दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
किशोर कुमारचे हे अप्रतिम रॅप ब्रेथलेस सॉंग दुर्लक्षितच राहिलं!
अभिनेता, पार्श्वगायक, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार, संकलक अशा सर्वच प्रांतात अफलातून मुशाफिरी करणारा कलावंत म्हणजे किशोर कुमार! या हरफनमौला किशोर कुमार यांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात कहर लोकप्रियता मिळवली. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीला उंचीवर नेण्याचे काम किशोरच्या स्वरांनी केलं होतं. किशोर कुमार (Kishore kumar) हे अजब रसायन होतं. त्याच्याबाबतच्या अनेक कथा आणि दंतकथा आज देखील फिल्मी दुनियेत मोठ्या चवीने ऐकल्या जातात ऐकवल्या जातात.
किशोर कुमार पैशाच्या बाबतीत खूपच दक्ष असायचे. पैसा मिळाल्याशिवाय ते कुठलेही काम करायचे नाही. ते बऱ्यापैकी कंजूस होते. अशा अनेक कथा त्यांच्याबाबत सांगितल्या जातात. किशोर कुमारच्या कंजूषणाच्या कथा जशा फेमस आहेत तशाच त्यांनी अनेक लोकांना अडचणीच्या वेळी भरीव मदत देखील केली आहे. त्यामुळे किशोर कुमारचे कमालीचे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व हे समजायला खूप कठीण आहे. कुठल्या प्रसंगात ते कसे वागतील हे ब्रह्मदेवाला देखील सांगता यायचे नाही. असाच एक विनोदी प्रसंग अमित कुमार यांनी एका उपग्रह वाहिनीला मुलाखत देताना सांगितला होता.
या प्रसंगांमध्ये किशोर कुमारचा (Kishore kumar) स्वभाव आणि त्याची प्रतिभा या दोघांचे मनोहरी दर्शन घडते. हा किस्सा घडला होता १९७३- ७४ साली. त्यावेळी अभिनेता विश्वजीत स्वतः एक चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित करीत होते. या चित्रपटाचे नाव होतं ‘कहते है मुझको राजा’. या त्यांची नायिका रेखा होती. या चित्रपटात धर्मेंद्र-हेमा मालिनी आणि शत्रुघन सिन्हा यांच्या देखील छोट्या भूमिका होत्या. या सिनेमाच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसचा हा धमाल किस्सा आहे. या चित्रपटातील गाणी लिहिली होती मजरूह सुलतानपूरी यांनी. तर चित्रपटाला संगीत होतं आर डी बर्मन यांचे.
एका गाण्याच्या करिताची म्युझिकल सिटींग चालू होती. आर डीच्या धुनवर मजरूह यांनी एक गाणं लिहून किशोर कुमारकडे (Kishore kumar) दिलं. किशोरला ते गाणं खूप आवडलं. त्याला लगेच आर डी बर्मन यांनी साजेशी चाल देखील लावली. रिहर्सल झाल्या आणि आता रेकॉर्डिंग करण्याचा दिवस उजाडला. किशोर कुमारची एक स्टाईल होती. त्याचा पीए कम ड्रायव्हर अब्दुल नावाचा एक इसम होता. हा अब्दुल किशोर कुमारचे सगळे पैशाचे व्यवहार सांभाळायचा. किशोर कुमार आणि अब्दुलमध्ये एक कोडवर्डची लँग्वेज ठरलेली होती.
गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आधी किशोर कुमार अब्दुल्लला आवर्जून मोठ्याने विचारायचा, ”अब्दुल चाय मिली क्या?” जर पैसे मिळाले असतील तर अब्दुल म्हणायचा, ”हा दादा मिल गई” आणि पैसे मिळायचे असतील तर तो म्हणायचा, ”नही दादा अभी तक चाय नही मिली!” ‘कहते है मुझको राजा’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सर्व तयारी झाली असताना किशोर कुमार यांनी मोठ्या आवाजात अब्दुल्लला जो बाहेर बसला होता त्याला विचारले, ”अब्दुल चाय मिली क्या?” तो म्हणाला,” नही दादा अभी तक नही.” किशोर कुमारने (Kishore kumar) परत त्या गाण्याकडे पाहिले पुन्हा रिहर्सल सुरू केली. टाईम पास सुरु केला. पुन्हा काही वेळानंतर तोच प्रश्न आणि तेच उत्तर. असे तीन चार वेळा झाले. बाहेर प्रोडक्शनच्या लोकांना हा प्रकार नवीन होता. ते म्हणाले, ”अरे अभी तक सुबह से तुझे तीन चार बार चाय तो हमने दि है फिर भी?” त्यांना कुठे कोडवर्ड लँग्वेज माहिती होती?
