
Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!
खरंतर आयुष्यात आपण केलेल्या सर्वोत्कृष्ट कामाची पावती मिळेलच याची कुठलीही शाश्वती या दुनियेत नसते. सिनेमाच्या दुनियेत तर अजिबात नसतेच नसते. दिग्दर्शक, कलावंत, संगीतकार, गीतकार आणि इतर सर्वजण आपलं सर्वोत्कृष्ट आपल्या कलाकृतीमध्ये देतच असतात. पण आपल्या कामाची पावती मिळेलच याची खात्री नसते. प्रत्येक वेळी आपल्या कर्तृत्वाचे चीज होईलच असे सांगता येत नाही. कधी कधी तर अनेक वर्षे सातत्याने चांगले काम करून देखील कौतुकाची थाप मिळत नाही. अर्थात हा सर्व नशिबाचा भाग असतो. (Madan Mohan)

संगीतकार मदन मोहन (Madan Mohan) यांना तर याची पदोपदी जाणीव होत होती. १९५० पासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या मदन मोहन यांनी असंख्य सदाबहार श्रवणीय अशा संगीत रचना आपल्या चित्रपटातून दिल्या पण पारितोषिकाची मोहर मात्र त्यांच्यावर कधीच म्हटली नाही. आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा मदन मोहन (Madan Mohan) यांच्या संगीतमय कारकीर्दीकडे बघतो त्या वेळेला त्यांच्या कितीतरी चित्रपटांच्या रचना आज देखील कल्ट क्लासिक म्हणून रसिकांच्या मनात ताज्या असलेल्या दिसतात.
अनपढ, देख कबीरा रोया, अदालत, वह कौन थी, मेरा साया, हसते जख्म… अशा असंख्य चित्रपटांची गाणी आज देखील सिनेमाच्या दुनियेत आवडीने ऐकली जातात. पण ज्या ज्या वेळी पारितोषिकाचा विचार होतो त्यावेळी कायम ते डावलले गेले. त्यामुळे मदन मोहन यांच्यावर सातत्याने अन्याय झाला असेच म्हणता येईल. बऱ्याचदा त्यांच्या चित्रपटांना फिल्म फेअरचे नॉमिनेशन मिळायचे पण ज्यावेळी पुरस्कार मिळण्याची वेळ यायची त्यावेळी मात्र वेगळ्याच चित्रपटांना पुरस्कार मिळायचा. यामुळे मदन मोहन पुरस्कारा बाबत भयंकर नर्व्हस असायचे. अर्थात त्यांच्या या नाराजीचा त्यांच्या संगीतावर अजिबात परिणाम व्हायचा नाही उलट नव्या उत्साहात ते चित्रपटांना संगीत देत असत.

मदन मोहन यांच्या चित्रपटांना यश देखील फारसे मिळत नसे. त्यांना चांगल्या निर्मात्यांचे बॅनर देखील कधी मिळाले नाही. एखादा चांगला हुकमी यशाचा अभिनेता देखील त्यांच्या वाट्याला कधी आला नाही या सर्व नकारात्मक बाजू लक्षात घेतल्या तरी मदन मोहन (Madan Mohan) यांचे संगीत हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं होतं हे मान्यच करायला पाहिजे. आज मदन मोहन म्हटलं की कितीतरी माधुर्याने नटलेल्या रचना कानात गुंजारव करू लागतात.
मेरी याद में तुम न आंसू बहाना (मदहोश), आपकी नजरो ने समझा (अनपढ),कौन आया मेरे मन के द्वारे (देख कबीरा रोया), नयनो में बदरा छाये (मेरा साया),आज सोचा तो आंसू भर आये (हंसते जखम), फिर वही शाम वही गम वही तन्हाई (जहाआरा), दिल धुंडता है फिर वही (मौसम) इतकी मेलडी युक्त गाणी देखील मदनमोहन यांना पुरस्काराचे मानकरी बनवू शकली नाहीत हे कटू सत्य आहे. (Entertainment mix masala)
असं असताना १९७० साली मात्र चमत्कार झाला. संगीतकार मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या एका चित्रपटाला चक्क राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार जाहीर झाला. चित्रपट होता ‘दस्तक’. जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला मदन मोहन (Madan Mohan) यांचा त्यावर विश्वासच बसला नाही. कारण सतत हुलकावणी देणारे यश अचानक समोर आलं तर जशी मनाची अवस्था होते तसेच अवस्था मदन मोहन यांची झाली.

दिग्दर्शक राजेंद्र सिंह बेदी यांचा ‘दस्तक’ हा सिनेमा एक क्लासिक सिनेमा म्हणून आजही ओळखला जातो. कलात्मक चित्रपटाच्या श्रेणीतील एक महत्वाचा सिनेमा समाजाला जातो. या चित्रपटात संजीव कुमार, रेहाना सुलतान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती. मदन मोहन यांनी अतिशय अप्रतिम असं या चित्रपटाला संगीत दिलं होतं. यातील लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘बैय्या ना धरो ओ बलमा’, हम है मता-ए- कुचा बाजार की तरहा, माई रे मै का से कहू पीड अपने जिया से .. ही अभिजात गाणी या चित्रपटाचे यश वाढवणारी होती.
हा चित्रपटाचा पुरस्कार जेव्हा मदन मोहन यांना जाहीर झाला त्यावेळेला मदन मोहन (Madan Mohan) पुरस्कार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारण ते परिस्थितीनुसार इतके गाजले होते की दर वेळी त्यांना वाटायचं पुरस्कार मिळेल पण पुरस्कार हुलकावणी द्यायचा त्यामुळे ते या सर्व प्रकारापासून कोसो दूर गेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी इतकं आधी चांगलं संगीत दिलेला असताना त्यांना कधीही पुरस्कार दिला नाही मग आता हा पुरस्कार घेऊन काय करायचे? म्हणून त्यांनी या पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला.
=============
हे देखील वाचा : Gopaldas Neeraj : “या” निर्मात्याने गीतकाराला गिफ्ट केली स्वतःची कार !
=============
मदन मोहन (Madan Mohan) यांची त्या काळातली मनस्थिती पाहता त्यांचा हा निर्णय योग्य होता असेच वाटले. परंतु नंतर दिग्दर्शक राजेंद्र सिंह बेदी आणि अभिनेता संजीव कुमार यांनी मदन मोहन यांना खूप आग्रह केला आणि चित्रपट पुरस्कार स्वीकारायला ते तयार झाले. या चित्रपटातील भूमिकेसाठी संजीव कुमार आणि रेहान सुलतान यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मदन मोहन संजीव कुमार यांच्या आग्रहा खातर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री नंदिनी सत्पती यांच्या हस्ते हा पुरस्कार मदन मोहन यांनी स्वीकारला! संगीतकार मदनमोहन यांच्या आयुष्यातील हा एकमेव सर्वोच्य पुरस्कार होता!