कोणता सिनेमा नाकारल्याचा राजेश खन्नाला पश्चाताप होत होता?
सिनेमातील कोणता रोल कुणाच्या नशिबात लिहिला असतो हे कुणालाही सांगता येत नाही . पण काही रोल हातातून गेल्याचा ‘अफसोस’ मात्र कलावंताना असतो. आपल्या हिंदी सिनेमाच्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत जेव्हा एकाचा रोल दुसऱ्या कडे जातो. तर कधी कधी अनपेक्षित पणे ड्रीम रोल अलगद मिळून जातो. काही जणांच्या हातातून चांगली भूमिका निसटून जाते तर काहींना अनपेक्षित पण बेटर रोल मिळतो. पण एखादी भूमिका नाकारल्याच्या चुकीचे दु:ख मोठे असते. (Rajesh Khanna)
शक्ती सामंता यांच्या गाजलेल्या ‘आराधना’ या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांचा पहिला चॉईस अपर्णा सेन होती. अपर्णा सेन बंगालीतील मोठी अभिनेत्री होती पण मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी त्यावेळेला ती सुध्दा हिंदी सिनेमात काम करण्याचा प्रयत्न करत होती. बंगाली सिनेमामध्ये तर ती मोठी स्टार होतीच पण तिला स्वतःला हिंदीमध्ये सिद्ध करायचे होते. त्यासाठी ती प्रयत्नशील होती. जेव्हा शक्ती सामंता यांनी ‘आराधना’ चित्रपटातील भूमिका तिला ऑफर केली त्यावेळेला तीला खूप आनंद झाला पण जेव्हा तिने या चित्रपटाची भूमिका ऐकली तेव्हा मात्र ती नाराज झाली. कारण या चित्रपटातील दुसऱ्या भागात नायिकेला विधवा म्हणून वावरायचं होतं. (Rajesh Khanna)
आपल्या पहिल्याच चित्रपटात विधवा म्हणून भूमिका करणं तिला प्रशस्त वाटलं नाही आणि तिने नकार दिला. त्यानंतर ही भूमिका शर्मिला टागोरला ऑफर करण्यात आली आणि तिने ती केली. पुढे अपर्णा सेनने जितेंद्र सोबत ‘विश्वास’ या चित्रपटातून पदार्पण केले. योगायोगाने ‘आराधना’ आणि ‘विश्वास’ हे दोन्ही सिनेमे महिना भराच्या अंतराने १९६९ साली प्रदर्शित झाले. ‘आराधना’ सुपरहिट झाला तर ‘विश्वास’ सुपर फ्लॉप. आज कोणाला आठवत देखील नाही. अपर्णा सेन हिला अर्थातच खूप पश्चाताप होत होता आपण एक चांगली भूमिका नाकारल्याचा. (Rajesh Khanna)
असाच पश्चाताप ‘आराधना’ चा नायक राजेश खन्ना (Rajesh Khanna) याला झाला होता. तो देखील शक्ती सामंता यांच्या एका सिनेमाला नाकारण्याचा. शक्ती सामंत यांनी १९७३ साली दोन चित्रपट लॉन्च केले होते. एक होता ‘अजनबी’ आणि दुसरा होता ‘अमानुष’. राजेश खन्नाला (Rajesh Khanna) दोन्ही चित्रपटाची ऑफर होती. परंतु त्यावेळेला राजेश खन्ना सुपरस्टार पदावर होता. त्याने झीनत सोबतचा ‘अजनबी’ स्वीकारला आणि ‘अमानुष’ नाकारला. नंतर ‘अमानुष’ बंगाली सुपरस्टार उत्तम कुमारला ऑफर करण्यात आली. उत्तम कुमार खूष झाला . कारण मूळ ‘अमानुष’ च्या बंगाली आवृतीत त्यानेच काम केले होते. हिंदीमध्ये उत्तम कुमारने ‘छोटीसी मुलाकात’ (१९६८) या चित्रपटात वैजयंतीमाला सोबत पदार्पण केले होते. पण तो चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा हिंदीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होताच.
‘अमानुष’ सिनेमा आणि चित्रपटातील त्याची भूमिका प्रचंड गाजली. इकडे ‘अजनबी’ चित्रपट चालला फारसा नाही. ‘अमानुष’ मात्र सुपरहिट झाला. राजेश खन्नाला (Rajesh Khanna) या गोष्टीचा कायम पश्चाताप वाटत राहिला की या सिनेमातली भूमिका त्याला आधी ऑफर झाली होती. उत्तम कुमार याने त्यानंतर शक्ती सामंता यांच्या ‘आनंद आश्रम’ (सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है) या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटाला ‘अमानुष‘ इतके यश मिळाले नाही परंतु या चित्रपटातील गाणी खूप गाजली.
=============
हे देखील वाचा : राजेश खन्नाचा ‘हा’ शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा
=============
उत्तम कुमार बंगालीमध्ये सुपरस्टार होता. सत्यजित रे यांच्यासोबत त्यांनी भरपूर काम केले होते. हिंदीमध्ये उत्तम कुमार यांनी आपल्या चित्रपटात भूमिका करावी म्हणून राज कपूर यांनी खूप प्रयत्न केले होते .असे म्हणतात ‘जागते रहो’ या सिनेमाच्या बंगाली आवृतीसाठी उत्तम कुमार हा त्यांचा पहिला चॉईस होता. असाच पहिला चॉईस ‘संगम’ या सिनेमाच्या वेळी होता. नंतर हि भूमिका राजेंद्रकुमारला मिळाली. १९६८ साली वैजयंतीमाला सोबत ‘छोटी सी मुलाकात‘ मधून उत्तम कुमारने हिंदीत पदार्पण केले पण सिनेमा फ्लॉप ठरला. नंतर ‘अमानुष’ , आनंद आश्रम’, किताब, दूरिया, देश प्रेमी या सिनेमात भूमिका केल्या. प्लॉट नंबर 5 हा उत्तम कुमार यांनी केलेला सिनेमा, यात त्याने सिरीयल किलरची भूमिका केली होती. (Rajesh Khanna)