दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘ये जीवन है…’ गाण्यात किशोर कुमार यांनी इमोशनल टच कसा आणला?
एखाद्या गाण्यांमध्ये कम्प्लीट परफेक्शन यावं यासाठी पूर्वी संगीतकार, गायक/गायिका, गीतकार पुरेपूर प्रयत्न करत असायचे. गाण्यात परफेक्शन येईपर्यंत ते अजिबात थकत नसत किंवा गिव्हअप करत नसत. प्रत्येक गाणं हे सर्वोत्कृष्टच झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. गाण्यातील भावना त्या गीतामध्ये पूर्णतः विरघळायला हव्यात यासाठी संगीतकार आणि गायक मंडळी आटोकाट प्रयत्न करत. सत्तरच्या दशकातील किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायलेल्या एका अप्रतिम गाण्याचा किस्सा मध्यंतरी रेडिओवरील एका कार्यक्रमात ऐकायला मिळाला.
प्रतिभेचा तो एक सोनेरी क्षण असतो. तो अनपेक्षित असतो. कधी येईल सांगता येत नाही. हा जादुई क्षण कलावंताला एकदा पकडता आला की पुढचं काम सोपं होतं असतं. असाच काहीसा प्रत्यय किशोर कुमार (Kishore Kumar) यांना या गाण्यांच्या रेकोर्डिंगच्या वेळी आला होता. हे गाणं ज्या चित्रपटात होतं तो चित्रपट बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. राजश्री प्रॉडक्शन या चित्रसंस्थेचा हा चित्रपट होता ‘पिया का घर’. आपले मराठीतील ख्यातनाम लेखक व.पु.काळे यांच्या एका कथेवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटातील गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केली होती. गीतकार होते आनंद बक्षी.
या चित्रपटात किशोर कुमार (Kishore Kumar) यांना दोन गाणी गायची होती. ही दोन्ही गाणी त्यांना एकाच दिवशी रेकॉर्ड करायची होती. कारण त्यानंतरचे पुढचे काही महिने किशोर कुमार आऊट ऑफ मुंबई असणार होते. त्यामुळे सकाळीच ते रेकोर्डिंग स्टुडिओत पोहोचले. पहिलं गाणं होतं ‘बंबई शहर की तुझको चल सैर करा दू…’ हे गाणं किशोर कुमारच्या खास उडत्या शैलीत असल्यामुळे या गाण्याच्या दोन-चार रिहर्सल नंतर फायनल टेक घेण्यात आला.
दुसरं गाणं होतं ‘ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप…’ खूप फिलॉसॉफीकल थॉट असलेलं हे गाणं धीरगंभीर स्वरात किशोर कुमार (Kishore Kumar) यांना गायचं तर होतच पण या गाण्यात गीतकाराने व्यक्त केलेल्या भावना पूर्णपणे विरघळायला हव्यात असं संगीतकार एल पी यांना वाटत होतं. त्यामुळे दिवसभर या गाण्याची रिहर्सल चालू होती. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना किशोरच्या स्वरातून हवा तो इफेक्ट मिळत नव्हता. म्हणून ते पुन्हा पुन्हा त्यांना गायला लावत होते. किशोर कुमार देखील वैतागला होता. तो देखील आपल्या त्यादिवशीच्या गायकीवर त्यावेळेला खूष खुश नव्हता. गाण्याला हवा तो ‘इमोशनल टच’ तो देऊ शकत नव्हता. काय करायचे?
शेवटी सर्वांनी टी ब्रेक घेतला. चहा मागवला. सर्व म्युझिशियन्स चहा घ्यायला गेले. किशोर कुमार (Kishore Kumar) मोठ्या मगमध्ये चहा घेऊन पुन्हा एकदा रिहर्सल करू लागला आणि प्रतिभेचा तो सोनेरी क्षण अलगदपणे अवतरला! किशोर कुमारने एका हातात चहाचा कप घेवून आणि एक हात गालावर ठेवून हळुवार आवाजात गाणं गायला सुरुवात केली. ‘ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप…’ मुखडा झाला. अंतरे झाले. लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि सर्व म्युझिशियन्स पिन ड्रॉप सायलेन्समध्ये किशोर कुमार यांचे ते गाणे ऐकत होते.
गाणे संपल्यानंतर प्यारेलाल ओरडले ‘हाच इफेक्ट पाहिजे’. ‘हाच इफेक्ट पाहिजे’. ‘ऐसाही गाओ’ किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी त्यांना हातानेच शांत राहायला सांगितलं. किशोर पुन्हा पुन्हा अंतरे गाऊ लागले आणि तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले. म्युझिशियन्सला हातानेच सांगितलं “चला आपण रेकॉर्डिंग करूयात!” म्युझिशियन सज्ज झाले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आपली जागा घेतली. आतमध्ये किशोर कुमारचे गाणे चालूच होतं आणि त्याच कंटीन्यूटीमध्ये किशोर कुमारने संपूर्ण गाणे गायले.
==============
हे देखील वाचा : कोमात असलेल्या सचिनदा यांनी ‘ही’ बातमी ऐकून डोळे उघडले!
==============
सर्वांनी टाळ्या वाजवल्या. एका टेकमध्ये गाणं पूर्णपणे व्यवस्थित रेकॉर्ड झालं. ही कमाल होती किशोर कुमार (Kishore Kumar)ची आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची. प्रतिभेचा तो सोनेरी क्षण सर्वांनी परफेक्ट पकडला आणि एक अजरामर गीत तयार झालं. त्याकाळात आपली प्रत्येक कलाकृती परफेक्ट व्हावी म्हणून सर्वजण झटत असायचे आणि त्याचाच नतीजा म्हणजे त्या काळातले संगीत! आज हे गाणं येऊन तब्बल पन्नास वर्षे झाली तरीही या गाण्याची लोकप्रियता तसूभरदेखील कमी झालेली नाही!