किस्सा हेमलताच्या एकमेव फिल्मफेअर विजेत्या गाण्याच्या रेकॉर्डींगचा!
गायिका हेमलता (Hemlata) यांना ‘चितचोर’ या चित्रपटातील ‘तू जो मेरे सूर में…’ या गाण्यासाठी पहिले आणि एकमेव फिल्मफेअर पारितोषिक मिळालं होतं. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनचा होता आणि बासू चटर्जी यांचे दिग्दर्शन होते. संगीत रवींद्र जैन यांचं होतं. अतिशय लो बजेट असलेला हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या सिनेमाचे बव्हंशी चित्रीकरण महाबळेश्वर परिसरात झाले होते. यातील सर्वच गाणी खूप सुरेली होती. हेमलताने गायलेल्या या गाण्याच्या रेकोर्डिंग दिवशी मात्र तिचे आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती. हेमलता प्रचंड नाराज झाली होती ती हे गाणे गाणारच नव्हती. ती रागारागाने रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाहेर पडणार होती पण नंतर प्रकरण लवकरच शांत झाले मिटले आणि या सुरीला गाण्याचा जन्म झाला! काय होता हा किस्सा?
पार्श्वगायिका हेमलता (Hemlata) यांनी एका कार्यक्रमात उद्धृत केला होता. १९७६ साली आलेल्या ‘चितचोर’ या चित्रपटातील गाणी हेमलता आणि येसुदास यांनी गायलेली होती. अतिशय कमी बजेट असल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. या चित्रपटात दोन युगलगीते होती. ‘जब दीप जले आना जब शाम ढले आना’ हे यमन रागातील गाणं येसुदास आणि हेमलता (Hemlata) यांनी गायलेलं होतं तर याच चित्रपटातील ‘तू जो मेरे सुर में…’ हे पिलू रागावर आधारीत गाणं या दोघांनीच गायले होते.
चित्रपटाचे बजेट कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी कॅल्क्युलेटेड पद्धतीने होत होते. म्युझिशियनस किती बोलवायचे, एका दिवशी किती गाणे रेकॉर्ड करायचे या सगळ्याच एक बजेट होतं. नेमकं पहिल्या युगल गीताच्या वेळी हेमलता (Hemlata)ला रेकॉर्डिंगला यायला उशीर झाला. येसुदास तिची वाट पाहत थांबले. पण हेमलता हिला मुंबईत त्या दिवशी नेमका उशीर झाला. ती आली. नंतर लगेच गाणे रेकॉर्ड झालं पण हेमलता उशिरा येणं ही गोष्ट रवींद्र जैन यांना अजिबात आवडली नव्हती.
गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांनी हेमलताला खूप झापले आणि निर्वाणीच्या स्वरात ते म्हणाले की, ”तू माझ्या गुरुची पं जयचंद भट यांची मुलगी आहेस. म्हणून मी तुझ्याकडून गाणे गाऊन घेतले. नाही तर दुसरीला कुणी असती तर मी केव्हाच बाहेर काढले असते!” हे ऐकल्यानंतर हेमलता प्रचंड नाराज झाली. ती चक्क रुसून बसली आणि रेकोर्डिंग स्टुडीओच्या बाहेर पडू लागली. अजून दुसरे युगलगीत गायचे बाकी होते. सर्वांनी तिला खूप समजून सांगितले. पण तिच्या डोक्यात प्रचंड राग होता.
ती संतापून रवींद्र जैन यांना म्हणाली, ”तुम्ही माझी हीच किंमत केली का? यापूर्वी तुम्ही मला जी गाणी दिली ती केवळ मी तुमच्या गुरुची मुलगी आहे म्हणून दिली का? माझं काहीच कर्तृत्व नाही का?” आता रवींद्र जैन शांत झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली ते म्हणाले, ”बेटा, माझा म्हणण्याचा तो उद्देश नव्हता. मला माफ कर. पण ही फिल्म लाईन आहे इथे स्ट्रेस खूप असतो. मगाशी रागाच्या भरात मी तसं बोलून गेलो माझं तसा काही बोलण्याचा उद्देश नव्हता. मला समजून घे.” हेमलता (Hemlata) हिने देखील मोठ्या मनाने माफ केले आणि दुसरे युगल गीत रेकॉर्ड झाले. गाण्याचे बोल होते ‘तू जो मेरे में…’ हे गाणं तर इतकं अप्रतिम झालं की या गाण्याला हेमलताला फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.
===========
हे देखील वाचा : गायक शान: आमीर खानसाठी गाताना का नर्व्हस होता?
===========
या चित्रपटातील ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ या गाण्यासाठी येसुदास यांना फिल्मफेअरचे अवार्ड मिळाले. हेमलता आणि रवींद्र जैन यांनी राजश्री प्रोडक्शनसाठी खूप गाणी गायली. रवींद्र जैन तर राजश्री प्रोडक्शनचे अतिशय लाडके संगीतकार होते. १९७३ सालच्या ‘सौदागर’ पासून २००६ सालच्या ‘विवाह’ पर्यंत राजश्रीच्या जवळपास वीस चित्रपटातली गाणी रवींद्र जैन यांनी स्वरबद्ध केले होते. हेमलता (Hemlata) आणि रवींद्र जैन या कॉम्बिनेशनची देखील भरपूर गाणी होती. आंखियो के झरोको से, सुनयना, नैय्या, दुल्हन वही जो पिया मन भाये, नदिया के पार या सर्व चित्रपटातील गाणी आज देखील रसिकांना आठवतात. गुरु शिष्यामधील हे तात्कालिक मतभेद एका क्षणात मिटले आणि एक अप्रतिम गाणे तयार झाले.