दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गायक कुमार सानूला रेकॉर्डिंग पासून पंचमने का रोखले?
विधू विनोद चोप्रा यांचा १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘1942: अ लव स्टोरी’ हा चित्रपट आजदेखील रसिंकासाठी एक अप्रतिम संगीतमय चित्रपट म्हणून आठवणीत आहे. संगीतकार राहुल देव बर्मन (RD Burman)यांनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा भारतीय चित्रपट संगीत सुरील्या मेलडीच्या मार्गावर गेले. कारण त्याआधी खटिया, कबूतर, चोली यासारखे शब्द असलेली गाणी सवंग लोकप्रियता मिळवत होते. भारतीय सिनेमा संगीत खूप गढूळ झाले होते. अशा या वातावरणात राहुल देव बर्मन यांच्या या सिनेमाच्या संगीताने पुन्हा एकदा सुंदर शब्द आणि सुरीलं संगीत यांचा जमाना सुरू झाला. ( RD Burman )
या चित्रपटातील गाणी आजदेखील रसिकांना लख्ख आठवतात. राहुल देव बर्मन यांचे भारतीय सिनेमा रसिकांवर फार मोठे उपकार आहेत कारण जाण्यापूर्वी त्यांनी भारतीय चित्रपट संगीताला पुन्हा एकदा त्याच्या योग्य वाटेवर आणून सोडलं ! या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा खूप गमतीशीर आहे. किस्सा गमतीशीर जरी असला तरी त्यामागचा थॉट खूप महत्त्वाचा आहे. कलावंताचे आपल्या कलाकृतीवर किती प्रेम असते हे यावरून लक्षात येते. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो किस्सा? जाणून घ्या ! ( RD Burman )
‘1942 : अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील सर्व गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती. जावेद अख्तर आणि राहुल देव बर्मन (RD Burman) यांनी प्रत्येक गाण्याबाबत खूप मेहनत घेतली होती. प्रत्येक गाणं कसं सर्वांगसुंदर होईल याकडे दोघांच विशेष लक्ष होतं. यातील ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा हा किस्सा आहे. हे गाणं गायलं होतं कुमार सानू यांनी.
ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी कुमार सानू स्टुडिओमध्ये पोहोचला खरा परंतु त्यादिवशी त्याचा अवतार व्यवस्थित नव्हता. दाढी वाढलेली होती. केस अस्ताव्यस्त विस्कटलेले होते. मळकी जीन्स आणि चुरगळलेला टी-शर्ट. तो स्टुडिओमध्ये पोहोचला. त्याचा तो अवतार पाहून राहुल देव बर्मन म्हणाले, “कुमार ये क्या? हा काय अवतार करून आलास?” कुमार सानू म्हणाले,”काय झाले?”.पंचम म्हणाले ,”काही नाही. आज अशा अवतारात रेकॉर्डिंग नको. तू उद्या व्यवस्थित स्वच्छ दाढी करून आंघोळ करून आणि चांगले कपडे घालून ये. आज रेकॉर्डिंग नाही होवू शकत.” कुमार सानूला काहीच कळाले नाही. पण शेवटी राहुल देव बर्मन (RD Burman) यांचे शब्द त्याला ऐकावेच लागले. आणि तो तसाच घरी गेला. (RD Burman)
दुसऱ्या दिवशी व्यवस्थित क्लीन शेव व्यवस्थित कपडे शूज घालून तो रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये पोहोचला. राहुल यांनी त्यांचे स्वागत केले. पंचम म्हणाले ,”अरे, कुमार मी आणि जावेद अख्तर यांनी हे गाणं फार मेहनत करून बनवले आहे. नायिकेच्या सौंदर्याचे अप्रतिम वर्णन या गाण्यात आहे. आणि या गाण्यातील प्रेम हे सात्विक आहे. शुद्ध आहे. पवित्र आहे. तुझ्या गाण्यातून ती सात्विकता मला हवी आहे आणि आपण जो पेहराव करतो त्यातूनच आपली कला झिरपत असते. कालचा तुझा पेहराव मला त्यासाठी आवडला नाही आज तू व्यवस्थित गेटअप मध्ये आलेला आहेस. आज गाणं नक्कीच चांगलं होईल!” कुमार सानूने गाणे दोन-तीनदा रिहर्सल केले आणि गाण्याचा फायनल टेक झाला. कलावंताचे आपल्या कलाकृतीवर किती प्रेम असते ते पहा. सच्चा कलावंत किती बारकाईने या सर्व गोष्टींचा विचार करतो ते देखील आपल्याला यातून लक्षात येते. (RD Burman)
==============
हे देखील वाचा : पंचमचं ‘मॅजिक’
===============
राहुल देव बर्मन (RD Burman) यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यातील हर एक गाणं पंचमच्या सुरील्या परंपरेचे होते. प्यार हुआ चुपकेसे (कविता कृष्णमूर्ती), रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम भीगी भीगी(कुमार सानू कविता कृष्णमूर्ती),रूठ न जाना (कुमार सानू), कुछ ना कहो (लता मंगेशकर) ये सफर बहुत कठीण (शिबजी चटर्जी) हि सारीच गाणी गाजली.पण हे यश पहायला राहुल देव बर्मन (RD Burman) मात्र राहिले नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्यांचं निधन झालं. चित्रपट १५ जुलै १९९४ ला प्रदर्शित झाला आणि पंचमदाचेच निधन ४ जानेवारी १९९४ ला झाले. (RD Burman)