किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
बिमलदांचा क्लासिक म्युझिकल हिट : मधुमती
ख्यातनाम दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५५ साली दिलीप-वैजयंतीमाला यांना घेवून शरतचंद्राच्या ’देवदास’ या कादंबरीवर सिनेमा बनवला. सगळं काही परफेक्ट जमलेलं असताना देखील रसिकांनी केवळ १९३६ च्या सैगलच्या ’देवदास’ सोबत तुलना केल्याने सिनेमाला यश मिळाले नाही. आज स्वतंत्ररित्या या देवदासकडे पाहिल्यावर त्यातील प्रत्येक फ्रेमवर बिमलदांनी किती मेहनत घेतली होती ते जाणवते. (Madhumati)
या सिनेमानंतर त्यांनी हिच जोडी रीपीट केली त्यांच्या ’मधुमती’ (Madhumati) मध्ये! वस्तुत: हा सिनेमा काढताना त्यांच्या डोळ्यापुढे १९४९ साली आलेला ’महल’ होता. जो फटका देवदासला बसला तो या सिनेमाला देखील बसण्याची शक्यता जास्त होती कारण दोन देवदासमध्ये किमान २० वर्षांचे अंतर होते पण यात तर पाच -सात वर्षाचेच अंतर होते. तरी त्यांनी हि रिस्क घ्यायचे ठरवले. ऋत्विक घटक यांची कथा घेतली त्यावर नबेंदु घोष यांनी साचेबध्द पटकथा लिहिली. संवाद राजिंदर सिंग बेदी आणि घटक यांचे होते. बिमलदा अतिशय ताकतीचे दिग्दर्शक होते. या सिनेमाचा मुहूर्त कार्लोव्ही व्हॅली इथे फिल्म फेस्टीवलच्या दरम्यान करण्यात आला. छायाचित्रणाची कला त्यांना अवगत असल्याने दृष्याची परीणामकारकता त्यांच्या सिनेमातून ठळकपणे दिसून येते.
मधुमती (Madhumati) हा सिनेमा पुनर्जन्मावर आधारीत होता. बिमलदांनी सिनेमाची हाताळणी इतकी कल्पकपणे केली की आज साठ वर्षांनी देखील सिने अभ्यासकांसाठी हा सिनेमा एक आदर्श वस्तुपाठ ठरला. सिनेमाचे संगीत हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होते. याला सलीलदांचे संगीत होते. शैलेन्द्रच्या अलवार काव्याने कलात्मक उंची गाठली. नैनितालच्या रम्य निसर्गात चित्रीकरण करून बिमलदांनी कृष्णधवल रंगात प्रेमाचे सप्तरंग फुलविले. आजारे मै तो कबसे खडी इस पार, सुहाना सफर और ये मौसम हंसी, दिल तडप तडप के कह रहा है आभी जा, टूटे हुये ख्वाबोने, घडी घडी मोरा दिल धडके, दैय्या रे दैय्यारे चढ गयो पापी बिछुवा, जंगल मे मोर नाचा, जुल्मी संग आंख लडी सखी मै कासे कहूं या गाण्यांनी जबरदस्त लोकप्रियता हासिल केली.
दिलीप गुप्ता यांच्या कॅमेर्याने टिपलेला निसर्ग आणि मुग्ध प्रणय रसिकांच्या आजही लक्षात आहे. सिनेमात प्राण ने रंगवलेला उग्रनारायण उरात धडकी भरवणारा होता. जॉनी वॉकरची अदाकारी जमून आली होती. नैनितालला सहा आठवड्याचे शूट केल्यावर मुंबईत जेव्हा फिल्म डेव्हलप केली तेव्हा लक्षात आले की धुक्यामुळे काही शॉटस वाया गेले आहेत. पुन्हा परत तिथे जाऊन चित्रीकरण करणे शक्यच नव्हते त्यावर सिनेमाचे कलादिग्दर्शक सुधेंन्द्रु रॉय यांनी तोडगा काढला.
==============
हे देखील वाचा : मिथुन चक्रवर्तीच्या ‘डिस्को डान्सर’ सिनेमाची यशोगाथा !
==============
नाशिकजवळ इगतपुरी येथे त्यांनी पाईनचे बनावट वृक्ष उभे केले. गॅसच्या फुग्यातून धुक्याचा आभास निर्माण केला व नैनितालचे वाया गेलेली फिल्म रिशूट केली. काही चित्रीकरण गोरेगावला आरे मिल्क कॉलनीत केले. ऑपेरा हाऊस जवळच्या रॉक्सी सिनेमात याचा शाही प्रीमीयर झाला. पुढे हा सिनेमा ऑस्करला देखील पाठवण्यात आला. इकडे या सिनेमाला तब्बल ९ फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. मधुमती (Madhumati) चा हा पुरस्काराचा विक्रम पुढची ४० वर्षे अबाधित होता (१९९६ साली डीडीएलजे तो १० पारीतोषिके पटकावून मोडला!) सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाच्या इतिहासात मधुमती एक माइलस्टोन ठरला आणि रसिकांच्या दिलातही.