बस कंडक्टर ते सुपरस्टार जाणून घ्या रजनीकांत यांचा थक्क करणारा प्रवास
खऱ्या अर्थाने सुपरस्टार हे नाव सार्थ करणारा अभिनेता म्हणजे थालयवा रजनीकांत. फक्त साऊथचा नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. रजनीकांत यांच्यासाठी त्यांचे फॅन्सचे प्रेम थक्क करणारे आहे. पोस्टरवर होणारे दुग्धाभिषेक, मंदिराची बांधणी हे सर्व निव्वळ फॅन्सचे प्रेम आहे. रजनीकांत आज वयाची ७५ वर्ष पूर्ण करत असताना देखील ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकतात आणि त्यांचे सिनेमे अफाट चालतात. त्यांची स्टाईल, त्यांची स्माईल सर्वच खास आणि प्रसिद्ध आहे.
रजनीकांत नुसते नाव जरी उच्चारले तरी सगळीकडे एकच कल्ला होईल. ‘रजनीकांत’ या नावातच कमालीची ताकद आहे. केवळ याच एका नावावर तिकीटबारीवर गर्दी होते, सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो. सगळ्याच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या, देवतुल्य अशा रजनीकांत यांच्या सिनेमाची कायमच प्रतीक्षा असते. रजनीकांत यांचे व्यक्तिमत्व आणि क्रेझ बघता त्यांना ‘थलायवा’ किंवा ‘सुपरस्टार’ ही बिरुदं अगदी समर्पक ठरतात.
रजनीकांत म्हणजे हटके आणि कल्पनेपलीकडील स्टाईल. गॉगल लावण्याची स्टाईल, नाणे फेकण्याची स्टाईल, सिगरेट पिण्याची स्टाईल, रुमाल गळण्यात बांधण्याची स्टाईल, आदी अनेक स्टाईल या रजनीकांत यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच रजनी सरांचे कमालीचे आकर्षण आहे. त्यांचा अभिनय असो, स्टाईल असो सर्वच गोष्टी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडतात. अशा या जागतिक सुपरस्टार असणाऱ्या रजनीकांत यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.
केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टी नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील राजनीकांत यांनी सर्वोत्कृष्ट काम करत जागतिक ओळख कमावली. साऊथ इंडस्ट्रीमध्ये तर रजनीसर देवासारखेच आहेत. रजनीकांत यांचा सिनेमा म्हटला की तोबा गर्दी होणार हे सर्वश्रुतच असते. २४ तासात कधीही त्यांच्या सिनेमाचे शो लागतात आणि हाऊसफुल्ल देखील होतात. तिथले लोक अजूनही त्यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यांचे साऊथमध्ये मंदिर देखील बांधले गेले आहे. आज रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा अभिनय प्रवास.
मूळ महाराष्ट्रीयन असलेल्या रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. चार भावंडांमध्ये रजनीकांत सरावात लहान होते. त्यांचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल होते. आज जरी रजनीकांत या नावाला मोठे वलय प्राप्त झाले आहे. त्यांचे नावच पुरेसे आहे. ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र त्यांचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. त्यांचे बालपण खूपच कष्टाचे होते. रजनीकांत लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा अडचणी आणखी वाढल्या.
कुलीपासून कंडक्टरपर्यंत काम करून चालवलं घर एक वेळ अशी आली की घर चालवण्याची जबाबदारी रजनीकांत यांच्या खांद्यावर आली. घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी सर्व कामे केली. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी कुलीपासून कंडक्टरपर्यंत काम केले. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळात बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्विसेसमध्ये कंडक्टरची नोकरी केली. त्यावेळी त्यांना फक्त ७५० रुपये इतका पगार मिळायचा.
रजनीकांत यांना त्यांच्यात असलेली अभिनयाची आवड जाणवली. मात्र, घरची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना नोकरी करावी लागत होती. अखेर बस कंडक्टर म्हणून काम करत असताना रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाच्या आवडीचा विचार केला. त्यावेळी रजनीकांत यांच्या बहादूर नावाच्या मित्राने त्यांना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्या मित्राचा सल्ला ऐकला आणि अभिनय शाळेत प्रवेश करत अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.
रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला त्यांना निगेटिव्ह भूमिका मिळाल्या मात्र त्यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला. याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना रजनीकांत यांना ‘अपूर्व रंगगंगल’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता ही ऑफर स्वीकारली. सन १९७७ मध्ये रिलीज झालेल्या ‘भुवन ओरु केल्वीकुरी’ या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका मिळाली आणि मग त्यांच्या आयुष्याला नवीन मार्ग मिळाला.
त्यानंतर‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मने जिंकली. रजनीकांत यांच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचं तर, त्यांनी ‘2.0’, ‘अंधा क़ानून’, ‘बेवफाई’, ‘हम’, ‘जीत हमारी’, ‘जॉन जानी जनार्दन’, ‘चालबाज’, ‘खून का कर्ज’, ‘फुल बने अंगारे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रजनीकांत यांनी हिंदीसोबतच, कन्नड, मल्याळम, तामिळ, बंगाली आदी अनेक सिनेसृष्टीमधे काम केले आहे. आजच्या तारखेला रजनीकांत हे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. परदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. रजनीकांत हे राजकारणातही सक्रिय आहेत.
सुरुवातीच्या काळात ७५० रुपये पगार घेणारे रजनीकांत आज एका सिनेमासाठी १०० कोटींपेक्षा अधिक मानधन घेतात. त्यांनी त्यांच्या ‘जेलर’ या सिनेमासाठी त्यांनी ११० कोटी रुपये होते. सिनेमांसह रजनीकांत यांना महागड्या, आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.