ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा सुपरहिट ‘शोले’ सिनेमाला फक्त एकच फिल्मफेअर ॲवार्ड मिळाले!
‘मूवी ऑफ द मिलेनियम’ असा ज्या चित्रपटाचा आपल्याकडे गौरव आणि उल्लेख होतो त्या ‘शोले’ चित्रपटाचे ५० वे वर्ष सध्या चालू आहे. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी ‘शोले’ प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने भारतीय सिनेमाचा इतिहास बदलून टाकला. तब्बल १०० ठिकाणी गोल्डन ज्युबिली, त्याहून अधिक ठिकाणी सिल्वर ज्युबिली! बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये नंबर एक! असे अनेक बहुमान या चित्रपटाने प्राप्त केले. देश विदेशातदेखील या सिनेमाला अनेक गौरव प्राप्त झाले; असे असताना देखील भारतातील ऑस्कर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मात्र ‘शोले’ (Sholay) या चित्रपटाला फक्त एक पारितोषिक मिळाले होते!!
सर्वांसाठीच खूप धक्कादायक असा हा फिल्मफेअर ॲवॉर्ड सेरेमनी होता. हा पुरस्कार सोहळा ३० मार्च १९७६ या दिवशी झाला होता. म्हणजे शोले प्रदर्शित होऊन सात आठ महिने झाले होते. देशात सर्वत्र ‘शोले’ (Sholay) या चित्रपटाची प्रचंड हवा होती. फिल्मफेअरचे नॉमिनेशन जेव्हा जाहीर झाले त्यावेळेला शोले या चित्रपटाला तब्बल नऊ नामांकन मिळाली होती. पण पुरस्काराची जेव्हा वेळ आली तेव्हा या नऊ पैकी फक्त एक पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. हे असं का घडलं? याचं कारण आपण आज पन्नास वर्षानंतर देखील सांगू शकत नाही. तत्पूर्वी आपण ‘शोले’ या चित्रपटाला कोणते नॉमिनेशन मिळाले होते आणि ॲवॉर्ड कोणते मिळाले होते याची थोडी चर्चा करू.
‘शोले’ या चित्रपटाला पहिले नामांकन जे मिळाले होते ते सर्वोत्कृष्ट चित्रपट हे नामांकन होते. यात ‘शोले’ (Sholay) सोबत ‘आंधी’, ‘अमानुष’, ‘दिवार’ आणि ‘संन्यासी’ या चित्रपटांचादेखील समावेश होता. पुरस्कार मात्र यश चोप्रा यांच्या ‘दिवार’ चित्रपटाला मिळाला. दुसरे नॉमिनेशन ‘शोले’ करीता जे मिळाले होते ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून रमेश सिप्पी यांना होते. यावेळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या नामांकनात रमेश सिप्पी यांच्यासोबतच गुलजार (आंधी) शक्ती सामंता (अमानुष) सोहनलाल कंवर (संन्यासी) आणि यश चोप्रा (दिवार) असे होते. पारितोषिक मात्र यश चोप्रा यांना ‘दिवार’ या चित्रपटासाठी मिळाले. सर्वोत्कृष्ट नायक म्हणून संजीव कुमार यांना ‘शोले’ या चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. यासोबत नामांकित झालेले अन्य अभिनेते असे होते; मनोज कुमार (संन्यासी), संजीव कुमार (आंधी), उत्तम कुमार (अमानुष) पारितोषिक मात्र ‘आंधी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी संजीव कुमार यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरी मध्ये ‘शोले’ चित्रपटाला कुठलेही नॉमिनेशन नव्हते.
सर्वोत्कृष्ट सहअभिनेता या कॅटेगिरी मध्ये नॉमिनेशन अमजद खान यांना ‘शोले’ (Sholay) च्या भूमिकेसाठी मिळाले होते. याच कॅटेगिरीमधील अन्य नॉमिनेशन्स असे होते; शशी कपूर (दिवार), प्राण (दो झूठ), प्राण (मजबूर) ,उत्पल दत्त (अमानुष) पुरस्कार मात्र शशि कपूर यांना ‘दिवार’ या चित्रपटासाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या कॅटेगरीमध्ये ‘असरानी’ यांना ‘शोले’ चित्रपटातील भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळाले होते. अन्य नामांकने पुढील प्रमाणे होते. देवन वर्मा (चोरी मेरा काम), केश्तो मुखर्जी (काला सोना), मेहमूद (कैद) पुरस्कार मात्र देवेन वर्मा यांना ‘चोरी मेरा काम’ या चित्रपटातील भुमिकेसाठी मिळाला.
