बॉबी सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नशीब बलवत्तर म्हणून प्राण यांचे प्राण वाचले!
अभिनेता प्राण यांनी आपल्या रुपेरी पडद्यावरील कालकीर्दीत असंख्य भूमिका केल्या सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका करून त्यांनी बॉलीवडचा ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ ही उपाधी मिळवली. त्यानंतर सत्तरच्या दशकात त्यांनी पॉझिटिव शेडच्या चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करून रसिकांची वाहवा मिळवली. रुपेरी पडद्यावरील प्रत्येक भूमिकेला शंभर टक्के न्याय देत त्यांनी आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले. त्यांच्या इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका क्वचितच दुसऱ्या अभिनेत्याकडे आल्या असतील.
प्राण यांनी जितका खुंखार व्हिलन पडद्यावर साकारला वास्तविक जीवनात मात्र प्राण या पडद्यावरील इमेजच्या अगदी विरुद्ध होते. त्यांच्या दिलदारपणाचे, मदतीचे किस्से आज देखील बॉलीवूडमध्ये मोठ्या उत्साहात सांगितले जातात. प्राण चित्रपटात काम करताना स्टंट सीनमध्ये बऱ्याचदा स्वतःच काम करत. त्यांचे निर्माते दिग्दर्शक त्यांना अनेकदा सांगत की, ”आपण तुमच्यासाठी बॉडी डबलचा वापर करूत किंवा हे खतरनाक सीन आपण स्टंटमॅनकडून करून घेवूत पण प्राण शक्यतो स्वतः असे जीवघेणे स्टंट करत. त्यातून बऱ्याचदा त्यांना इजा झाली पण प्राण आपल्या भूमिकेपासून हटले नाहीत.
एकदा त्यांनी वयाची पन्नाशी पार केल्यानंतर एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी चक्क वीस फूट उंचीवरून उडी मारली होती. एका सिनेमाच्या शूटच्या वेळी प्राण अक्षरशः पाण्यात बुडता बुडता वाचले होते. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. जर वेळीच त्यांना मदत मिळाली नसती तर त्या दिवशी प्राण यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असते. खरंतर प्राण पट्टीचे पोहणारे. पण त्या दिवशी काय झालं होतं माहित नाही पण प्राणी यांनी अक्षरशः गटांगळ्या खात आपले प्राण वाचवले!
हा किस्सा होता १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटाच्या वेळेचा. या सिनेमाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. खरं तर आरकेचा ‘मेरा नाम जोकर’(१९७०) आणि “कल आज और कल’ (१९७१) हे लागोपाठचे दोन्ही सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे राज कपूर खऱ्या अर्थाने कंगाल झाले होते. प्राण राज कपूरचे जुने मित्र. आपल्या मित्राला मदत व्हावी म्हणून ‘बॉबी’ या चित्रपटात प्राण यांनी अक्षरशः एक रुपया मानधन घेऊन काम केले होते! या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये हा किस्सा घडला होता.
‘बॉबी’ या चित्रपटात प्राण यांनी ऋषी कपूरच्या वडिलांची तर प्रेमनाथ यांनी नायिका डिंपल कपाडियाच्या वडिलांची भूमिका केली होती. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये नायक नायिका आपल्या प्रेमाला विरोध करणाऱ्या समाजापासून / जगापासून दूर जात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात आणि खऱ्या खळाळणाऱ्या नदीमध्ये स्वतःला झोकून देतात. नंतर प्राण आणि प्रेमनाथ हे दोघे उड्या मारून त्या दोघांना वाचवतात असा तो शॉट होता. राज कपूर यांनी प्राण आणि प्रेमनाथ यांना सांगितले, ”तुम्ही हा स्टंट करू नका. तुमच्यासाठी आपण बॉडी डबलची सोय करू.”
प्रेमनाथ यांनी ऐकले परंतु प्राण यांनी सांगितले “मी हा शॉट स्वतःच देणार!” या शॉटचे शूटिंग मध्य प्रदेशमधील भेडा घाट येथे होणार होते. पावसाला असल्याने नर्मदा नदी दुथडी भरून वाहत होती. चित्रिकरणाच्या वेळी प्राण यांनी देखील त्या नदीमध्ये उडी मारली आणि ते नायिकेला वाचवण्यासाठी पोहत तिच्याकडे जावू लागले पण त्यावेळी पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की प्राण हे स्वतःला सावरू शकले नाहीत आणि पाण्याच्या झोता सोबत ते वाहू लागले. अक्षरशः गटांगळ्या खाऊ लागले वर हात उंचावून ते मदत मागू लागले.
=========
हे देखील वाचा : हकीकत: भारतातील पहिला युद्धपट, ज्याची जादू अद्याप कायम आहे.
=========
परंतु किनाऱ्यावरील कृ मेंबर्सला प्राण यांना तो अभिनय वाटला. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शूटिंग चालू ठेवले पण शेवटी प्राणच्या मदतीला नदीतील एक मोठा दगड आला या दगडाला प्राणने मिठी मारली आणि प्राण यांचे प्राण वाचले! जर त्या दिवशी हा दगड त्यांना मिळाला नसता तर मोठा गंभीर प्रसंग निर्माण झाला असता. आत पुन्हा जेंव्हा तुम्ही ‘बॉबी’ हा सिनेमा पहाल तेंव्हा हो शॉट आवर्जून पहा. नशीब बलवत्तर म्हणून प्राण यांचे प्राण वाचले!