दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कोमात असलेल्या सचिनदा यांनी ‘ही’ बातमी ऐकून डोळे उघडले!
संगीतकार सचिन देव बर्मन (S. D. Burman) हे भारतीय चित्रपट संगीतातील सुवर्णकाळातील एक महत्त्वाचे संगीतकार होते. त्यांनी अभिजात भारतीय संगीतासोबतच ईशान्येकडील लोकसंगीताचा खूप चांगला वापर आपल्या संगीतात केला होता. सचिन देव बर्मन यांच्यावर खर्गेश देव बर्मन यांनी ‘एस डी बर्मन: द वर्ल्ड ऑफ हिज म्युझिक.” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद एस के राय चौधरी यांनी केलेला आहे. या पुस्तकात सचिनदा यांच्या खूप आपल्याला अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टींचा खुलासा यात झालेला आहे. हे पुस्तक वाचताना त्यामुळेच खूप मजा येते.
राहुल देव बर्मन हे सचिनचे पुत्र. एस डी बर्मन (S. D. Burman) यांनी त्यांच्यावर संगीताच्या संस्कार तर केलेच शिवाय त्यांना आपला सहाय्यक म्हणून देखील अनेक चित्रपटातून घेतले. सचिनदा यांच्याप्रमाणेच त्यांच्या पुत्राच्या संगीतात देखील गोडवा आणि गेयता असायचीच पण आर डी बर्मन एक पाऊल पुढे होते. पाश्चात्य संगीताची त्यांना खूप आवड होती. या संगीताचा त्यांचा खूप अभ्यास देखील होता. विविध वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक पाश्चात्य वाद्य त्यांनी आपल्या संगीतातून वापरली. सचिन देव बर्मन यांना आपल्या पुत्राचे संगीत आवडत होते. नक्कीच आवडत होते. पण एकदा मात्र ते भयंकर नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचे कारण असे होते देव आनंद यांच्या नवकेतन बॅनरच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे आशा भोसले यांनी गायलेले गाणे.
हे गाणे ऐकल्यानंतर सचिन देव बर्मन (S. D. Burman) कमालीचे नाराज झाले होते. त्यांना आपल्या भारतीय चित्रपटातून इतक्या मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य संगीताचा वापर व्हावा असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनी त्या पद्धतीने स्पष्टपणे आपल्या मुलाला तसे बोलून देखील दाखवले होते. अर्थात हे गाणे नंतर प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावर्षीचे ते बिनाका टॉपचे गाणे होते पण या गाण्यामुळे सचिन देव बर्मन राहुल देव बर्मनवर नाराज झाले होते हे नक्कीच.
सचिन देव बर्मन (S. D. Burman) यांना फुटबॉल या खेळाची प्रचंड आवड होती. इस्ट बंगाल हा त्यांचा आवडीचा संघ. कलकत्त्याला असल्यानंतर ते कायम स्टेडियमवर जाऊन फुटबॉल मॅच तासंन तास बघत बसायचे. या काळात त्यांना कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडायचं नाही. किंबहुना जेव्हा फुटबॉलचे सामने असायचे तेव्हा खास मुंबईहून सचिन देव बर्मन कलकत्त्याला यायचे आणि आपलं संगीत वगैरे सर्व विसरून मस्त पैकी फुटबॉल सामने पाहत असायचे.
१९७५ साली ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘मिली’ या चित्रपटाचे संगीत देत असताना सचिन देव बर्मन यांना हृदयविकार आणि पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आता सचिन देव बर्मन (S. D. Burman) कोमामध्ये गेले होते. पत्नी मीरादेवी आणि पुत्र राहुल देव बर्मन रोज त्यांच्या उशाशी बसून त्यांच्याशी बोलत असायचे. पण सचिनदा कोमात असल्याने त्यांचे डोळे बंद ठेवले असायचे. एक दिवस मात्र कमाल झाली. कलकत्त्याला मोहन बगान आणि ईस्ट बंगाल यांच्यामध्ये फुटबॉलचा अंतिम सामना होता. जर सचिनदा यांची तब्येत व्यवस्थित असती तर ते हा सामना नक्कीच पाहायला गेले असते.
=============
हे देखील वाचा : टॉम अल्टर: प्रेक्षकांचा आवडता निळ्या डोळ्यांचा गोरा साहेब!
=============
ईस्ट बंगाल हा त्यांचा आवडीचा संघ होता पण आता ते कोमात असल्यामुळे हा सामना काय ते पाहू शकले नाही. परंतु या अंतिम सामन्यामध्ये ईस्ट बंगालने मोहन बगान पाच शून्य अशा गोल्सने पराभूत केले. आर डी बर्मन यांनी ही बातमी सचिन देव बर्मन (S. D. Burman) यांच्या कानात जाऊन सांगितली आणि काय आश्चर्य सचिन देव बर्मन, जे गेले अनेक दिवस डोळे बंद करून कोमामध्ये होते; ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी चक्क डोळे उघडले! काही बोलले नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावर ईस्ट बंगाल जिंकलाचा आनंद दिसत होता. एक स्मित हास्य त्यांनी केले आणि पुन्हा डोळे बंद केले. राहुल देव बर्मन सांगतात, ”त्यानंतर मात्र सचिन दा यांनी कधीच डोळे उघडले नाहीत. ३० ऑक्टोबर १९७५ या दिवशी त्यांचे देहावसन झाले.
फुटबॉल प्रेमी सचिन देव बर्मन कोमात असताना केवळ फुटबॉलची बातमी ऐकल्यानंतर काही सेकंदासाठी डोळे उघडले होते ही गोष्ट फार महत्त्वाची आहे!