मिलिंद गवळी यांची ‘अतुलनीय’ आठवणीत भावुक पोस्ट
मराठी रंगभूमीवरील अवलिया, प्रतिभासंपन्न अभिनेता असलेल्या अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. अतुल यांचे आकस्मिक निधन त्यांच्या चाहत्यांपासून, मैत्र, नातेवाईक सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. जवळपास ४० पेक्षा अधिक वर्ष अतुल या क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते आहे. आज अतुल यांच्या जाण्याचे दुःख आणि त्याच्या आठवणी सगळेच सोशल मीडियाचा आधार घेत शेअर करताना दिसत आहे.
अतुल यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वभावामुळे अगणित लोकांना जोडले आणि मित्र परिवार तयार केला. चार दशकं हिंदी, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अतुल यांच्या असंख्य आठवणी त्यांच्या मित्रांकडे आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. आई कुठे काय करते फेम मिलिंद यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत अतुल यांना आदरांजली वाहिली आहे.
मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “यारो का यार अतुल परचूरे, मी आजपर्यंत त्याला अतुल या नावाने कधीच हाकच मारली नाही, मी त्यला नेहमी “अतुलनीय”असंच म्हणायचो, आणि तो मला “बोल मित्रा” म्हणायचा, काल आपल्या सगळ्यांना सोडू गेला, fighter होता, मृत्यूची झुंज देऊन परत आला होता, खूप लडला पण शेवटी ‘नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही’ असं म्हणतात तेच खरं आहे. अतुल इतका talented होता, इतका हुशार होता, कलाकार म्हणून खूप वरच्या दर्जाचा होता. १९९७ ला “सुन लाडकी सासरची” या वि.के.नाईकांच्या चित्रपटांमध्ये मी आणि अतुल एकत्र काम केलं होतं.
पुण्याच्या ग्वालियर पॅलेसमध्ये आम्ही एका रूममध्ये जवळजवळ 50 दिवस एकत्र राहिलो होता. त्यावेळेला त्याने “व्यक्ती आणि वल्ली” हे पु. ल. देशपांडे यांचं नाटक केलं होतं, आणि अतुल पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये होता, तो इतका प्रतिभावान होता की पु. ल. देशपांडे यांनी स्वतः अतुलची निवड केली होती,
तासंतास मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडून चितळे मस्त, अंतू बरवा, सखाराम गटणे, नाथा कामत ऐकत बसायचो.
नंदा प्रधान या व्यक्तिरेखेवर सिनेमा करूयात असं आमच्या दोघांचा ठरलं होतं. त्या सिनेमाच्या shooting चे अतुल बरोबर चे दिवस अविस्मरणीय आहेत, या चित्रपटानंतर २७ वर्ष लोटून गेली, पण त्यानंतर आम्ही एकत्र कधी काम केलच नाही, वर्षानूवर्ष फक्त खंत व्यक्त करत राहीलो आपण एकत्र काम करूया.
इतके वर्षत आमच्या भेटीगाठी फारच कमी होत असे पण मैत्री, एक मेकांन बद्दलचं प्रेम, आणि एकमेकांबद्दलचा आदर कायमच राहिला, मध्येच कधीतरी “आहे कुठे काय करते”चा एखादा सीना त्याला आवडला की तो फोन करून माझं कौतुक करायचा. अगदी पंधरा दिवसांपूर्वीच अतुल चा फोन आला होता म्हणाला “आपण नाटक करूया ?” “दोन वडिलांची एक गोष्ट आहे, खूप छान सब्जेक्ट आहे”.
अतुल खूप हुशार, जिद्दी, आशावादी होता, आपल्याला सोडून गेला आहे हे अजून ही खरं वाटत नाही,
, त्याच्या आजाराची त्याने खूप झुंज दिली,खूप लडला,
पण आज खूप मोठी पोकळी निर्माण करून गेला, अतुल आपल्यामध्ये नाही आहे, किंवा आता आपण त्याच्याशी कधी बोलू शकणार नाही, हे अजूनही मनाला पटत नाही, अतुल सारखे माणसं जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा कुटुंबाचं, मित्र मंडळींचं नुकसान होतच पण त्याचबरोबर समाजाचा आणि कलाक्षेत्राचा खूप मोठा नुकसान होतं. अतुलचं कायम माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान राहणार, आजपासून शरीराने तो आपल्याबरोबर नसला तरी एक उमदा कलाकार आणि एक सच्चा मित्र म्हणून कायम आपल्या हृदयामध्ये जिवंत राहणार. त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या असंख्य मित्रपरिवाराला परमेश्वर हे दुःख झेलायची शक्ती देवो.”
=============
हे देखील वाचा : तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
=============
दरम्यान अतुल यांना लिव्हरचा कॅन्सर झाला होता. मात्र त्यांनी त्यावर वर्षभरापूर्वीच यशस्वी मात केली होती. त्यानंतर ते हळूहळू कलाविश्वात सक्रिय होत होते. त्यांनी ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा सिनेमा देखील केला होता. आणि नुकतीच त्यांच्या ‘सूर्याची पिल्ले’ या नवीन नाटकाची घोषणा देखील झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पुन्हा अतुल यांना त्रास जाणवू लागला आणि ते रुग्णालयात भरती झाले. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.