जेव्हा दिलीप कुमारसाठी लिहिलेलं गाणं अक्षय कुमारवर चित्रित झाले!
अभिनेता दिलीप कुमारसाठी तयार केलं जाणारं गाणं जर अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)वर चित्रित झाला असेल तर? तुम्ही म्हणाल हा काय वात्रटपणा आहे? कसं शक्य आहे? पण असं एकदा झालं होतं! दिलीप कुमारने स्वतः पसंत केलेलं गाणं नंतर अक्षय कुमारवर चित्रीत झालं होतं! हा सगळा प्रकार नव्वदच्या दशकामध्ये झाला होता. कोणता होता तो चित्रपट ? आणि कोणतं होतं ते गाणं? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दिग्दर्शक राजीव राय ‘मोहरा’ हा चित्रपट बनवत होते. सुरुवातीपासूनच हा सिनेमा एका मोठ्या स्केलवर त्यांना बनवायचा होता. यातील स्टार कास्ट जबरदस्त होती. अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, नासिरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर… चित्रपटाची गाणी आनंद बक्षी आणि इंदीवर यांची होते तर संगीत विजू शहा यांचे होते. विजू शहा यांनीच राजीव राय यांच्या आधीच्या दोन चित्रपटांना संगीत दिलं होतं. हे चित्रपट होते त्रिदेव(१९९०) आणि विश्वात्मा(१९९२) पण दोन्ही चित्रपटाचे संगीत एकसारखंच असल्याची थोडीशी टीका देखील झाली होती.
नव्वदच्या दशकात म्युझिकचा ट्रेंड देखील बदलत होता. त्यामुळे ‘मोहरा’ या चित्रपटाचे संगीत हे सर्वांना आवडेल असं वैविध्यपूर्ण असेल असं करायचं विजू शहा यांनी ठरवलं. आनंद बक्षी आणि विजू शहा यांची म्युझिक सीटिंग सुरू झाली. चित्रपटात सर्व प्रकारची गाणी घ्यायचे ठरले होते. यात एक कव्वाली देखील होती. चित्रपटात एक सॅड सॉंग पाहिजे होते. त्यासाठी सर्वजण बसले होते. (Akshay Kumar)
तेव्हा गीतकार आनंद बक्षी यांनी एका गाण्याचा मुखडा सर्वांना ऐकवला आणि म्हणाले, ”खरंतर हे गाणं मी दिलीप कुमार यांच्यासाठी लिहिणार आहे!” अभिनेता दिलीप कुमार त्या वेळी ‘कलिंगा’ हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. १९९१ साली या सिनेमाचा मुहूर्त देखील झाला होता. सुधाकर बोकाडे या चित्रपटाचे निर्माते होते. पण या चित्रपटाची प्रगती सुरुवातीपासूनच अतिशय मंद गतीने चालू होती. आनंद बक्षी यांनी या गाण्याचा मुखडा लिहला होता तो दिलीप कुमार यांना खूप आवडला होता आणि त्यांनी हे गाणं ‘कलिंगा’ साठी राखून ठेवायला सांगितलं होतं.
या गाण्याचा मुखडा ऐकल्यानंतर दिग्दर्शक राजीव राय म्हणाले की, ”जर हा चित्रपट बनला नाही किंवा हे गाणं चित्रपटात समाविष्ट झालं नाही तर या गाण्यावर पहिला हक्क माझा असेल. हे आत्ताच सांगतो हे गाणं मी बुक करत आहे.” आणि झालं ही तसंच. ‘कलिंगा’ हा चित्रपट बंद पडला. दिलीप कुमारला विचारून आनंद बक्षी यांनी ते गाणं आता ‘मोहरा’ या चित्रपटासाठी वापरायचं ठरवलं. त्या पद्धतीने त्याचे अंतरे लिहिले गेले. गाण्याचे बोल होते ‘ऐ काश कही ऐसा होता के दो दिल होते सिने में …’ चित्रपटात खरंतर या गाण्याला आधी जागा नव्हती. पण राजीव राय यांनी या गाण्यासाठी एक नवीन जागा क्रियेट केली आणि हे गाणं कुमार सानू यांनी गायलं. अशाप्रकारे दिलीप कुमार यांच्या सिनेमासाठी लिहिलं गेलेलं गाणं अक्षय कुमार (Akshay Kumar)वर चित्रित झालं!
===========
हे देखील वाचा : ‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमावेळी किशोर कुमार का चिडला होता ?
===========
या चित्रपटातील सर्वच गाणी जबरदस्त होते. विशेषता कव्वाली. ‘तू चीज बडी हे मस्त मस्त…’ त्या काळात प्रचंड गाजली होती. खरं तर ही कव्वाली नुसरत फतेह आली खान यांच्या एका पाकिस्तानी कव्वाली ’दम मस्त कलंदर मस्त मस्त‘ वर बनली होती. भीमपलासी रागावर या कव्वालीचे संगीत बनवले होते. रवीनासाठी ही कव्वाली म्हणजे तिचे सिग्नेचर सॉंग बनले. आख्ख बॉलीवूड मस्त मस्त गर्ल म्हणून तिला ओळखू लागले. या चित्रपटातील ‘ना कजरे की धार..’ हे गाणं देखील खरंतर मुकेशने ३० वर्षापूर्वी गायले होते परंतु तो चित्रपट डब्यात गेल्यामुळे मूळ संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी हे गाणं या चित्रपटात वापरायची परवानगी दिली! (Akshay Kumar)