ए आर रहमान यांचा पहिला हिंदी सिनेमा: रंगीला
नव्वदच्या दशकामध्ये दक्षिणेकडून संगीताचे एक मोठे वादळी येऊन बॉलीवूडला धडकले होते. हे अनोखं संगीत होतं ए आर रहमान (A. R. Rahman) यांचं. त्यांनी ‘रोजा’ (१९९२) या चित्रपटापासून संगीत द्यायला सुरुवात केली. पण हा चित्रपट मूळ तमिळ होता. त्याचे हिंदी व्हर्शन लगेच आपल्याकडे आले. पुढची दोन-तीन वर्ष ए आर रहमान यांचे अनेक चित्रपट हिंदीत डब होऊन आले होते. त्यात सर्वात गाजला ‘हम से है मुकाबला’ आणि ‘बॉम्बे’. त्यामुळे ए आर रहमानच्या संगीताची जादू इथल्या बॉलीवूड रसिकांना कळाली होती.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमासाठी ए आर रहमान यांना साइन केले. चित्रपट होता ‘रंगीला’. आमिर खान–उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जबरदस्त म्युझिकल हिट सिनेमा ठरला. पण ए आर रहमान यांच्या कामाची पद्धत बघून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अक्षरशः वैतागला होता आणि नाराज देखील झाला होता! हा चित्रपट बनतो की नाही आणि बनल्यानंतर याचे संगीत चालते की नाही याची चिंता त्याला लागून राहिली होती!
‘रंगीला’ या चित्रपटाचे म्युझिक मेकिंगचा एकेक किस्से जबरदस्त आहेत. ए आर रहमान यांनी राम गोपाल वर्मा यांना चेन्नईहून एक टेप पाठवली. त्यामध्ये ‘रंगीला’तील पहिले गाणे त्यांनी स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून पाठवले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘याई रे याई रे जोर लगाके नाचे रे हे’ गाणं ऐकल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी डोक्याला हात लावला. आफ्रिकेमध्ये जंगलात एखाद्या प्राण्याला बोलवण्यासाठी आवाज दिला असे त्याला वाटत होतं. कारण एकतर हे गाणं रहमान याने आवाजात रेकॉर्ड करून पाठवले होते. राम गोपाल वर्मा यांच्यासाठी ए आर रहमान (A. R. Rahman) यांना आपल्या चित्रपटात संगीत देण्यामागचे कारण रोजा चित्रपटातील गाणी हेच होतं. म्हणून थेट मणीरत्नम यांच्याशी रामगोपाल वर्मा यांचे बोलणं झालं होतं आणि त्यांनीच ए आर रहमानची शिफारस केली होती.
गाण्याच्या सीटिंगसाठी ए आर रहमान (A. R. Rahman) आणि राम गोपाल वर्मा दोघे गोव्याला गेले. दोघे वेगवेगळ्या कॉटेजमध्ये दोघे राहू लागले. तीन चार दिवस झाले. एकाही गाण्याची ट्यून बनत नव्हती. शेवटी दोघांनाही दुसरी कामे असल्यामुळे ते रिकाम्या हाताने निघाले! राम गोपाल वर्मा प्रचंड नाराज झाले. ते रहमान यांना म्हणाले, ”गेली चार दिवस आपण गोव्यामध्ये आहोत आणि एकही गाण्याची ट्यून आपण तयार करू शकलो नाही!” त्यावर या रहमान निरागसपणे म्हणाले, ”यापुढे जेव्हा तुम्ही मला गाण्याच्या सीटिंगसाठी एखाद्या हॉटेलमध्ये उतरवाल त्यावेळेला एक लक्षात ठेवा. त्या हॉटेलच्या रूममध्ये टीव्ही नसला पाहिजे! कारण मागचे चार दिवस मी फक्त टीव्हीच पाहत होतो!” म्हणजे चार दिवस फक्त ए आर रहमान यांनी टीव्हीच पाहिला होता.
ए आर रहमान (A. R. Rahman) पुढे म्हणाले, ”पण तरी एक गोष्ट चांगली झाली. या काळात मी ‘मुगल ए आजम’ हा चित्रपट पाहिला. त्यातील बडे गुलाम अली खान यांनी गायलेली रचना ऐकली आणि आपल्याकडे चित्रपटात भारतीय संगीताचा किती चांगला वापर होतो हे पुन्हा एकदा लक्षात आले आहे. आपल्या अभिजात संगीताने सिनेमा किती संगीत समृद्ध झालं आहे. त्याचा सिनेमात किती चांगल्या पध्दतीने वापर करता हे माझ्या लक्षात आलं! मी आता चेन्नईला गेल्यानंतर तुम्हाला गाणे टेप करून पाठवतो!” नंतर राम गोपाल वर्मा मुंबईला गेले या रहमान चेन्नईला गेले.
काही दिवसांनी ए आर रहमान यांनी एक गाणं टाईप करून पाठवला गाण्याचे बोल होते, ”हाय रामा ये क्या हुआ’ राम गोपाल वर्माला पुन्हा ते बोल आणि गाणे थोडे विचित्र वाटले. त्यांनी मणीरत्नम यांना पुन्हा कॉन्टॅक्ट करून ते गाणे ऐकवले आणि विचारले, ”अशी गाणी बॉलीवूडमध्ये चालतील कां?” त्यावर मणी यांचे म्हणने होते, ”चांगलंच आहे नक्कीच चालेल.” तरी या वर्मा याच्या मनात शंका होतीच त्यांनी ए आर रहमान यांना विचारलं, ”हे असं म्युझिक गाणी नक्की चालेल नं?” त्यावर रहमान यांचे उत्तर होतं, ”खात्री बाळगा. नक्की चालेल.” त्यानंतर हे गाणं हरिहरन आणि स्वर्णलता यांच्या आवाजात रेकॉर्ड करून जेव्हा राम गोपाल वर्माला ऐकवले तेव्हा राम गोपाल म्हणून अक्षरशः आपल्या खुर्चीतून उडाला. इतके हे जबरदस्त गाणं होते!
=========
हे देखील वाचा : किशोर कुमारचे हे अप्रतिम रॅप ब्रेथलेस सॉंग दुर्लक्षितच राहिलं!
=========
त्याने रहमानला मिठी मारून आपल्या पसंतीची दाद दिली. ‘रंगीला’ची पुढची सगळी गाणी जबरदस्त बनली. आशा भोसले यांनी ‘याई रे याई रे’ हे गाणं गायलं होतं. उदित नारायण ने ‘क्या करे या ना करे ये कैसी मुश्किल हाय’ हे गाणं गायलं होतं. कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात ‘प्यार ये जाने कैसा हे’ गाणं होतं. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात ‘यारो सुन लो अपुन का ये कहना’ हे गाणे होते. ए आर रहमान (A. R. Rahman) आणि श्वेता शेट्टी यांच्या आवाजात ‘मंगता है क्या’ हे अफलातून गाणं होतं आणि आशा भोसले यांच्या स्वरात ‘तनहा तनहा यहा पे जीना’ हे गाणं होतं. सर्व गाणी मेहबूब यांनी लिहिली होती आणि जबरदस्त बनली होती. ‘रंगीला’ हा चित्रपट ए आर रहमान याचा पहिला हिंदी चित्रपट आणि पहिल्याच चित्रपटात त्याने सणसणीत षटकार मारला होता!