प्रेग्नंसीच्या प्रवासाची गंमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एक दोन तीन चार’ !
सध्या मोठ्या पडद्यावर अनेक वेगवेगळ्या विषयांवरील प्रयोग होत आहेत. त्यात मुलं, प्रेग्नंसी यांसारखे नाजुक विषय योग्य पद्धतीने मांडणं हे तसं जोखमीचंच काम ! आज समाजात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मूल होत नाही किंवा काही कारणांमुळे त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागतो. त्यातून निर्माण होणारा ताणतणाव, नवरा-बायकोचं वैयक्तिक नातं, आर्थिक जबाबदाऱ्या, घरगुती वातावरण या व अश्या अनेक गोष्टी मोठ्या पडद्यावर सगळ्यांनाच सहजतेने हाताळता येत नाही. पण, याला अपवाद म्हणता येईल तो ‘एक दोन तीन चार‘ हा चित्रपट! (Ek Don Teen Chaar review)
ही गोष्ट आहे समीर (निपुण धर्माधिकारी) व सायली (वैदेही परशूरामी) या एका कूल यंग कपलची! या दोघांच्या आयुष्यात अचानक एक ‘गुडन्युज’ येते. त्यामुळे त्यांच्या लव्हस्टोरीला वेगळंच वळण येतं. पुढे डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना समजतं की त्यांना एक नाही, दोन नाही, तर एकाच वेळी चक्क चार बाळं होणार आहेत. त्यामुळे दोघांनाही आनंद होतो आणि धक्का देखील बसतो. त्यांच्या या प्रेग्नंसीच्या प्रवासाची गंमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एक दोन तीन चार’! (Ek Don Teen Chaar review)
आजच्या काळातील भाषा व आजच्याच काळातील माणसं हा योग्य मेळ साधता आल्यामुळे चित्रपटाची कथा अधिक खुलून आली आहे. इतका नाजुक व तणावपूर्ण विषय असूनही त्यांची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात चित्रपटाचा लेखक निपुण धर्माधिकारी व वरूण नार्वेकर यांचं करावं तेवढं कौतुक कमीच! कारण ही मांडणी प्रत्येकालाच जमते असं नाही. प्रत्येक कलाकारातील संवाद हा खरा वाटतो. खासकरून,भावनिक दृष्यांत कोणताही अतिरेकीपणा, कृत्रिमपणा व वाक्यांचा भडिमार नसल्यामुळे चित्रपट सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तसेच, चित्रपटातील विनोद ही आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल! ते ऐकताना चेह-यावर अलगद हसू उमटतं. सहज शब्दफेकीमुळे होणारे सततचे विनोद अजिबातच अतिशयोक्ती केल्यासारखे किंवा ओढूनताणून केल्यासारखे वाटणार नाहीत याची लेखकाने विशेष काळजी घेतली आहे.
अभिनयाबाबत बोलायचं झालं तर, सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. वैदेही जितकी सुंदर दिसते तितकाच सहजसुंदर अभिनय तिनं केला आहे. लेखन, संवाद, अभिनय अश्या तिहेरी भूमिकांच्या अट्टाहासात अनेकदा मूळ कथा ढासळली जाते किंवा अभिनय तरी गंडतो. परंतु, निपुणने ही कामगिरी अतिशय सहजतेने पार पाडली आहे. या दोघांचं पडद्यावरचं Tunning, प्रत्येक टप्प्यावरचा साधा सोपा वावर चित्रपटाला खिळवून ठेवण्यात वरचढ ठरतो. डॉक्टरांच्या महत्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर यांना पाहिल्यावर आपल्याही आयुष्यात असेच गोड व कूल डॉक्टर असावेत असं प्रत्येक जोडप्याला वाटेल हे अगदी खात्रीने सांगता येईल.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकतरी असा मित्र असतो, जो कोणत्याही परिस्थितीत जोक मारून वातावरण नॉर्मल ठेऊ शकतो आणि कायम आपल्याबरोबर असतो! अश्या धमाल मित्राच्या भूमिकेत करण सोनावणे फिट बसला आहे. चित्रपटाचा मूळ विषय हा फक्त समीर-सायली यांच्या भोवती फिरत असल्यामुळे यात इतर पात्रांना फारसा वाव नाही. परंतु अतिशय प्रेमळ, Supportive आईवडिलांच्या भूमिकेत हृषिकेश जोशी, शैलजा काणेकर, मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भूमिका अगदी चोख बजावल्या आहेत. तर, योगेश शिरसाट, बालकलाकार मैथिली पटवर्धन यांनी साकारलेल्या छोट्या भूमिका देखील मनात घर करतात. (Ek Don Teen Chaar review)
प्रत्येक कलाकाराचा पडद्यावरील वावर हा वेशभूषेमुळे फ्रेश वाटतो. बाकी संगीत, बॅकग्राऊंड स्कोअर हलकंफुलकं व गरजेपुरतं असल्यामुळे त्याचा सतत भडिमार केल्यासारखं वाटत नाही. याच्या जोडीला सौरभ भालेराव यांचं ‘गुगली गुगली’ व प्रथमच मराठीत पदार्पण करणा-या यशराज मुखाटे याचं ‘लव चुंबक’ ही वेगळ्या धाटणीची गाणी अनोख्या चालीमुळे ती श्रवणीय वाटतात. या गाण्याचे बोल, त्यातील शब्द हे अगदी रोजच्या वापरातले व आजच्या काळातील असल्यामुळे ऐकताना मज्जा येते व ही गाणी आपलीशी वाटतात. चित्रपट संपला तरी ही गाणी कानात वाजत राहतात.
आता वळूया काही तांत्रिक बाबींकडे! दिग्दर्शक ‘वरूण नार्वेकर’ यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने हा चित्रपट अधिक सुंदर झाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये काहीतरी वेगळेपण जाणवतं. परंतु, या सगळ्यात एक-दोन गोष्टी दिग्दर्शकाच्या हातून सुटल्या आहेत. जसं की, एका सीनमध्ये समीर सायलीला मिठी मारून रडताना त्याच्या डोळ्यावर चष्मा नसतो पण तो बाजुला होतो तेव्हा डोळ्यावर चष्मा दाखवला आहे. आणखी एका लग्नाच्या सीनमध्ये सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे परंतु कंटीन्यूटीमध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही. संपूर्ण चित्रपट उत्तम झाल्यामुळे या लहानश्या पण महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. परंतु दिग्दर्शकाने या लहानसहान गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. (Ek Don Teen Chaar review)
=========
हे देखील वाचा : मनोरंजनाच्या ‘अल्याड’ व लॉजिकच्या ‘पल्याड’ असलेला सुमार भयपट
=========
अनेकदा असं होतं की, मध्यांतरानंतर चित्रपट रटाळ वाटू लागतो किंवा पडद्यावरील कथानक पाहताना तेवढ्यापुरता त्याचा त्रास, तणाव नकळत आपल्यालाही येतो. परंतु, हा चित्रपट पाहताना पुढे काय घडतंय याची उत्सुकता जास्त निर्माण झाल्यामुळे शेवटपर्यंत तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपटाच्या शेवटी एक अशी घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण कथाच फिरते. त्यानंतर समीर-सायली ‘बे एके बे’ च राहतात की त्यांचे ‘बे दुणे चार’ होतात हे जाणून घेण्यासाठी ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Teen Chaar review) हा चित्रपट एकदातरी चित्रपटगृहात जाऊन पाहायलाच हवा.
‘कलाकृती मिडिया’तर्फे या चित्रपटाला देण्यात येत आहेत चार स्टार्स !