाईन केले. त्याचवेळी संगीतकार आर डी बर्मन एका बंगाली अल्बमच्या रेकॉर्डिंगमध्ये बिझी होते, हा एक डिवोशनल सॉंगचा अल्बम होता. पंचमने हि ट्यून येथे वापरायचे ठरवले. या ट्यूनवर अमित कुमार यांच्या स्वरात एक गाणे त्यांनी गाऊन घेतले गाण्याचे बोल होते ‘जेयो ना जेयो ना’.
या अल्बममधील हे गाणे सपन चक्रवर्ती यांनी लिहिलं होतं. तो अल्बम बंगालमध्ये रिलीज झाला लोकांना चांगला आवडला. पण बंगालच्या बाहेर मात्र त्याबद्दल फारसं कोणाला माहित नव्हतं. नंतर काही वर्षांनी आर डी बर्मन सुनील दत्त यांच्या रॉकी या सिनेमाला संगीत देत होते. त्यात एक हळुवार प्रेमगीत होते. हे गीत स्वरबध्द करताना पंचमला अमितकुमारने (Amit kumar) गायलेलं ते बंगाली गीत आठवलं. त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांना ती धून ऐकवली वर त्यावर शब्द लिहायला सांगितले. आनंद बक्षी यांना ती धून बेहद आवडली लगेच त्यांनी त्यावर शब्द पेरले ‘क्या यही प्यार है हां यही प्यार है दिल तेरे बिन कही लगता नही वक्त गुजरता नही क्या यही प्यार है….’ लता किशोरच्या स्वरात हे युगल गीत तयार झाले.
========
हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
========
१९८१ साली ‘रॉकी’ सोबतच आणखी एका स्टार पुत्राचे कुमार गौरवचे आगमन रुपेरी पडद्यावर झाले होते. चित्रपट होता ‘लव्ह स्टोरी’. या चित्रपटातील अमित कुमारने (Amit kumar) गायलेल्या ‘याद आ रही है’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट गायकाचे नॉमिनेशन मिळाले होते. किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘कुदरत’ या चित्रपटातील ‘हमे तुमसे प्यार कितना’ या गाण्यासाठी त्यांना देखील फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते. आता लढाई बाप बेट्यात होणार होती. पण अवॉर्ड मात्र अमित कुमारला मिळाले! तेव्हा किशोर कुमारने अमित कुमारला फोन करून सांगितले होते, ”आज बेटे तुने मुझे हरा दिया!” आणि स्टेजवर अमित कुमारला हे अवॉर्ड देण्यासाठी दस्तूर खुद्द किशोर कुमार उपस्थित होते!