दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बनवाबनवीची ‘हे’ किस्से ऐकाल तर व्हाल चकित
‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील असा सिनेमा आहे, ज्याच्या शिवाय मराठी सिनेमांचा इतिहास आणि सिनेसृष्टी निव्वळ अपूर्ण आहे. या सिनेमाने लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा असा रेकॉर्ड सेट केला आहे, जो इच्छा असूनही कोणीच तोडू शकत नाही. आज सिनेमा प्रदर्शनाच्या जवळपास ३५ वर्षांनी देखील सिनेमाची लोकांमधील क्रेझ आणि आवड कमाल आहे.
आजही जेव्हा जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर लागतो, सर्वच लोकं टीव्हीसमोर येऊन बसतात आणि तोंडपाठ असूनही तितक्याच आवडीने आणि प्रेमाने हा चित्रपट बघतात. बनवाबनवी सिनेमाची खास गोष्ट म्हणजे या सिनेमातील आयकॉनिक डायलॉग आणि सीन्स. आजही सर्व सीन्स आणि त्यांचे संवाद पाठ असूनही सर्वाना ये पाहायला मजा येते आणि एकदा तरी मनात विचार येतो की, शूटिंगला किती मजा आली असेल आणि कसे सुचले असतील हे संवाद.
या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या सचिन पिळगांवकर यांना आजही या सिनेमाबद्दल आणि या सिनेमाच्या शूटिंगच्या किस्स्यांबद्दल विचारले जाते. सध्या सचिन हे त्यांच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचवेळी एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी पुन्हा एकदा बनवाबनवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सिनेमातील डायलॉगबद्दल सांगितले. ते म्हणाले की लोकांना वाटते की, हे काही संवाद सिनेमात नव्हते ते आयत्यावेळी सुचले मात्र असे अजिबातच नाही.
सचिन पुढे म्हणाले, “माझी स्क्रिप्ट लिहिण्याची पद्धत अशी आहे की, मी लेखकाबरोबर बसतो. तो लिहून देईल तसा मी चित्रपट शूट करत नाही. करूच शकत नाही. त्याच्याबरोबर बसून, मग तो सीन असा आहे, तो सीन असा करूयात. त्याच्यामध्ये काय होते की, ५० ते ६० टक्के डायलॉग आधीच ठरलेले असतात, ते ठरून जातात.
उदाहरण द्यायचे झाले तर आम्ही हॉटेलच्या रुममध्ये बसलो होतो आणि माझ्या डोक्यात एक सीन आला. तो घरमालक आला आहे आणि आम्ही चौघेजण घरात आहोत. त्यातले दोन तिथे बसलेले असतात आणि तिथे चार चहाचे कप ठेवलेले असतात तेवढ्यात तो मालक येतो तो दरवाजा उघडतो. त्याच्यामागे जर आपण लक्ष्मीकांत बेर्डेला लपवले. तर हा सीन असा लिहिला होता की, लक्ष्मीकांत निघून जातो आणि घरमालकाला कळतच नाही. तेव्हा विचार आला की त्याचा उपयोग काय आहे? त्यापेक्षा आपण असे केले तर, तो लपलेला आहे, तो बाहेर निघून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना घरमालक मागे पाहतो. मागे पाहिल्यानंतर आता काय? मग लक्ष्मीकांत दारावर वाजवतो आणि म्हणतो, धनंजय माने इथेच राहतात का?”
यानंतर पुढे सचिन यांनी सांगितले की, “सिनेमाचे लेखक वसंत सबनीस मला म्हणाले, “मला कळाले नाही तुम्ही नक्की काय केले आहे ते.” तेव्हा मी त्यांना ते सगळं करून दाखवले. त्यांनी माझ्याकडे बघितले आणि मला एक प्रश्न विचारला, “यावर लोकं हसतील? मी त्यांना म्हटले, “सबनीस साहेब, तुम्ही ते माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त एक संवाद लिहा, धनंजय माने इथेच राहतात का?” अशा अनेक गोष्टी स्क्रीप्ट लिहिताना झाल्या. त्या कशा प्रत्यक्षात आणायच्या हे माझ्या डोक्यात स्पष्ट होते .
===========
हे देखील वाचा : ‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
===========
पुढे अजून एक उदाहरण देत सचिन म्हणाले, “अशोक सराफच्या डोक्यात कल्पना येते की आपण पुरुषांना बाई बनवायचे. ती कल्पना इतर कोणत्याही व्यक्तीला बघून येत नाही. तर बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे मोठे स्त्रीवेषातील पोस्टर पाहून त्याला हे सुचते. कारण तिथे बालगंधर्वांचे खूप मोठे पोट्रेट आहेत. एका बाजूला स्त्री रुपात आहेत आणि एका बाजूला पुरुष रुपात आहेत. तो त्या पोट्रेटकडे बघतो आणि माझ्याकडे बघतो आणि त्याच्या डोक्यात येते की याला बाई बनवले तर. कोणत्याही डायलॉगशिवाय ती कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि त्यांनी सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला.”
या मुलाखतीदरम्यान सचिन यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० सप्टेंबर २०२४ला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.