दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेत्री भक्ती बर्वेचा या कल्ट क्लासिक सिनेमात कसा प्रवेश झाला?
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने आज देखील एक कल्ट क्लासिक मूवी म्हणून आपले स्टेटस कायम ठेवले आहे. आज चाळीस वर्षानंतर देखील हा ब्लॅक कॉमेडी चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवातून, अनेक अॅक्टींग स्कूलमधून आवर्जून दाखवला जातो. या चित्रपटाच्या अनेक दमदार गोष्टींमध्ये एक बाब होती ती म्हणजे याचं परफेक्ट कास्टिंग. दिग्दर्शक कुंदन शहा (Kundan Shah) यांनी एन एफ डी सी यांच्या मदतीने हा चित्रपट बनवला होता. खरं तर या सिनेमाचं बजेट अतिशय कमी होतं. त्यामुळे अगदी मोजक्या पैशांमध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली.
सर्व कलाकारांनी स्वतः पदरचे पैसे खर्च करून या चित्रपटाला हातभार लावला आणि कुंदन शहा यांची ही कल्ट क्लासिक मूवी तयार झाली. या चित्रपटातील नसरुद्दीन शहा (फोटोग्राफर- विनोद चोप्रा), रवी वासवानी(फोटोग्राफर – सुधीर मिश्रा), ओम पुरी (भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर-आहुजा),पंकज कपूर(भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर-तरनेजा), सतीश शहा (डीमेलो- कमिशनर) या सर्वांची कॅरेक्टर्स अगदी टेलरमेड असल्यासारखी बनली होती. यातील एडिटर शोभा हिचा रोल आपली मराठी कलाकार भक्ती बर्वे हिने केला होता. तिच्याकडे ही भूमिका कशी आली? याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
खरं तर कुंदन शहा (Kundan Shah) यांच्या मनात या भूमिकेसाठी बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन हिचं नाव फिक्स होतं. त्यासाठी ते कलकत्त्याला अपर्णा सेन यांना स्टोरी सांगण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले! आपल्या सिनेमाची स्टोरी नॅरेट करताना ते इतके रंगून गेले की त्यांना भानच राहिले नाही. पण त्यांच्या या कृत्याने अपर्णा सेन मात्र जाम बोअर झाली. अर्ध्याहून अधिक कथानक झाल्यानंतर ती चक्क जांभया देऊ लागली नंतर तिला झोप येऊ लागली. कथा झाल्यानंतर ती कुंदन शहा यांना म्हणाली, ”कुंदन तुम्ही प्रत्येक कलाकाराला अशाच पद्धतीने स्टोरी नॅरेट करता का?”
तिच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज आणि अविर्भावावरून कुंदन शहा यांनी ओळखले की ही काही सिनेमात आपल्या काम करणार नाही. अपर्णा सेन यांचा नकार मिळाल्यानंतर कुंदन शहा यांनी मुंबईतच काही अभिनेत्रींना अप्रोच केले. त्यामध्ये पहिल्यांदा ते स्मिता पाटीलकडे गेले. त्यावेळी ती प्रचंड बिझी स्टार होती. आर्ट आणि कमर्शियल दोन्ही कडच्या सिनेमात ती प्रचंड व्यस्त होती. त्यामुळे तिने नम्र नकार कळवला. नंतर कुंदन शहा दिप्ती नवलकडे गेले. दिप्तीला स्टोरी तर आवडली पण तिच्याकडे डेटचा प्रॉब्लेम होता. तरी तिने सेकंड शिफ्टमध्ये काही स्लॉटमध्ये काम करता येईल असे सांगितले. परंतु कुंदन शहा (Kundan Shah) यांना सर्व युनिट एकाच ठिकाणी एकाच वेळी हवे होते कारण चित्रपटाचे बजेटच कमी होते. त्यामुळे त्यांनी दिप्ती नवलचा पत्ता कटला. अपर्णा सेन, स्मिता पाटील आणि दीप्ती नवल या तिघींच्या नकारानंतर आता कुणाला घ्यायचे ? असा कुंदन यांना प्रश्न पडला.
त्यांच्या एका मित्राने नुकतेच एक मराठी नाटक पाहिले होते ‘हँडस अप’. यात भक्ती बर्वे हिने दमदार भूमिका केली होती. भक्तीचे नाव कुंदन शहा (Kundan Shah) यांना सुचवले गेले. कुंदन यांनी तिची माहिती काढली. पु ल देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाने भक्ती बर्वे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होती. कुंदन स्वत: शिवाजी मंदिरला हँडस अप हे नाटक पाहायला गेले. त्यांना भक्तीची अदाकारी आवडली. ‘खबरदार’ची संपादिका शोभा या रोलसाठी ती सर्वार्थाने योग्य आहे याची त्यांना खात्री पटली.
शिवाजी मंदिरातच ते भक्ती भेटले आणि तिला भेटायला बोलावले. चित्रपटात काम करायला भक्ती बरोबर थोडीशी द्विधा मनस्थितीत होती. पण नंतर ती तयार झाली . कुंदनने तिचे कॅरेक्टर सांगायला सुरुवात केली. भक्ती बर्वेला सुरुवातीला काहीच कळाले नाही. पुन्हा पुन्हा ती शहा (Kundan Shah) यांना विचारात होती, ”तुम्ही नेमके काय बनवत आहात?” पण हळूहळू कथानकाचे पापुद्रे उलगडत गेले आणि भक्ती बर्वे सिनेमा करायला तयार झाली!
===========
हे देखील वाचा : साहिर लुधियानवी यांच्यामुळे मिळाली गीतकारांना स्वतंत्र ओळख!
===========
तिघींच्या नकारानंतर एक नायिका सिनेमा करायला तयार आहे या आनंदात कुंदन शहा (Kundan Shah) इतके खुश झाले की ते ‘थँक्यू थँक्यू‘ म्हणत लिहून गेले. नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण भक्तीला तिच्या पेमेंट बद्दल काहीच विचारलं नाही. रात्रभर ते तळमळत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी भक्तीला फोन करून विचारले, ”या चित्रपटाच्या कामासाठी किती पेमेंट घेणार? मी काल विचारायला विसरलो.” त्यावर भक्ती म्हणाली, ”पेमेंटची काळजी करू नका. मी तुमचा सिनेमा करते आहे.” अशा पद्धतीने भक्ती बर्वेचा ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात समावेश झाला.