Govinda Birthday : बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या गोविंदाच्या करियरला ‘या’ गोष्टीमुळे लागली उतरती कळा
बॉलिवूडच्या (Bollywood) ग्लॅमर जगात सगळ्यांनाच यश मिळते असे नाही. खूप कमी लोकं किंवा कलाकार असे असतात, ज्यांना या क्षेत्रात यश मिळते, प्रसिद्धी देखील मिळते, पैसा मिळतो आणि अफाट लोकप्रियता देखील मिळते. सगळ्यांच्याच नशिबात या सर्व गोष्टी असतात असे नाही. मात्र बॉलिवूडमध्ये एक लखलखता तारा असा होता ज्याने या सर्वच गोष्टी मिळवल्या. त्याला सगळ्यांनीच नाव दिले बॉलिवूडचा हिरो नंबर वन. अर्थात आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता गोविंदा. गोविंदा आज त्याचा ६२ वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. (Govinda Birthday)
२१ डिसेंबर १९६३ साली मुंबईमधील विरारमध्ये एका पंजाबी कुटुंबात गोविंदाचा (Govinda) जन्म झाला. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील अरुण आहुजा (Arun Ahuja) यांनी त्याला हात लावण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीदरम्यान स्वतः गोविंदाने याबद्दल खुलासा करताना हे सांगितले होते. गोविंदाने सांगितले होते, “मी जेव्हा गर्भात होतो तेव्हा आई (निर्मला देवी) साध्वी बनली होती. ती बाबांसोबत राहायची, पण अगदी साध्वीसारखी… काही महिन्यांनंतर, जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा बाबांनी मला हात देखील लावला नाही. त्यांना असे वाटायचे की, माझ्यामुळेच माझी आई साध्वी झाली. मात्र नंतर त्यांचा हळूहळू माझ्यावरील राग निवळला आणि त्यांनी त्यांचा राग सोडला.’
गोविंदाचे वडील अरुण कुमार आहुजा हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी ३० – ४० चित्रपटांमध्ये काम केले होते. तर, गोविंदाची आई निर्मला देवी (Nirmala Devi) या शास्त्रीय गायिका होत्या, त्या चित्रपटांसाठी गाणी म्हणायच्या. चित्रपटाची पार्श्वभूमी असूनही गोविंदाने बऱ्याच संघर्षानंतर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र एका चित्रपटाच्या फ्लॉप होण्यामुळे गोविंदाच्या वडिलांचे मोठे नुकसान झाले आणि ते आर्थिक तंगीमध्ये अडकले.
गोविंदाने मिळवलेले यश त्याच्या स्वतःच्या हिंमतीवर होते. त्याने मोठ्या कष्टाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. गोविंदाने अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मत करत हे यश मिळवले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गोविंदा मोठा झाल्यावर त्याने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एकदा मुंबईतील हॉटेल ताज (Hotel Taj) मध्ये स्टुअर्टच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. जेव्हा तो मुलाखतीसाठी गेला तेव्हा त्याला ती नोकरी मिळाली नाही. नकार मिळण्याचे कारण जेव्हा गोविंदाने विचारले तेव्हा त्याला समजले की, त्याला इंग्रजी येत नसल्याने ही नोकरी मिळाली नव्हती. कारण त्याने मुलाखत इंग्रजी येत नसल्याने हिंदीमध्ये दिली होती. (Govind’s Journey)
गोविंदाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, वडिलांच्या शिकवणुकीमुळेच त्याला अभिनयाची प्रेरणा मिळाली. त्याने सांगितले की, एकदा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की ते कोणताही व्यवसाय करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तू तेच कर जे तू गुंतवू शकतो. गोविंदाने सांगितले की, त्याच दिवसापासून त्याने केवळ अभिनयाचा निर्णय घेतला.
गोविंदाने (Govinda) त्याच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक सुपरहिट, ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट दिले. ९० चा काळ खऱ्या अर्थाने फक्त गोविंदानेच गाजवला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गोविंदाचा सिनेमा म्हटलं की ही हिट होणारच असे जणू समीकरणच झाले होते. त्याचा डान्स, त्याची ऍक्शन, त्याची स्टाईल, त्याचा विनोद सर्वच हटके होते. चित्रपटांमध्ये भाव खाऊन जाणारा गोविंदा नेहमीच त्याच्या चित्रपटाचा राजा असायचा.
‘इल्जाम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून गोविंदाने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. १९९० ते १९९९ हा काळ गोविंदासाठी खूप चांगला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळत गेले. त्याने जो सिनेमा केला तो सुपरहिट झाला. गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने हिरो नंबर वन, कुली नंबर वन, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, स्वर्ग, नसीब यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदा शेवटचा २०१९ मध्ये रंगीला राजामध्ये दिसला होता.
गोविंदा इतका गाजत होता की, प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्याला त्याच्या चित्रपट गोविंदाचा पाहिजे होता. एका माहितीप्रमाणे त्याने एका वेळेला ७० सिनेमे (70 Movie) साईन केले होते. गोविंदा हा असं करणार पहिला स्टार होता. अभिनेत्याकडे इतके काम होते की तो दिवसातून ५-५ शिफ्टमध्ये शूट करत होता. गोविंदाने तब्बल 14 वर्षे बॉलिवूडवर राज्य (14 Years Of Stardom) केले. हिंदी चित्रपटसृष्टीला त्याने अनेक हिट चित्रपट दिले.
गोविंदाने आपल्या करिअरमध्ये १६५ हून अधिक चित्रपट केले आहेत. ८० आणि ९० च्या दशकात गोविंदाचा स्टार खूप गाजला होता. त्यावेळी तो दिसलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. त्याच्या कारकिर्दीत एक असा टप्पा आला जेव्हा एका वर्षात त्याचे १४ चित्रपट (14 Movie) सलग प्रदर्शित झाले. त्या काळात गोविंदा तिन्ही खानांना स्पर्धा देत असे.
हे देखील वाचा : अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?
अभिनेता गोविंदाने कसा घेतला शाहरुख खानचा बदला?
गोविंदाने त्याच्या अनेक चुकीच्या सवयींमुळे त्याचे करियर खराब करून घेतले असल्याचे अनेकांचे म्हणे आहे. गोविंद कधीच वेळेवर सेटवर पोहचत नव्हता. अगदी अमिताभ बच्चन, रजनीकांत, अमरीश पुरी आदी दिग्गज कलाकार देखील गोविंदाची वाट बघत तासंतास बसायचे. त्यामुळे अनेकानी त्याला चित्रपटात घेणे टाळले.
गोविंदाने राजकारणात (Politics) देखील प्रवेश करत त्याच्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली होती, मात्र तिथे त्याला अपयश आले. २०००पासून गोविंदाचा वाईट टप्पा सुरू झाला. ‘भागम भाग‘ (२००६), ‘पार्टनर‘ (२००७) यांसारख्या चित्रपटांतून त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. गोविंदाचा मागील चित्रपट ‘रंगीला राजा‘ हा बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला होता.