महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
२९ वर्षांच्या संसारानंतर संगीतकार ए आर रहमान आणि पत्नी सायरा बानू विभक्त
मनोरंजनविश्वामध्ये घटस्फोट होणे ही काही नवीन आणि मोठी बाब राहिलेली नाही. लग्नानंतर अगदी काही वर्षातच किंवा लग्नाला अनेक वर्ष उलटल्यानंतरही घटस्फोट घेणारे कलाकार या क्षेत्रात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबायचे नाव घेत नाही तोवर अजून एका घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे. मनोरंजन विश्वातील आघाडीचा जगप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमानने घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. २९ वर्षांच्या संसारानंतर हे दोघंही घटस्फोट घेणार आहेत. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत. सायरा बानू व ए आर रेहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत एक निवेदन जारी केले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात लिहिले आहे की, “श्रीमती सायरा आणि त्यांचे पती प्रसिद्ध संगीतकार अल्लाहक्का रेहमान (ए. आर. रहमान) या दोघांच्या वतीने आणि त्यांच्या सूचनेनुसार, वंदना शाह आणि असोसिएट्स या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल पुढील निवेदन जारी करत आहेत.”
“लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर श्रीमती सायरा यांनी त्यांचे पती ए आर रेहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा हा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेतला आहे. या जोडप्याचे एकमेकांवर प्रेम आहे, मात्र त्यांच्या नात्यात तणाव आणि अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी त्यांना कोणालाही दूर करता येणार नाहीत. या आव्हानात्मक आणि कठीण काळात सर्वांनी समजूदारपणा दाखवत आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती सायरा यांनी सर्वांना केली आहे. कारण, सध्या त्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहेत”
दरम्यान ही बातमी ए आर रेहमान यांच्या फॅन्ससाठी खूपच धक्कादायक आहे. ए आर रेहमान आणि सायरा यांचा निकाह १९९५ मध्ये झाला होता. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत. या घटस्फोटाच्या घोषणेनंतर संगीतकार ए आर रेहमान यांनी एक्स पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रहमान यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““आम्ही सहजीवनाची ३० वर्षे पूर्ण करू अशी आशा आम्हाला होती पण, प्रत्येक गोष्टीचा एक अप्रत्यक्ष अंत असतो. एखादी गोष्ट विखुरली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही, एकदा विखुरलेले तुकडे पुन्हा जोडले तरीही त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा… आयुष्याच्या या नाजूक टप्प्यावर आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार”
दरम्यान ए आर रहमान यांच्या मुलांनी देखील या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासोबत उभे राहत, प्रार्थना करत त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.