दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
हरिहरन: गायकीवर प्रचंड हुकूमत असलेला प्रतिभा संपन्न कलाकार
आपल्या गझल गायकीने रसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या हरिहरन (Hariharan) या पार्श्वगायकाला तब्बल 15 वर्ष प्लेबॅक सिंगिंग करता संघर्ष करावा लागला. खरंतर गझल गायकीमध्ये त्यांचं मोठं नाव होतं पण त्यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात यायचं त्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. त्या काळच्या नामवंत संगीतकारांकडे त्यांनी गायलं देखील होतं पण एकतर ते चित्रपट चालत नव्हते किंवा पूर्ण देखील होत नव्हते. त्यामुळे हरिहरन यांना रेकॅग्निशन मिळायला खूप वेळ लागला. हरिहरन हे उत्तम गायक तर आहेतच शिवाय चांगले संगीतकार देखील आहेत. इंडियन फ्युजन म्युझिकचे एका अर्थाने ते पायोनियर देखील आहेत. त्यांना खरी ओळख ज्या चित्रपटापासून मिळाली ते गाणं त्यांना खूप लकीली मिळाले आणि या गाण्यापासूनच जनसामान्यांमध्ये हरिहरन पोहोचले. कोणतं होतं ते गाणं आणि कोण होते त्या गाण्याचे संगीतकार?
हरिहरन (Hariharan) यांचा जन्म ३ एप्रिल १९५५ ला मुंबईमध्ये झाला. संपूर्ण नाव हरीहरन अनंथा सुब्रामनी घरातच कर्नाटकी संगीताचं उत्तम वातावरण होतं. १९७७ साली हरिहरन ऑल इंडिया सूरसिंगार कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले आणि तिथे ते विजेते देखील ठरले. या स्पर्धेचे संगीतकार जयदेव हे जज होते. त्यांनी लगेच काही दिवसांनी हरिहरन यांना आपल्या ‘गमन’ या चित्रपटात एक गझल गाण्यासाठी बोलावले. ‘अजीब सा नेहा मुझपर गुजर गया यारो….’ ही त्यातील गझल खूप चांगली गायली होती.
यानंतर मात्र पुढची पंधरा वर्षे हरिहरन (Hariharan) यांना पार्श्वगायनासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या काळाबद्दल सांगताना हरिहरन सांगतात, ”या काळात माझी अनेक गाणी रेकॉर्ड होत होती. पण एकतर हे चित्रपट पूर्णच होत नव्हते किंवा पूर्ण झाले तरी रिलीज होत नव्हते. या काळात अनेक नामवंत संगीतकारांकडे त्यांनी गाणी गायली.” खरंतर ऐंशीचे दशक हे भारतामध्ये गझल गायकी करणाऱ्या गायकांचे दशक होते. पंकज उधास, तलत अझीझ, जगजीत सिंग, निर्मल उधास, अनुप जलोटा यांच्या अनेक नॉन फिल्मी गझल्सच्या कॅसेट्स मार्केटमध्ये येत होत्या. यात हरिहरन यांचा देखील मोठा सहभाग होता. पण त्यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात यायचं आणि ती संधी त्यांना योगायोगाने मिळाली तब्बल पंधरा वर्षानंतर.
एकदा संगीतकार ए आर रहमान ज्या वेळी ते जिंगल्स बनवत होते; मुंबईला आले आणि एका जिंगलसाठी त्यांनी हरिहरन यांचा स्वर वापरला. रेकॉर्डिंग नंतर त्यांनी हरिहरन यांना सांगितले, ”मी तुमच्या आवाजाचा मोठा फॅन आहे!” हरिहरन यांच्यासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट होती. ते म्हणाले, ”कसे काय?” त्यावेळी रहमान म्हणाले, ”माझ्याकडे तुमच्या गझलच्या सर्व कॅसेट आहेत आणि त्या मी रोज ऐकत असतो. लवकरच मी मणीरत्नम यांच्या एका चित्रपटाला संगीत देणार आहे. या सिनेमात तुम्ही माझ्या संगीत नियोजनात गाणे गावे अशी माझी इच्छा आहे!”
अशा पद्धतीने ए आर रहमान यांच्या ‘रोजा’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. हे त्यांचे पहिले तमिळ पार्श्वगायन होते. ‘रोजा’ हा या रहमान यांचा देखील पहिलाच चित्रपट होता. याच ‘रोजा’चे हिंदी वर्जन देखील आले. यामध्ये हरिहरन (Hariharan) यांनी दोन गाणी गायली होती. टायटल सॉंग ‘रोजा जानेमन’ आणि ‘भारत हमको जान से प्यारा है….’ हे दुसरे गीत कमालीचे लोकप्रिय ठरले. यानंतर हरिहरन यांना पुन्हा कधी मागे वळून पाहावे लागले नाही.
========
हे देखील वाचा : जेव्हा चार दिग्गज स्वर एका गाण्यासाठी एकत्र येतात…
========
१९९६ साली कलोनियल कझिन्स हा एक बँड त्यांनी आणि लेस्ले लेविस या दोघांनी निर्माण केला. यातून इंडियन फ्युजन म्युझिक प्रारंभ झाला. ए आर रहमान यांचे हरीहरन (Hariharan) हे अतिशय लाडके गायक ठरले. त्यांच्या अनेक चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. तू ही रे तू ही रे तेरे बिना मै कैसे जिऊ, चंदा रे चंदा रे कभी तो जमी पर बैठेंगे बाते करेंगे, ऐ हैरते आशिकी, यूं हि चला चल हि गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. २००४ साली राष्ट्रपती ए पी जे कलम यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. हरिहरनचे मराठी कनेक्शन म्हणजे ‘जोगवा’ या चित्रपटातील ‘जीव रंगला दंगला’ हे अजय-अतुल यांच्या संगीत नियोजनात गायलेले हरिहरन यांचे गाणे प्रचंड गाजले. या गाण्याला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला!