
Laxman Utekar: छावा निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati sambhaji maharaj) यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिकपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, कर्तृत्व आपणांपासून सगळ्यांना माहित आहेतच पण त्यापलीकडे राजे माणूस म्हणून कसे होते हा वेगळा पैलु देखील दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी चित्रपटातून मांडला आहे. ‘कलाकृती मिडिया’ सोबत विशेष गप्पा मारताना त्यांनी छावा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला… (Chhaava Movie)

‘छावा’ हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट का करावासा वाटला ? असे विचारले असता लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) म्हणाले की, “छावा चित्रपट अखेर अनेक अडचणींचा सामना करुन प्रदर्शित झालाय हे पाहताना खुप भरुन आलं आहे आणि खुपच समाधान वाटतंय. कारण, छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व, त्यांची वीरता, त्यांचा त्याग हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देश आणि जगभरात पोहोचवावा हा उद्देश खरं तर हा चित्रपट साकारतना मी मनात ठेवला होता. शिवाय, महाराष्ट्राबाहेरही जरी छत्रपती संभाजी महाराज ज्यांना माहित होते त्यांना कदाचित त्यांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी माहित होत्या आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज पुसायचे होते आणि त्यासाठीच छावा हा ऐतिहासिकपट मांडत खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यावेळी लोकांनी ‘छावा’ हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना आपले राजे काय होते? त्यांनी किती पराक्रम करुन ठेवला आहे याची खऱ्या अर्थाने त्यांना जाणीव झाली आणि त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंमधून मला किंवा छावाच्या संपूर्ण टीमला त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली आहे”.

छावा या चित्रपटात छत्रपती शंभुराजांची वेगळी बाजू मांडावी असाही विचार मनात आला आणि त्यामुळेच त्यांचे वेगळे पैलु कसे मांडले यावर बोलताना लक्ष्मण (Laxman Utekar) म्हणाले की, “इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात किंवा थोर इतिहासकारांनी लिहून ठेवलेले राजांचे पराक्रम अक्षर रुपात आपण वाचतो पण त्या अक्षरांच्या मागे काय दडलं होतं याचा विचार करत नाही. छत्रपती संभाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे कधी आपल्या डोक्यात आलं नसेल. त्यामुळे मित्र, पती, मुलगा या सगळ्या नात्यातील शंभुराजे कसे होते हे सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न मी छावा मध्ये केला आहे. छत्रपती संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होतं आणि योद्धा, किर्तीमान राजा या पलिकडील राजे मला दाखवायचे होते. शिवाय, पत्नी आणि मैत्रीण हे नातं संभाजी महाराजांनी ज्या महाराणी येसुबाईंमध्ये पाहिली होती ते कसं होतं? त्यांचे विचार एकमेकांशी कसे जुळत होते? त्यांच्या मनातील भावना एकमेकांशी न बोलता त्यांना कशा उमगत होत्या याचा विचार करुन काही प्रसंग मी लिहिले आणि चित्रित केले”.
===========
हे देखील वाचा : Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…
===========
छत्रपती शिवरायांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने मांडण्याच्या प्रयोगाबद्दल बोलताना लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) म्हणाले की, “बरं, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की त्यांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. मग, छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने कसं मांडता येईल याचा विचार करत केवळ त्यांचा आवाज शंभु महाराजांना क्षणोक्षणी ऐकू येतो ही एक निराळी पद्धती छावाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, संभाजी महाराज २ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे आपली आई कशी दिसत असेल हे देखील त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे ते कायम आपल्या आईच्या शोधात कसे असतील हे दाखवण्यासाठी आम्ही बालपणी ते रडत आपल्या आईचा शोध घेत असतात पण त्यांना जरी आईसाहेब भेटल्या नसल्या तरी आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कायम त्यांच्यासोबत आहेत हा विचार वेगळ्या पद्धतीने दाखवला”.

‘छावा’ च्या काही महत्वाच्या प्रसंगांच्या शुटचा भूतकाळ सांगताना उतेकर (Laxman Utekar) म्हणाले की, “‘छावा’ हा चित्रपट माझ्यासह माझ्या टीममधील प्रत्येकासाठी चित्रपट नव्हताच तर तो छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक आदर, त्यांना चित्रपटातून आम्ही केलेलं अभिवादन आणि एक इमॉशनल टच होता. ज्यावेळी आम्ही औरंगजेब संभाजी महाराजांना पकडून आणल्यावर टॉर्चर करत असतो तो सीन शूट करत होतो तेव्हा विकी कौशलला त्या मेकअप आणि प्रोस्थेटिक्समध्ये पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा घळाघळा वाहात होत्या आणि विशेष म्हणजे ज्यावेळी आम्ही पहिल्या दिवशी औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना टॉर्चर करतात त्याचं शूट करत होतो तर ज्या दिवशी आम्ही ते शुट करत होतो तो तोच दिवस होता ज्यादिवशी औरंगजेबाने राजेंना टॉर्चर करण्यास सुरुवात केली होती. खरंच हा एक योगायोग होता पण तो प्रसंग शब्दांत वर्णन करण्यापलिकडे आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग आम्ही ज्यादिवशी शुट केला तो देखील योगायोगाने तो दिवस होता ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता”.

“ज्यावेळी ‘छावा’ हा चित्रपट करायचा निर्णय मी घेतला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) असतील हे पक्क करुनच मी लिखाणाला सुरुवात केली होती. कारण, पर्सनली मला रश्मिकाच्या डोळ्यातील साधेपणा, तिची उंची, तिचा नाजूकपणा इतका भावला होता की महाराणी येसुबाई अशाच असतील असं मी मनात चित्र तयार केलं आणि त्यामुळे येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका असावी हे पुर्णपणे दिग्दर्शकाची (Laxman Utekar) चॉईस होती. शिवाय, चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपली भूमिका जगलाय आणि विकी कौशलबद्दल तर काय भावना व्यक्त कराव्या मला समजतच नाही आहे. एका सीनच्या शुटवेळी त्याला दुखापत झाली होती त्यामुळे आम्ही १ महिना शुट थांबवलं होतं. त्यामुळे मी कायम म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना खरोखरीच महाराज त्याच्या नसानसांत भिनले होते”, असे थेट उत्तर विकी-रश्मिकाच्या निवडीबद्दल देताना लक्ष्मण उतेकर यांनी दिले. (Untold stories)
-रसिका शिंदे-पॉल