‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Phullwanti Marathi Movie: कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’
मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.(Phullwanti Marathi Movie 2024)
‘फुलवंती’ चित्रपटासाठी अनेक कलाकारांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य असणारे अभिनेते प्रसाद ओक यात ‘बाखरे सावकार नाईक’ या भूमिकेत दिसतील. तर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत विविध पातळीवर गाजलेलं नाव म्हणजे वैभव मांगले यात ‘मार्तंड भैरवाचार्य’ या भूमिकेत रंग भरणार आहेत. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे प्रसिद्ध असलेले अष्टपैलू अभिनेते ऋषिकेश जोशी ‘पंत चिटणीस’ यांची भूमिका करत आहे. आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि दिग्दर्शनाने ठसा उमटवणारी अभिनेत्री स्नेहल तरडे यात ‘लक्ष्मी’ ची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज ‘फुलवंती’ चित्रपटात दिसणार आहे.
‘फुलवंती‘.. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत.(Phullwanti Marathi Movie 2024)
==============================
==============================
चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून; नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीतवितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.