किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा तालमय प्रवास
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योय मालवली.
झाकीर हुसैन हे त्यांच्या अभूतपूर्व अशा तबलावादनाच्या कलेमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते. तबला आणि झाकीर हुसैन असे जणू समीकरणच बनले होते. तबल्याचे नाव निघताच आपसूकच झाकीर हुसैन हे नाव सोबत निघायचे. झाकीर हुसैन यांनी त्यांच्या तबलावादनामुळे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. आज त्यांचे दुःखद निधन झाले आणि एक मोठ्या आणि महान कलाकारांना आपण गमावले आहे. जाणून घेऊया झाकीर हुसैन यांचा प्रवास.
९ मार्च १९५१ या दिवशी झाकीर हुसैन यांचा मुंबईत जन्म झाला. झाकीर हुसैन यांचे खरे आडनाव कुरेशी असं होतं. मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं. त्यांना तबला वादनाचे बाळकडू त्यांच्या घरातूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. झाकीर हुसैन यांचे वडील सुप्रसिद्ध तबला वादक अल्लारख्खा खान हे होते, तर त्यांच्या आईचे नाव बावी बेगम असे होते. घरात तबला वादनाला पूरक असे वातावरण असल्यामुळे त्यांनी खूपच कमी वयात तबल्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
झाकिर हुसैन रोज आपल्या वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे, त्यांना त्यांच्या वडिलांनी अनेक श्लोक आणि मंत्रही शिकवले होते. यात त्यांना सरस्वती आणि गणेश वंदनाही शिकवण्यात आले होते. झाकीर यांचे तबल्यावर खूप प्रेम होते. त्यांना तबला वादक व्हायचे होते. मात्र त्यांच्या आईला बावी बेगम यांना झाकिर यांनी तबला वाजवावा, असे वाटत नव्हते. त्यांना झाकिर यांना डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायचे होते. मात्र झाकीर यांचे तबला प्रेम प्रचंड होते. ते आणि तबला दूर होऊच शकत नव्हते. अखेर त्यांच्या आईंनी देखील त्यांना तबलावादन करू दिले.
लहानपणापासूनच झाकीर हुसैन यांनी त्यांचे संगीत कौशल्य दाखवायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी झाकीर हुसैन यांनी रंगमंचावर सादरीकरण करून तबल्याला नवी ओळख मिळवून दिली. त्यांनतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचे तबला वादन ऐकून प्रत्येक जणं फक्त एकच गोष्ट म्हणायचा आणि ती म्हणजे, “वाह उस्ताद वाह.”
झाकीर हुसैन सेन १२ वर्षांचे असताना ते वडिलांसोबत एका कॉन्सर्टला गेले होते. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनी त्या मैफलीला हजेरी लावली होती. झाकीर हुसैन वडिलांसोबत स्टेजवर गेले. परफॉर्मन्स संपल्यानंतर झाकीर यांना ५ रुपये मिळाले. तीच त्यांची पहिली कमाई देखील होती.
हळूहळू झाकीर हुसैन यांची कीर्ती वाढायला लागली. त्यांचे तबला वादनाचे कसब लोकांपर्यंत पोहचायला लागले. झाकीर हुसैन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. पुढे त्यांनी पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. १९७० मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, “शक्ती” नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.
झाकीर हुसैन यांनी स्टेजवर तबला वादनच केले नाही तर त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले, चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता. झाकीर हुसैन यांनी आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले. ‘हीट अँड डस्ट’ आणि ‘इन कस्टडी’ या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले. झाकीर यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१६ मध्ये झालेल्या ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते, तेव्हा हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
झाकीर हुसैन यांनी १९८९ या वर्षी हीट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला होता. या चित्रपटात अभिनेते शशी कपूर देखील झळकले होते. १९९८ मध्ये त्यांनी ‘सांझ’ या चित्रपटात काम केले होते. शबाना आझमी यांनीही या चित्रपटात काम केले होते. झाकीर हुसैन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत.
झाकीर हुसैन यांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मृगया आणि इन कस्टोडिया डेल कॉन्डोर या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि ग्रॅमी पुरस्कार देऊनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.