भूषण प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुषा दांडेकरने लिहिले खास पोस्ट
‘जुळून येती रेशीमगाठी’ ११ वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट
टेलिव्हिजनविश्वात नेहमीच मालिकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. प्रत्येक चॅनेलवर नानाविध मालिका सुरु असतात. या मालिका संपल्या की लगेच त्यांच्या जागी नवीन मालिका येतात. हे चक्र सतत सुरु असते. एखादी नवीनच सुरु झालेली मालिका किती चांगली हिट असली तरी आज ना उद्या संपणारच असते. प्रेक्षकांचे भेबाहेरून प्रेम मिळालेली एखादी मालिका जरी संपली तरी ती कायम सगळ्यांच्या मनात एका कोपऱ्यात असते.
आजही अनेक जुन्या मालिकांची आठवण प्रेक्षकांना सतत येत असते. अनेकदा ‘जुन्या मालिकांची सर आजच्या मालिकांना नाही’ असे देखील म्हटले जाते. अशीच एक जुनी मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. झी मराठीच्या या मालिकेने अपार लोकप्रियता मिळवली. मालिकेच्या शीर्षक गीतापासून ते कलाकार, अभिनय, संगीत, कथा आदी सर्वच बाबींनी प्रेक्षकांचे मन जिंकले. आजही या मालिकेचे शीर्षक गीत ऐकणारे असंख्य लोकं आपल्याला सहज दिसतील. नुकतेच या मालिकेला ११ वर्ष पूर्ण झाले. मालिकेला ११ वर्ष होऊनही आजही या मालिकेतील सीन प्रेक्षकांना लख्ख आठवतात.
मालिकेला ११ वर्ष झाल्याचे औचित्य साधून या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ही मालिका आजही तिच्यासाठी किती खास आहे याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या असून, सोबतच मालिकेच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. सोबतच प्राजक्ताने या मालिकेतील त्यांचे काही सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत.
प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,
“१- फिरूनी नवी जन्मेन मी – मी मराठी
२- सुवासिनी – स्टार प्रवाह
३- नकटीच्या लग्नाला यायचं हं! – झी मराठी
४- सुगरण – साम मराठी (निवेदन)
५- गाणे तुमचे आमचे – ई टिव्ही मराठी – (निवेदन)
६- गुडमोर्निंग महाराष्ट्र – झी मराठी – (निवेदन)
७- मस्त महाराष्ट्र – – Livjng foods आणि झी मराठी (travel anchor)
८- महाराष्ट्राची हास्यजत्रा – सोनी मराठी
.
गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय. ह्या वर्षांमध्ये टिव्ही जगतात वरील projects केले; पण “जुळून येती रेशीमगाठी” वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे. काल ह्या मालिकेला सुरू होऊन ११ वर्ष झाली. ११ वर्षात इतर अनेक चित्रपट- मालिका येऊनही रेशीमगाठी कधी झाकोळली गेली नाही. आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतूक करतात. प्रेमाचा वर्षाव चालूच आहे. हेच ह्या मालिकेचं खरं यश. हीच प्रेक्षकांची नी आमची रेशीमगाठ. ही मालिका माझ्या पदरात पडली ह्याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच.”
प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील भरपूर प्रतिक्रिया दिल्या असून, त्यांनी देखील ही मालिका ते आजही बघत असल्याचे सांगितले. काहींनी मालिकेचे गाणे आजही त्याच्या फोनची रिंगटोन असल्याचे सांगितले तर काहींनी आजही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाइल फोटो आदित्य मेघनाचा असल्याचे सांगितले. एकूणच काय तर जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना आणि ललित प्रभाकरने साकारलेला आदित्य देसाई ही जोडी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे.