गीतकार आनंद बक्षी भर पावसात बोरीवली ते सांताक्रुझ चालत गेले !
मुंबई महानगरात आल्यानंतर प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला तोंड देत जो टिकतो तोच पुढे यशस्वी होतो. गीतकार आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्याबाबत असंच झालं होतं. फार मोठा लढा त्यांनी येथे दिला होता. खरंतर लष्करात त्यांना चांगली नोकरी होती. पण मन रमत नव्हतं. मुंबई महानगरीत येऊन आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न त्यांचा यापूर्वी झाला होता पण तो असफल झाल्यानंतर पुन्हा एकदा १९५६ साली ते लष्करातील नोकरी कायमची सोडून ते मुंबईत आले. आता मात्र त्यांच्यासाठी करो या मरो अशी स्थिती होती.
ते रोज निर्मात्याच्या ऑफिसमध्ये खेटे घालत पण काम मिळत नाही. खिशातले पैसे देखील संपत चालले होते. एकदा त्यांना कळालं की मास्टर भगवान यांच्या ‘भला आदमी’ या चित्रपटासाठी एका गीतकाराची गरज आहे ते ताबडतोब मा. भगवान यांना जाऊन भेटले आणि त्यांना आपली गाणी ऐकवली. भगवान यांनी सांगितले, ”गाणी चांगली आहेत पण चित्रपटाच्या सिच्युएशनसारखी गाणी हवी आहेत. तुम्हाला नव्याने लिहावी लागतील.” असे म्हणून त्यांनी पंधरा दिवसाचा अवधी दिला. आनंद बक्षी (Anand Bakshi) यांनी झपाट्याने चार गाणी पुढच्या चार दिवसात घेऊन काढली आणि भगवान दादाकडे ते गेले. त्यांना ती गाणी खूपच आवडली आणि लगेच ९ नोव्हेंबर १९५६ या दिवशी आनंद बक्षी यांच्या पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले!
चित्रपटाचे संगीतकार होते निसार बज्मी (हे नंतर पाकिस्तानात निघून गेले!) चित्रपटाची गाणी तयार झाली पण चित्रपट मात्र प्रदर्शित झाला नाही. या चार गाण्यांचे मानधन म्हणून तब्बल दोनशे रुपये मिळाले. काही दिवस बरे गेले पण पुन्हा संघर्ष सुरू झाला. दिवसभर निर्मात्यांच्या ऑफिसचे चक्कर काटून आनंद बक्षी (Anand Bakshi) कंटाळले होते. पण घरी जायचे तरी कसे? कुठले तोंड घेऊन? घरच्या आठवणीने आपल्या छोट्या मुलीच्या आठवणीने ते खूप रडत असत. मुंबईच्या मरीन लाईन स्टेशनवर रात्र रात्र ते गावी जाणाऱ्या गाडीकडे पाहत बसायचे .त्यांना कधी कधी वाटायचं पुन्हा आपण आपल्या गावी जावं पण पुन्हा कर्तव्याची जाणीव व्हायची.
एकदा असेच प्लॅटफॉर्मवर एका फलाटावर ते बसलेले असताना एक तिकीट चेकर तिथे आला आणि त्यांनी तिकीट विचारले. बक्षी यांच्याकडे तिकीट नव्हते. टीसी म्हणाले फाईन भरा. बक्षी यांच्याकडे तितके देखील पैसे नव्हते. टीसीने आनंद बक्षी यांच्या हातात एक वही बघितली. त्यात उर्दूमध्ये काही तरी लिहिलं होतं. ते म्हणाले, ”हे काय आहे?” त्यावर बक्षी म्हणाले, ”मी शायर आहे काही रचना लिहील्या आहेत.” टीसीने त्या रचना बघितल्या त्यांना त्या आवडल्या आणि म्हणाले, ”फार सुंदर लिहिल्या आहेत” त्यावर आनंद बक्षी (Anand Bakshi) म्हणाले, ”याचा काय उपयोग? या रचनांना मुंबई महानगरीत काही किंमत नाही. त्यामुळे मी माझ्या गावी जायचा विचार करतो आहे.” त्यावर टीसी म्हणाले, ”असा कुठलाही विचार करू नका. मुंबई हेच तुमचं कार्यक्षेत्र आहे. इथेच राहा.” त्यावर आनंद बक्षी यांनी आपली कर्मकहाणी ऐकवली.
टीसीला दया आली त्यांनी कॅन्टीनमधून चहा आणि समोसा मागवला आणि त्यांना सांगितले, ”जर तुमचे हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी राहू शकता. मी एकटाच बोरवलीला राहतो. तुम्ही माझ्या घरी राहून चित्रपटात काम मिळते का याचा प्रयत्न करा!” आनंद बक्षी (Anand Bakshi) यांना फार मोठा आधार मिळाला. या टीसीचे नाव होते चित्रमल स्वरूप! पुढचे चार वर्ष बक्षी त्यांच्याच घरी राहत होते. चित्रमल स्वरूप खऱ्या अर्थाने देव माणूस होते. ते रोज ऑफिसला जाताना दोन रुपये आनंद बक्षी यांच्या खिशात ठेवून द्यायचे. कारण दिवसभर ते मुंबईत भटकत असायचे महालक्ष्मीला फेमस स्टुडीओ, दादरला कारदार स्टुडीओ तर गिरगावला फिल्मीस्तान स्टुडीओ.
===========
हे देखील वाचा : लता मंगेशकर यांनी गायक रूपकुमार राठोड यांना दिला बहुमोल संदेश
===========
दिवसभर दोन घास खाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असावेत म्हणून ते पैसे द्यायचे. १९५९ साली आनंद बक्षी यांची संगीतकार रोशन यांच्याशी ओळख झाली. रोशन यांनी त्यांना घरी बोलावले. आनंद बक्षी यांना वाटलं की आता आपल्यासाठी प्रगतीची दारे उघडली आहेत. पण त्या रात्री मुंबईमध्ये इतका प्रचंड पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी रेल्वे, बस, लोकल, ट्राम सर्व बंद. पण आनंद बक्षी (Anand Bakshi) मनाशी म्हणाले, ”आज जर मी गेलो नाही तर रोशन मला कधीच माफ करणार नाही.” म्हणून ते भर पावसात चक्क चालत चालत बोरिवली होऊन थेट सांताक्रुझला गेले.
तुफान पाऊस चालू होता. छत्री घेऊन आणि आपल्या कवितांची डायरी घेऊन ते निघाले. वाटेत पावसामध्ये त्यांची चप्पल तुटली! अनवाणी ते चालत राहिले. डोक्यावरची छत्री काढून त्यात कवितांची वही ठेवली भिजू नये म्हणून! चार तास पायपीट केल्यावर ते रोशन यांच्या घरी पोचले. त्यांना या मुसळधार पावसात आलेलं पाहून रोशन म्हणाले, ”अरे तू माणूस आहे की भूत? अशा वातावरणात यायची काही गरज होती का?” त्यावर आनंद बक्षी (Anand Bakshi) म्हणाले, ”तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी येणं खूप गरजेचं होतं!” रोशन यांनी त्याला कोरडे कपडे दिले. गरम जेवायला दिलं. पुढे संगीतकार रोशनसोबत अनेक आनंद सिनेमे बक्षी यांनी केले!