भारत भूषण यांच्या घरासमोर कुणी ठिय्या आंदोलन केले?
शाहरुख खानच्या जबरदस्त चाहत्याचा एक चित्रपट ‘फॅन’ तुम्ही पाहिलाच असेल. असे प्रत्येक जनरेशनमध्ये कलावंतांचे फॅन असतात. अभिनेता भारत भूषण (Bharat Bhushan) या अभिनेत्याचा देखील एक जबरा फॅन होता. त्याला काही करून आपल्या या आवडत्या अभिनेत्याचा ऑटोग्राफ हवा होता त्यासाठी त्यांनी चक्क भारत भूषणच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत धरणे धरले होते. शेवटी भारत भूषण यांनी त्याला ऑटोग्राफ दिला का? त्याने काय कारण सांगितले? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
ही घटना आहे साधारणतः १९५५ सालची. त्या वर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये भारत भूषण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते. चित्रपट होता १९५४ साली प्रदर्शित झालेला ‘श्री चैतन्य महाप्रभू’. त्या काळात अभिनेते भारत भूषण (Bharat Bhushan) हे ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांमधील सुपरस्टार होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग देशभर पसरला होता. त्या काळात फिल्मफेअरचे अवॉर्ड टोटली वाचकांच्या अभिप्रायानुसार आणि त्यांनी दिलेल्या मतानुसारच ठरत असत.
फिल्मफेअरच्या अंकामध्ये एक बॅलेट पेपरसारखा फॉर्म असायचा. त्यामध्ये फिल्मफेअरच्या सगळ्या अवॉर्डची विस्तृत माहिती असायची. वाचकांनी आपल्या पसंतीची कलावंताच्या नावासमोर टिक करायची असायची. वाचकांनी मतदान करून खाली नाव, पत्ता, सही करून तो फॉर्म भरून पोस्टाने फिल्मफेअरकडे पाठवला जायचा. या सर्व पोस्टल बॅलेट्सची रीतसर मोजणी होऊन त्यानुसार विजेता ठरत असे. १९५५ हे फिल्मफेअर अवार्डचं दुसरं वर्ष होतं. भारत भूषण (Bharat Bhushan) यांना आयुष्यात मिळालेले हे एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड होते.
या अवॉर्ड नंतर मात्र भारत भूषण (Bharat Bhushan) यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्या काळात, मोबाईल कॅमेरा ह्या गोष्टी नसल्यामुळे लोक कलावंतांचे ऑटोग्राफ घेत असतात. त्यामुळे भारत भूषणच्या घरी झुंडीच्या झुंडी जाऊ लागल्या. लोक त्यांचे ऑटोग्राफ घेऊ लागले. त्यांच्याशी बोलू लागले. भारत भूषण यांना सुरुवातीला खूप चांगलं वाटलं पण नंतर नंतर त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ते थोडा ब्रेक घेण्यासाठी त्यांच्या गावी उत्तर प्रदेशात मेरठला गेले. पण तिथे देखील त्यांचे चाहते होतेच. ते रोज मेरठच्या घरी गर्दी करू लागले.
भारत भूषण (Bharat Bhushan) तिथून दिल्लीला गेले. तिथे तर भारत भूषण यांचे प्रचंड चाहते होते. आता तर कॉलेजचे तरुण-तरुणी देखील भारत भूषण यांना भेटायला येऊ लागले. रात्री/ अपरात्री/ पहाटे/ दुपारी केव्हाही दारावरची बेल वाजायची. लोक सरळ आत यायचे. भारत भूषणसोबत बोलायचे. त्यांचा ऑटोग्राफ घ्यायचे. खरं तर हे रसिकांचे प्रेम होते. पण भारत भूषण यांना आता खरोखर त्याचा त्रास होऊ लागला होता. म्हणून त्यांनी त्या बंगल्यामध्येच पण एका वेगळ्या रूममध्ये स्वतःला चक्क कोंडून घेतलं. आता कोणीही चाहता आला तर. एकतर भारत भूषण घरी नाहीत किंवा ते मुंबईला गेले आहेत किंवा त्यांची प्रकृती बरी नाही अशी कारणे सांगणे सुरु केलं.
पण भारत भूषण (Bharat Bhushan)चा एक जबरा चाहता होता. तो सकाळपासून भारत भूषण यांना भेटण्यासाठी थांबला. दुपार झाली. संध्याकाळ झाली. रात्री तो तिथेच बंगल्यासमोर झोपला. सकाळी पुन्हा तो भारत भूषणची वाट पाहू लागला. घरच्यांनी कारणे सांगितली. “भारत भूषण घरी नाहीत.” “त्यांची प्रकृती बरी नाही.” पण तो पठ्ठ्या म्हणाला, ”मी इथेच थांबतो. भारत भूषण यांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही!” अशा पद्धतीने त्याने चक्क भारत भूषण यांच्या घरासमोर धरणे धरले. शेवटी दोन दिवसानंतर घरातील लोकांनी भारत भूषण यांना सांगितले की, ”तुम्ही त्याला भेटून घ्या. तो असा काही जाणार नाही.” म्हणून थोडं नाखुशीनेच भारत भूषण बाहेर आले आणि त्या व्यक्तीला भेटले.
==========
हे देखील वाचा : ‘नीले नीले अंबर पार चांद जब आये….’
==========
भारत भूषण यांनी त्याला विचारले की, ”तुम्ही इतके दिवस माझी का वाट पाहत होतात?” त्यावर तो म्हणाला, ”मी तुमचा जबरा फॅन आहे. मी तुमचा प्रत्येक सिनेमा पाहतो. मला तुमचा अभिनय खूप आवडतो. मला तुम्हाला भेटायचे होते. मला तुम्ही ऑटोग्राफ द्या.” भारत भूषण म्हणाले, ”मी आता ऑटोग्राफ देणे बंद केले आहे.” त्यावर तो फॅन चवताळून म्हणाला, ”असं कसं? मला तुम्ही ऑटोग्राफ दिलाच पाहिजे. कारण तुम्हाला फिल्मफेअर अवार्ड मिळावे यासाठी फिल्मफेअरचे पाच अंक घेऊन मी तुम्हाला मत दिले होते. तुम्हाला हे पारितोषिक मिळण्यामध्ये माझ्या ही मतांचा मोठा हात आहे. आणि त्यामुळे माझा एवढा हक्क आहे तुमच्यावर की तुमचा ऑटोग्राफ मागू शकतो!” आता मात्र भारत भूषण (Bharat Bhushan) यांना टाळता आले नाही. ते हसले आणि त्यांनी त्याला ऑटोग्राफ दिला सोबत त्याला पेन देखील भेट दिले!