दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लता मंगेशकर यांनी गायक रूपकुमार राठोड यांना दिला बहुमोल संदेश
सिनेमात एखाद्या भूमिकेसाठी पार्श्वगायन करायचं असेल तर त्या व्यक्तिरेखेचा आधी अभ्यास करणे गरजेचे असते. त्यानुसार त्याच्या इमेजला सूट होईल अशा पद्धतीने पार्श्वगायन करायचं असतं. पूर्वाच्या काळी या पध्दतीने ध्वनीमुद्रण होत असे. एकाच सिनेमात रफी नायक आणि कॉमेडीयन दोघांसाठी गात असे. तेव्हा दोन्ही व्यक्तीरेखे करीता आवाजात व्हेरीएशन दिसत असे. (Roopkumar Rathod)
(आठवा मधुमतीमधील टूटे हुये ख्वाबोने आणि जंगल में मोर नाचा ही गाणी) अर्थात अलीकडच्या काळामध्ये असा विचार किती पार्श्वगायक करत असतील हा प्रश्नच आहे! पण पूर्वीच्या काळी सर्व आघाडीचे गायक गायिका हा विचार आवर्जून करायचे. विशेषता लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, तलत मेहमूद, मोहम्मद रफी, मुकेश ही मंडळी आपण कोणत्या कॅरेक्टरसाठी प्लेबॅक देत आहोत याचा आधी शोध घेऊन त्या व्यक्तिरिखेला साजेसे पार्श्वगायन केले जायचे!
लता मंगेशकर तर याबाबत खूपच दक्ष असायच्या. पडद्यावर लहान मुलीसाठी जायचं असेल तर त्यांचा आवाज कमालीचा वेगळा आणि इनोसंट असायचा. सुनील दत्त यांच्या ‘दर्द का रिश्ता’ (१९८३) या चित्रपटात बेबी खुशबू या बालकलाकारासाठी लताने केले होते गाणं होतं “कौन हू क्या नाम है मेरा मै कहा से आई हु मै परियो के शहजादी मै आसमा से आई हु…” गाणं गाताना त्यांचे वय जवळपास ५५ वर्षे होतं. पण लताच्या स्वरावर आयुर्मानाचा कधीच परिणाम जाणवला नाही. हे तंत्र लताने तिच्या सोबतच्या सह गायकांना आणि गायिकांना देखील सहजपणे शिकवलं होतं.
रूपकुमार राठोड (Roopkumar Rathod) या पार्श्वगायकाने याबाबतचा एक खूप चांगला किस्सा मध्यंतरी समाज माध्यमावर शेअर केला होता. रूपकुमार राठोड खरं तर क्लासिकल म्युझिक गाणारे! त्यामुळे चित्रपटात पार्श्वगायन करायचं तंत्र वेगळं असतं हे कदाचित त्याला माहीत नसावे. लता मंगेशकर यांनी त्यांना हे तंत्र अगदी नकळतपणे सहज शिकवले. २००२ साली ‘लाल सलाम’ हा एक चित्रपट आला होता. या सिनेमाला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. यात एक युगलगीत होतं जे लता मंगेशकर आणि रूप कुमार राठोड गाणार होते.
लता मंगेशकरसोबत गाणं जायचं याचं टेन्शन रूपकुमार यांना आलं होतं. रेकॉर्डिंगचे तंत्रज्ञान बऱ्यापैकी आधुनिक असल्यामुळे युगलगीत जरी असले तरी रेकॉर्डिंग मात्र वेगवेगळे होणार होते. रूपकुमार राठोड यांनी फेमस स्टुडिओमध्ये जाऊन आपला भाग गायला. सर्वांना त्यांचे पार्श्वगायन खूप आवडले. दुपारी लता मंगेशकर स्टुडिओमध्ये आल्या. त्यांनी त्यांच्या वाटणीचा भाग अवघ्या पंधरा मिनिटात गाऊन रेकॉर्ड केला. त्यानंतर सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. रूप कुमारने(Roopkumar Rathod) सहज लता मंगेशकर यांनी गायलेला पोर्शन ऐकून पाहिला आणि त्यांच्या तुलनेत आपलं गायन खूपच खराब झालं आहे. याची त्याला जाणीव झाली. त्याने लगेच हृदयानाथ मंगेशकर यांना ती गोष्ट सांगितली.
ते म्हणाले “मला तर काही वावगं वाटत नाही.” पण तरी रूपकुमार म्हणाले, ”आपण पुन्हा एक टेक घेऊयात.” पं हृदयानाथ मंगेशकर म्हणाले, ”ओके. चालेल. लगेच घेवूयात.” पण रूपकुमार म्हणाले, ”आता नको. लता मंगेशकर स्टुडिओमध्ये आहेत. त्या गेल्यानंतर एक टेक घेऊयात.” पण लता मंगेशकर इतरांसोबत हास्य विनोद, गप्पामध्ये इतक्या गुंग झाल्या की संध्याकाळी आठ वाजले तरी स्टुडिओतच होत्या. इकडे रुपकुमार राठोड (Roopkumar Rathod) त्यांच्या जाण्याची वाट पहात होते. लतासमोर गाण्याचे त्यांना दडपण आले होते. शेवटी हृदयानाथ मंगेशकर यांनी रुपकुमार यांना सांगितले, ”हे बघ रेकॉर्डिंग करायचं असेल तर आत्ताच करावं लागेल कारण उद्या हे गाणे शूटिंगला जाणार आहे. लता दिदीचे टेन्शन घेवू नका.”
रूपकुमार (Roopkumar Rathod) ओके म्हणून रेकॉर्डिंगसाठी रूममध्ये गेले खरे पण स्टुडिओमध्ये लता मंगेशकर आहे म्हणून ते खूप नर्वस होते आणि गाण्यातील एका क्लासिकल लाईनवरसारखा रिटेक होत होता. सर्वजण वैतागले. लता सर्व प्रकार पाहत होत्या. शेवटी त्या रेकॉर्डिंग रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, ”हे बघ तू ज्या कॅरेक्टरसाठी गात आहेत तो सिनेमात एक डॉक्टर आहे. त्याला क्लासिकलची काहीही जाण नाही. त्यामुळे विनाकारण क्लासिकल गायचा प्रयत्न करू नकोस. आपण व्यक्तिरेखेनुसार गायचे असते!”
=========
हे देखील वाचा : अब्दुल हाईचे साहिर लुधियानवी कसे झाले?
=========
लता मंगेशकर यांच्या दोन वाक्याने रूपकुमार यांचे टेन्शन कुठल्या कुठे पळाले आणि पुढच्याच टेकमध्ये ते गाणं ओके झालं. लता मंगेशकर देखील खुश झाल्या त्या म्हणाल्या, ”अरे आपण नेहमी दुसऱ्यासाठी प्लेबॅक करत असतो आपण काय आपल्यासाठी गात नसतो. कुठल्या तरी दुसऱ्या कॅरॅक्टरसाठी गात असतो. त्यामुळे त्या कॅरेक्टरचा सिनेमातील रोल लक्षात घेऊन आपण गायला पाहिजे!” रूपकुमार राठोड (Roopkumar Rathod) यांच्यासाठी हा एक फार मोठा धडा होता आणि पहिल्याच गाण्यांमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून हा बहुमोल संदेश त्याला मिळाला होता. गीताचे बोल होते ‘मितवा लई जैयो…’