Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Sohrab Modi : रुपेरी पडद्यावरील राजबिंडा सिंह
हिंदी चित्रपट सृष्टीत या व्यक्तिमत्वाला ‘राजबिंडा सिंह’ या विशेषणाने ओळखले जायचे त्या कलावंताचे व्यक्तिमत्त्व मुळी जंगलातील राजाशी नातं सांगणार होते. ते धैर्य, तो भव्य दिव्यपणा, तो दरारा, ती मर्दुमकी आणि तसाच शाही रुबाब ! या सर्व गुणांचा समुच्चय घेऊन चित्रपट सृष्टीत वावरणारा तो कलाकार होता सोहराब मोदी (Sohrab Modi). शौर्य आणि सौंदर्य याचा ध्यास घेऊन झपाटल्यागत त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली.
या राजबिंड्या ध्येयासक्त कलाकाराने भव्य दिव्य अशी चित्रपटांची मालिका निर्माण केली. भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट ‘झांसी की रानी‘ बनविण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिर्झा गालिब‘ या सिनेमाला पहिला राष्ट्रीय हिंदी चित्रपट पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाचे कौतुक पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी केले होते.

मिनर्व्हा मुव्ही टोन ही चित्र निर्मिती संस्था त्यांनी १९३६ साली सुरु केली. (डरकाळी फोडणारा सिंह हा या संस्थेचा लोगो होता!) पुकार, शीश महल, सिकंदर, पृथ्वी वल्लभ, मिर्झा गालिब, झांसी की रानी हे त्यांचे चित्रपट त्यांच्या अजोड कर्तुत्वाला साजेसे असे होते. या सर्व चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारी भव्यता होती पण निव्वळ दिखाऊपणाचा हव्यास किंवा पोशाखी कारभार नव्हता. त्यात पल्लेदार संवादांची आतषबाजी होती पण शब्दबंबाळतेला पुरता फाटा होता. त्यांच्या चित्रपटांनी भव्यदिव्यतेचा एका उंचीचा मापदंड ठरवून दिला म्हणूनच सोहराब मोदींच्या या चित्रपटाकडे रसिक मोठ्या उत्कंठेने आणि एकाग्रतेने पहात असत. ज्या वेळी बोलपटाचा जन्म झाला नव्हता त्या काळात सोहराब मोदी ‘इंडियन पारशी थिएटर’ द्वारे फुल टाइम रंगभूमीशी निगडीत होते. शेक्सपियर, जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या नाटकांचे प्रयोग करीत.(Sohrab Modi)

१९३७ आणि त्यांनी पहिल्यांदा शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ वर ‘खून का खून’ हा चित्रपट निर्माण केला. त्यांचा ‘पुकार’ हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटातील माइलस्टोन ठरला. मोगल बादशहा जहांगीर या चित्रपटात चंद्रमोहन या देखण्या (भेदक डोळ्याच्या) कलावंताने रंगवला होता सोबतीला नसीम बानू आणि संग्राम सिंहचे भूमिकेत स्वतः सोहराब मोदी (Sohrab Modi) होते. एकीकडे स्वतःच्या कुटुंबावरील प्रेम तर दुसरीकडे न्याय दान यांच्या कात्रीत सापडलेल्या जहांगीर असा संघर्ष मोठ्या भव्यदिव्य कलात्मकतेने पडद्यावर चितारला गेला. (Bollywood masala)
‘सिकंदर’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूरची सुयोग्य निवड त्यांनी केली पोरस च्या स्वाभिमानी भूमिकेत स्वतः मोदी (Sohrab Modi) होते. रंगभूमीप्रमाणेच उदात्त श्रेष्ठ मूल्यांमध्ये संघर्ष चितारण्याचा त्यांना ध्यास होता. काळे आणि गोरे यातील पारंपरिक संघर्ष दाखवण्यापेक्षा उच्च मूल्यातील संघर्ष ते विशिष्ट शैलीनुसार साकारीत. त्यांच्या सर्वच चित्रपटातून त्यांचा हा पैलू दिसून येतो सिकंदरमध्ये पोरसचे आपल्या मातृभूमी विषयीचे प्रेम आणि त्याच्याशी युद्ध करायला आलेल्या अलेक्झांडर या जगज्जेत्या स्वप्न पाहणाऱ्या शूरवीरांचा शत्रू विषयीचा आदर भाव असा उच्च कोटीचा संघर्ष त्यात पाहायला मिळाला.

मिनर्वा मूव्ही टोनचा चित्रपट म्हणजे भव्यतेचा साक्षात्कार हे जणू समीकरण ठरले होते. त्यांच्या ‘झांसी की रानी’ या चित्रपटाने भलेही व्यावसायिक यश मिळवले नसले तरी एक अजोड कलाकृती म्हणून चित्रपटाच्या इतिहासात याचा गौरव होतो. सोहराब मोदी यांनी त्यांच्या बॅनर शिवाय इतर चित्रपटातून देखील अप्रतिम भूमिका केल्या त्यात यहुदी, कुंदन,घर की लाजचा उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यांचे रुपेरी पडद्यावरील एकूणच बुलंद व्यक्तिमत्त्व कर्तृत्वाच्या बाबतीतही बुलंद होते. कलदार रुपया सारखा त्यांचा हुकमी आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या चित्रपटाला अंध प्रेक्षक यायचे!
============
हे देखील वाचा : Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?
============
आयुष्यातील उत्तरार्धात त्यांना १९८० साली दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. ही त्यांच्या चित्रकर्तृत्वाला मिळालेली सर्वोच्य पावती होती. पण दुर्दैवाने त्यांच्या या कर्तृत्वाचा वारसा पुढच्या पिढीला सांभाळता तर आलाच नाही टिकवता देखील आला नाही. २०१५ साली सोहराब मोदी (Sohrab Modi) यांना मिळालेले हे दादासाहेब फाळके पारितोषिक चक्क मुंबईच्या चोर बाजारात विकायला आलेले दिसले. ही (दादासाहेब फाळके पारितोषिक) ट्रॉफी चोरबाजारापर्यंत कसे पोचले यावर त्या काळात मिडीयात भरपूर उलटसुलट चर्चा झाली होती. नशीब सोहराब मोदींचे निधन २८ जानेवारी १९८४ साली झाले होते. नाहीतर एकेकाळी सिंहासारखा वावरलेल्या मोदींना आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहायला लागले असते. (Untold stories)