नंतर किशोर कुमार रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडला जाताना मजरूह यांना म्हणाला, ”दादा मै जरा चाय पीकर आता हूं” जाताना तो गाण्याचा कागदसुद्धा सोबत घेऊन गेला आणि अब्दुल्ल घेऊन तो स्टुडिओच्या बाहेर पडला. थोड्यावेळाने चित्रपटाची निर्माते दिग्दर्शक अभिनेता विश्वजीत आले जेव्हा त्यांना कळालं की किशोर कुमार रेकॉर्डिंग न करताच बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा किशोर कुमार (Kishore kumar) पुन्हा रेकॉर्डिंग हजर झाले. आज मात्र विश्वजीतने कालची चूक पुन्हा करायची नाही असे ठरवले होते. त्यांनी आल्या आल्या अब्दुलच्या हातामध्ये पैशाचे पाटील दिले. किशोर कुमारने आतून विचारले, ”अब्दुल, चाय मिली क्या?” त्यावर अब्दुल म्हणाला, ”हां दादा, अभी चाय मिल गई!” त्यावर किशोर कुमार खुश झाला म्हणाला, ”चलो दादा रेकॉर्डिंग करते है. लाईये वो गाणे का कागज दिजीये” त्यावर मजरूह म्हणाले, ”वो कागज तो आप कल साथ लेके गये न!” तेव्हा किशोरच्या डोक्यात प्रकाश पडला. तो कागद तर आपण सोबत घेऊन गेलो होतो. आता कुठे गेला?
त्याने अब्दुल्ला गाडीमध्ये कागद आहे का पाहायला सांगितले. अब्दुल हात हलवीत परत आला आणि म्हणाला, ”गाडी में कागज नही है!” नंतर अब्दुल आठवत म्हणाला, ”दादा , कल हमने जाते वक्त रस्ते में वडापाव खाया था. उसके बाद आपने एक गाडी मे से कागद निकाल कर उसको अपना हाथ साफ किया और बाहर फेक दिया. मुझी लगता है शायद वही कागज….” आता सर्वांनी डोक्याला हात लावला. कारण त्यावेळेला झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हता. आता किशोर कुमार तयार होता पण गाणं तयार नव्हतं काय करायचं? मग किशोर कुमारने टुमकन उडी मारून आर डीला बोलावले आणि सांगितले, ”गाना बनाना क्या मुश्कील बात है भाई? गाना अभी हम बनाते है.”
असं म्हणून किशोर कुमार (Kishore kumar) स्वतः पेन आणि कागद घेऊन बसला आणि स्वतःच्या शैलीत गात ‘बम चिकी बम बम बम चिकी बम बम’ असेच अर्थहीन शब्द टाकत गाणं बनवू लागला. पुढे जाऊननंतर मजरूहला देखील तो प्रकार आवडला. त्यांनी देखील त्यामध्ये काही शब्द टाकले. आरडीसुद्धा अधून मधून इनपुटस देत होता. अशा प्रकारे सगळ्यांच्या कम्बाईन एफर्टमध्ये गाणं तयार झालं! आणि त्याच दिवशी संध्याकाळी या गाण्याचे रेकॉर्डिंग देखील झाले. गाण्याचे बोल होते ‘बम चिकी चिकी बम चिकी चिकी‘ दुर्दैवाने ‘कहते है मुझको राजा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे हे गाणं फारसं लोकांच्या समोर आलंच नाही. परंतु हे गाणं एक रॅप ब्रेथलेस सॉंग होतं. किशोर कुमारच्या गाण्यातील एक वेगळं गाणं होतं. अगदी ‘झुमरू’च्या टायटल सॉंग इतकं भारी होतं. अजून मी कुठल्याही ऑर्केस्ट्रामध्ये हे गाणं गाताना कुठल्याही कलाकाराला पाहिले नाही. तुम्ही देखील गाणं नक्की पहा युट्युबवर उपलब्ध आहे. त्याची लिंक देखील मी खाली देतो आहे. तर असा होता किशोर कुमार!