सर्वोत्कृष्ट कथा या केटे कॅटेगिरी मध्ये ‘सलीम जावेद’ यांना ‘शोले’ या चित्रपटासाठी नामांकन मिळाले. याच कॅटेगिरीतील अन्य नामांकन पुढील प्रमाणे होते; कमलेश्वर (आंधी) सलीम जावेद (दिवार) शक्ती राजगुरू (अमानुष) सर्वोत्कृष्ट कथानकाचे पारितोषिक सलीम जावेद यांनाच मिळाले पण ‘दिवार’ या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ‘आर डी बर्मन’ यांना ‘शोले’ या चित्रपटासाठी नॉमिनेशन मिळाले. याच कॅटेगिरीतील अन्य नामांकन पुढील प्रमाणे होते लक्ष्मीकांत प्यारेलाल (दुल्हन), आर डी बर्मन (खेल खेल मे), राजेश रोशन (ज्युली) शंकर जयकिशन (संन्यासी) पुरस्कार मात्र राजेश रोशन यांना ‘ज्युली’ या चित्रपटासाठी मिळाला. (Sholay)
सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या नॉमिनेशनमध्ये आनंद बक्षी यांना ‘मेहबूबा मेहबूबा’ या ‘शोले’ (Sholay) मधील गाण्यासाठी नॉमिनेशन मिळाले. अन्य नॉमिनेशन पुढील प्रमाणे होते. आयेगी जरूर चिठ्ठी (आनंद बक्षी- दुल्हन), तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही (गुलजार- आंधी) दिल ऐसा किसी ने मेरा तोडा ( इंदीवर-अमानुष) चल संन्यासी मंदिर मे (विश्वेश्वर शर्मा- संन्यासी), पुरस्कार मात्र इंदीवर यांना ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा’ या ‘अमानुष’ मधील गाण्यासाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक या कॅटेगिरी मध्ये आर डी बर्मन यांना ‘मेहबूबा मेहबूबा’ या ‘शोले’ मधील गाण्यासाठी नॉमिनेशन मिळाले. आणि इतर नॉमिनेशन असे होते ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा’ (किशोर कुमार- अमानुष), क्या मर सकेगी (मन्ना डे- संन्यासी), मै प्यासा तुम सावन (किशोर कुमार-फरार), ओ मांझी रे अपना किनारा (किशोर-खुशबू) पुरस्कार मात्र किशोर कुमार यांना ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा’ या ‘अमानुष’ मधील गाण्यासाठी मिळाला.
===========
हे देखील वाचा : ‘बिग बीं’ चा ‘मै आजाद हूं’ आठवतो का?
===========
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका या कॅटेगिरी मध्ये एकही नॉमिनेशन ‘शोले’ला नव्हते! ‘शोले’(Sholay) या चित्रपटाला त्यावर्षी फक्त एकच अवॉर्ड मिळाले जे बेस्ट एडिटिंगचे होते . जे आपले मराठी कलाकार एम एस शिंदे यांना मिळाले होते. तब्बल नऊ नामांकन मिळाली होती पण नंतर केवळ एका पुरस्कारावर ‘शोले’ ला समाधान मानावे लागले. हे असे का घडले यावर नंतर खूप चर्चा झाली. त्यावर काही पुस्तक देखील आली. याचा आपण जर खोलवर शोध घेतला तर असे दिसते की त्या काळात भारतामध्ये आणीबाणी चालू होती. हिंसक वातावरणाला खतपाणी मिळेल अशा कुठल्याही गोष्टीला त्या काळात मान्यता नव्हती. त्यामुळे ‘शोले’ या चित्रपटाला पुरस्कारांच्याबाबत फार मोठा उपवास सहन करावा लागला असे वाटते.