Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
पन्नासच्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारा हरफन मौला कलाकार किशोर कुमार (Kishore Kumar) याने साठच्या दशकाच्या मध्यवर्ती एक गंभीर चित्रपट बनवला होता. किशोर कुमार यांच्या अभिनय प्रकृतीला छेद देणारा हा चित्रपट होता. हा खरंतर एक क्लासिक चित्रपट होता. यात किशोर कुमारने मूकबधिर मुलांची मानसिकता अतिशय भावस्पर्शी रीतीने पडद्यावर साकारली होता. चित्रपट होता ‘दूर गगन की छाव मे’. या चित्रपटात किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. किशोर कुमारने यात साकारलेली निवृत्त सैनिकाची भूमिका खूप उत्कट आणि काळजात घर करणारी अशी होती.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सबकुछ किशोर कुमार (Kishore Kumar) असा हा चित्रपट होता. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, संकलक, कथा, पटकथा, संवाद, गीतकार… अशी भन्नाट अष्टपैलू कामगिरी किशोर कुमार यांनी केली. हा चित्रपट १९५८ साली आलेल्या अमेरिकन चित्रपट The Proud Rebel वर आधारीत होता. किशोर कुमार यांनी पडद्यावर कायम विनोदी भूमिका साकारल्या. अशी एखादीच भूमिका त्यांनी पडद्यावर साकारली ज्यामध्ये त्याच्या अभिनयाचा कस लागलेला दिसतो. या चित्रपटातील गाणी Shailendra यांनी लिहिली होती तर संगीत स्वतः किशोर कुमार यांनी दिले.
या चित्रपटातील गाणी किशोर कुमार (Kishore Kumar) मन्ना डे, लता मंगेशकर, Asha bhosle यांनी गायली होती. या चित्रपटात तब्बल १२ गाणी होती. यातील एक गाण्याचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. किशोर कुमारला या चित्रपटासाठी एक थीम सॉंग हवे होते. त्यासाठी त्यांनी गीतकार शैलेंद्र यांना सिच्युएशन सांगितली. त्यावेळी गीतकार शैलेंद्र त्यांच्या ‘तिसरी कसम’ या होम प्रोडक्शन चित्रपटात बिझी होते.
किशोर कुमारने गाण्याची सिच्युएशन त्यांना फोनवर सांगितली. पण शैलेंद्र यांनी सांगितले की आपण एकदा प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतरच मी सिच्युएशन समजून घेईल आणि मग त्यावर गाणे लिहीन. पण शैलेंद्र त्या काळात प्रचंड बिझी होते. त्यामुळे त्यांना यायला काही जमत नव्हतं. शेवटी चित्रपट तर पूर्ण करायचा होता म्हणून किशोर कुमार (Kishore Kumar) नेच ते गाणं लिहिलं. गाण्याचे बोल होते ‘आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहा गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार मिले…..’ गाणं अतिशय अप्रतिम बनलं होतं. किशोर कुमार यांच्या लेखणीतून आलेलं हे त्याच्या स्वत: दिग्दर्शित चित्रपटातील पहिलंच गाणं होतं.(या पूर्वी त्याने झुमरूमधील दोन गाणी स्वत: लिहिली होती!)
हे गाणं लिहिल्यानंतर ते तडक शैलेंद्र यांच्याकडे गेले आणि शैलेंद्रच्या समोर गाण्याचा कागद ठेवला. गीतकार शैलेंद्र यांना हे गाणं खूप आवडलं. त्यांनी किशोर कुमार (Kishore Kumar) ला मिठीच मारली. आणि म्हणाले, ”यार किशोर तू तर कमाल केलीस. बहुत बढीया . मै दावे के साथ कहता हू अगले सौ साल तक ये गाना अमर रहेगा !”
===========
हे देखील वाचा : Kishore Kumar : सवेरे का सूरज… गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
===========
नंतर किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी हे गाणं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं आणि चित्रपटात घेतलं. १९६४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला पण सुरुवातीला चित्रपटाला फारसे व्यवसाय यश मिळालं नाही. किशोर कुमार यामुळे खूप नाराज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाची भरपूर तारीफ केली. बाबुराव पटेल यांनी आपल्या ‘फिल्म इंडिया’ या सिने मासिकात या चित्रपटाविषयी लिहिताना म्हटलं होतं की ’खरं तर हा चित्रपट क्लासिक बनता बनता राहिला! पण त्याचा दर्जा उत्कृष्टच आहे.’ मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवून बनवलेल्या चित्रपटाला आलेले अपयश पाहून किशोर कुमार पुन्हा कधीच गंभीर विषयाच्या चित्रपटाकडे गेला नाही.
पण गंमत म्हणजे याच सिनेमाचा रिमेक तामिळमध्ये ‘रामू’ या नावाने १९६७ साली आला होता आणि या चित्रपटाला चक्क राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता! नंतर हाच सिनेमा तेलगू मध्ये आणि मल्याळम भाषेत देखील बनला. एक अतिशय अप्रतिम दर्जाचं गाणं किशोर कुमार यांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं. नंतर रिपीट रनला हा जेव्हा चित्रपट पुन्हा रिलीज होत गेला त्यावेळेला रसिक चित्रपटाला गर्दी करू लागले पण चित्रपटाला सुरुवातीला आलेले व्यावसायिक अपयश किशोर कुमार (Kishore Kumar) ला पुन्हा असे चित्रपट काढायला धजावत नव्हते!