‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ सिनेमातील गाणे चित्रित करायला दिग्दर्शक राजू हिरानी तयार नव्हते.
दिग्दर्शक राजकुमार हिरानी (rajkumar hirani) यांचा पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ १९ डिसेंबर २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले होते. आज देखील हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील भाषा ही टपोरी बम्बईया आहे. चित्रपटातील गाणी देखील मुन्नाभाई संजय दत्तच्या कॅरेक्टरला साजेशी अशीच होती. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डोक्यात हा विषय खूप वर्षापासून होता आणि त्यांनी मन लावून तब्येतीनं हा चित्रपट बनवला होता.
चित्रपटातील प्रत्येक बाबीवर त्यांचे बारकाईने लक्ष होते. सिनेमातील पात्रांची निवड करताना ते खूप सतर्क होते. त्यामुळे सिनेमातील सर्वच कॅरेक्टरला स्वतंत्र ओळख मिळाली. मग ते जिमी शेरगिलचे जहीर खानचे पात्र असो की यतीन कार्येकर यांचे आनंद बॅनर्जीचे पात्र असो. अभिनेता बोमन इराणीचा हा पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमातील गाणी पिक्चरच्या जॉनर नुसार टपोरी स्टाईलची होती कारण चित्रपटातील नायकाचे कॅरेक्टरच मुळात टपोरी होते. ‘सुबह हो गई मामू’, ‘एम बोले तो बोले तो’, ’देखले आंखो में आंखे डाल’, ’अपुन जैसे टपोरी’ ही सारी गाणी भन्नाट होती. राहत इंदोरी आणि अब्बास टायरवाला यांनी लिहिलेल्या या गीतांना संगीत अन्नू मलिकचे होते.
या चित्रपटात आणखी एक गाणं होते जे सिनेमाच्या एकूणच प्रकृतीला मॅच न होणार आहे. गाण्याचे बोल होते ‘छन छन मन गाये क्यू….’ दिग्दर्शक राजकुमार हिरानी (rajkumar hirani) यांनी हे गाणं विनोद राठोड आणि श्रेया घोशाल यांच्या स्वरात रेकॉर्ड करून घेतलं होतं. परंतु हे गाणं सिनेमात घ्यावं की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. याचे कारण एक टपोरी नायक इतके सुंदर रोमँटिक गाणे कसे काय जाऊ शकतो? हा प्रश्न त्यांच्या मनात कायम येत होता. याचे कारण सिनेमातील नायकाचा अटायर आणि टपोरी स्टाईल या मुळे ते हे हळुवार प्रेम गाणं चित्रित करायला कचरत होते. शेवटी हा चित्रपट पूर्ण होत आला पण या गाण्याचे शूट मात्र झाले नाही. काय करायचे? प्रश्न पडला.
पहिलाच सिनेमा असल्याने ते द्विधा मनस्थितीत होते. तेव्हा त्यांच्या मदतीला धावून आलेत प्रदीप सरकार! ते या सिनेमाचे संकलक होते. त्यांनी दिग्दर्शक राजू हिरानी यांना असे सांगितले की, ”हा बॉलीवूडचा रोमँटिक चित्रपट आहे त्यात एक तरी लव सॉंग पाहिजे!” त्यावर राजू हिरानी यांचे म्हणणे असे होते, ”पण हे गाणे चित्रपटातील कॅरेक्टरला शोभणारे असे नाही. सिनेमाचा नरेटीव्ह यामुळे बदलेल.” त्यावर प्रदीप सरकार म्हणाले, ”असं काही नाही. आपण हे गाणं ड्रीम सॉंग म्हणून सिनेमात युज करूत. स्वप्नामध्ये व्यक्ती वास्तवात नसलेल्या अनेक गोष्टी पाहू शकते. ती व्यक्ती वेगवेगळे रूप घेते वेगवेगळ्या कॅरेक्टर नुसार वागत असते त्याचा वास्तवाशी काही संबंध नसतो आणि भारतीय प्रेक्षकांना याची सवय आहे.”
प्रदीप सरकार यांचे बोलणे राजू हिरानी (rajkumar hirani) यांना पटत होते पण मान्य होत नव्हते. शेवटी प्रदीप सरकार यांनी सुवर्ण मध्य काढला आणि ते म्हणाले तसं असेल आणि तुमची हरकत नसेल तर हे गाणे मी चित्रित करतो. जर तुम्हाला योग्य वाटत असेल ठेवा नाही तर काढून टाका.“ अशा पद्धतीने प्रदीप सरकार यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील केवळ एक गाणे पिक्चराइज केले नंतर हे गाणे सर्वांना दाखवले. सर्वांनी त्या गाण्याची कौतुक केले. मुख्य म्हणजे संजय दत्त याला ते गाणे खूप आवडले. अशा पद्धतीने हे गाणे चित्रपटात राहिले.
=========
हे देखील वाचा : संजीव कुमारच्या डाएटची कथा आणि व्यथा!
=========
प्रदीप सरकार यांना या गाण्यासाठी डायरेक्टर ऑफ द सॉंग असे विशेष क्रेडिट देण्यात आले ! या सिनेमाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात पुरस्कार प्राप्त केला. फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यात या सिनेमाला सात नामांकने मिळाली. त्या पैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले, सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका (संजय दत्त), सर्वोत्कृष्ट संवाद (अब्बास टायरवाला) ही पारितोषिके मिळाली!