‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
फिरोज खानची रुपेरी पडद्यावरील ‘वेलकम’मधील शेवटची भूमिका !
भारतीय सिनेमातील स्टायलिश हिरो म्हणून ज्याचा कायम उल्लेख होतो ते म्हणजे अभिनेता फिरोज खान(Feroz Khan). हॉलीवुडची स्टाईल आणि इंडियन इमोशन्स या दोघांची सुंदर मेळ घालत फिरोज खान यांनी चित्रपट बनवले. १९७२ साली आलेल्या ‘अपराध‘ या चित्रपटापासून ते निर्माता व दिग्दर्शक बनले. पहिल्या सिनेमा पासूनच सिनेमाचा स्टायलिश लूक, कथानकातील थरार, चकाचक लोकेशन्स आणि हटके संगीत यामुळे प्रेक्षक फिरोज खान यांच्या चित्रपटाला गर्दी करू लागले. ‘अपराध’ या चित्रपटातील कार रेस तर काळजाचा ठोका चुकणारी होती.
त्यानंतर आला ‘धर्मात्मा’. गॉडफादरची कम्प्लीट छाया असलेला हा चित्रपट अफगाणिस्तानमध्ये शूट केला होता. त्या देशात शूट केलेला हा पहिला भारतीय सिनेमा होता. त्यानंतर १९८० साली फिरोज खानचा सर्वाधिक यशस्वी ‘कुर्बानी’ हा चित्रपट आला. या चित्रपटाने भारतीय सिनेमाची सर्व गणितच बदलून टाकले. त्यानंतर ‘जांबाज’, ‘दयावान’, ‘एल्गार’ हे त्यांचे सिनेमे आले. या सर्व सिनेमांना त्यांनी एक स्टायलिश लुक दिला होता. हॉलीवूडच्या काऊ बॉय इमेजच त्यांना आकर्षण होतं. त्यामुळे फिरोज खानचा सिनेमातील लूक, त्याची हॅट, लेदरच जाकीट, पिस्तोल…. सर्वच भारी होतं.
नव्वदच्या दशकामध्ये मात्र फिरोज खान यांनी कामे करणे कमी केलं होतं. काही गेस्ट अपियरंस त्यांनी चित्रपटातून केले होते. त्यांचा मुलगा फरदीन खान याचा ‘नो एन्ट्री’ हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्यासोबत फिरोज खान (Feroz Khan) यांची मिटिंग झाली. फिरोज खानचा लूक बघून बज्मी यांनी त्यांना आपल्या आगामी ‘वेलकम’ या चित्रपटात काम करणार का? असे विचारले. त्यावर फिरोज खान यांनी सांगितले की,” मी आता चित्रपटात काम करणे कमी केले आहे. त्यामुळे मी सिनेमात काम करू शकत नाही.” पण बज्मी यांनी फिरोज खान यांना सिनेमात काम करायला राजी केले.
‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या बॉसच्या भूमिकेत तितकाच तगडा कलाकार त्यांना हवा होता आणि ही भूमिका फिरोज खान (Feroz Khan) यांनी करावी अशी त्यांची इच्छा होती. फिरोज खान राजी झाल्यानंतर त्यांनी काम सुरु केले. या सिनेमात त्यांना फक्त चार सीन होते आणि क्लायमॅक्स सीन होता. पण आज आपण ‘वेलकम’ हा चित्रपट आपण फिरोज खान शिवाय विचार देखील करू शकत नाही. इतका इम्पॅक्ट फिरोज खानचा या चित्रपटावर होता. फिरोज खानची चित्रपटातील एन्ट्रीच्या वेळी जे बॅकग्राऊंड म्युझिक होतं ते अनीस बज्मी यांनी काढलं आणि तिथे फिरोज खानच्या चित्रपटातील गाणे बॅकग्राऊंडला टाकले.
त्यामुळे सिनेमाला एक वेगळा उठाव आला. संपूर्ण टक्कल असलेला स्टायलिश फिरोज खान आरडीएक्स नावाने चित्रपटात वावरला आणि हा सिनेमा त्याने अक्षरशः खाऊन टाकला! या सिनेमाचे डबिंग होत असताना फिरोझ खान यांच्या लक्षात आलं यातील एक डायलॉग एडिट झाला आहे. त्याने अनीस यांना फोन लावला. तेंव्हा ते त्या ऑस्ट्रेलियात शूटिंग करत होते. त्यावेळी फिरोज खान यांनी विचारले, ”अरे माझा तो डायलॉग कुठे गेला? तो डायलॉग तर चित्रपटाची जान आहे.” अनीस यांनी तिथून आपल्या एडिटरला फोन करून चौकशी केली आणि तो डायलॉग पुन्हा सिनेमात राहिला!
========
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमातील गाणे चित्रित करायला दिग्दर्शक राजू हिरानी तयार नव्हते.
========
“आपल्या सिनेमाविषयी इतकं पॅशन असला माणूस मी पाहिला नाही” असं अनीस बज्मी यांनी सांगितलं होतं. ‘वेलकम’ हा चित्रपट २१ डिसेंबर २००७ ला प्रदर्शित झाला. त्यानंतर मात्र फिरोज खान चित्रपटापासून लांबच राहिला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला फिरोज खान (Feroz Khan) पुढे कॅन्सरचा शिकार झाला आणि २७ एप्रिल २००९ रोजी त्यांचे निधन झाले. एखाद्या राजाची एक्झिट त्याच्या शान प्रमाणे व्हावी असा त्याचा आरडीएक्स हा रोल होता!