‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण आहे तरी कोण?
‘बिग बॉस (Big Boss Marathi) मराठीच्या नव्या सीझनला दणक्यात सुरुवात झाली आहे. यावेळी घरांत ज्येष्ठ अभिनेत्री ‘वर्षा उसगांवकर’ यांच्यापासून ते अगदी छोटा पुढारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती पाहायला मिळतायत. पण, या सगळ्या सदस्यांत गुलीगत धोका स्टार ‘सूरज चव्हाण’ याची घरातली एन्ट्री प्रेक्षकांसाठी सध्या तुफान चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, हा ‘सूरज चव्हाण’ नक्की आहे तरी कोण, तो इथपर्यंत कसा पोहोचला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चला तर पाहूया त्याचा आजवरचा हा प्रवास!(Suraj Chavan)
सूरज (Suraj Chavan) हा मूळचा बारामतीचा! बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावात तो वास्तव्यास आहे. सुरजचा जन्म अत्यंत गरीब व छोट्या कुटुंबात झाला. अशातच लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आई- वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्याचा स्वभाव फार भोळा व मृदू आहे. लहानपणापासून त्याने गरिबीत हलाखीचे दिवस पाहिले. त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. त्याचं शिक्षण हे ८ वी पर्यंतच झालं आहे. त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली. एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला ‘टिक टॉक’ या ॲपबद्दल सांगितलं. त्यानंतर सुरजने बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. आणि अचानक तो व्हायरलही झाला, त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला व तो व्हिडिओ बनवू लागला. तो टिक टॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले. मदतदेखील करू लागले.
कालांतराने भारतात ‘टिक टॉक’ बॅन झालं. त्यानंतर सूरजला युट्युबवरील ‘प्रेमासाठी काहीपण’ या सीरिजसाठी विचारणा झाली. त्यानंतर त्याने ‘बुक्कीत टेंगुळ’ हे व्हिडिओ केले. मागोमाग त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारणा झाली. आज सूरजचे युट्यूब व इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
========
हे देखील वाचा : ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं अस काय घडलं?
=========
सूरजने (Suraj Chavan) शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली. आता तो ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहे. घरातील सदस्यांशी बोलताना त्याने आपण युट्यूबमधुन दिवसाला तब्बल ८०,००० रूपये कमावतो असे सांगितले.
खरंतर सूरजला ‘बिग बॉस’च्या (Big Boss Marathi) घरात पाहताच अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केलीये. परंतु त्याचा इथवर पोचण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सूरज आता ‘बिग बॉस’च्या घरात तो कसा ‘गुलीगत’ धुमाकूळ घालतो हे पाहणं रंजक ठरणार आहे!