
Naqsh Lyallpuri : चौपाटीवरील गोंगाटात लिहिली ही अप्रतिम गजल!
काही गीतांच्या जन्म कहाण्या थक्क करणाऱ्या असतात. गीतकार नक्श लायलपुरी (Naqsh Lyallpuri) यांनी लिहिलेली ही गजल आज पन्नास वर्षानंतर देखील त्यातील शब्द सौंदर्याने रसिकांना खेचून घेते. पण इतकी शब्द वैभव असणारी गजल त्यांनी अवघ्या काही तासात आणि मुंबई चौपाटी वरील गोंगाटात लिहिली होती.
अत्यंत प्रतिभावान गुणी असूनही यशाने ज्याला कायमची हुलकावणी दिली तो संगीतकार म्हणजे मदन मोहन (Madan Mohan)! लता मंगेशकर, तलत महमूद यांच्या स्वरांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतातून व्हायचा. गजल हा त्याचा खास प्रांत. लताच्या स्वरातील कितीतरी अप्रतिम गजलांनी हिंदी सिनेमातील संगीताचे दालन समृध्द झाले आहे त्यातील बव्हंशी गजल मदनने स्वरबध्द केलेल्या आहेत. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर मदन मोहन गेले. (Untold stories)

पण या काळातील त्यांचे संगीत असलेले दस्तक, हिररांझा, चिराग, बावर्ची, हसते जख्म, हिंदुस्तान की कसम, मौसम आणि लैला मजनू हे सिनेमे आजही केवळ त्याच्या संगीतासाठी आठवले जातात. याच दशकात त्याचा एक चित्रपट १९७४ साली आला होता ’दिल की राहे’. आज या सिनेमाची कुणाला आठवण असण्याची सुतराम शक्यता नाही. रेहाना सुलतान आणि राकेश पांडे ही या सिनेमाची पेयर होती.
यातील लताने गायलेल्या एका गीताच्या निर्मितीची ही कहाणी. मदन मोहन यांनी या सिनेमातील सिच्युएशनवर आधारीत एक धुन गीतकार नक्श लायलपुरी यांना दिली व उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत त्यावर शब्द लिहून आणायला सांगितले. कारण त्याच्या दुसर्या दिवशी लताची तारीख घेवून ध्वनीमुद्रणाची वेळ निश्चित झाली होती. ठरल्याप्रमाणे नक्श (Naqsh Lyallpuri) साहेबांनी गाणे बनवले आणि ते पेडर रोडवरील मकनीमनोर या मदनच्या निवासस्थानी पोचले. मदनला गीत आवडले पण तिथे त्या सिनेमाचे निर्माते (सुल्तान एच. दुर्रानी व एस. कौसर) होते. त्यांनी मदनला या प्रसंगात गीता ऐवजी गजल असणे जास्त प्रभावी राहिल असे सांगितले. (Entertainment mix masala)

मदन मोहन यांनी लगेच नक्शला निर्मात्यांची नवीन डिमांड सांगितली आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्याच धुनवर गजल लिहायला सांगितली ! नक्श लायलपुरी (Naqsh Lyallpuri) त्या काळात मुलुंडला राहत असत. घरी जावून पुन्हा इकडे येण्या ऐवजी त्यांनी सरळ चौपाटी गाठली. रविवारची दुपार असल्याने चौपाटीवर गर्दी होती. त्या गोंधळात ते मन एकाग्र करून लिहायला बसले. त्यांना आता त्यांनीच काही तासापूर्वी लिहिलेल्या गीताच्या जागी आता गजल लिहायची होती. वेळ कमी होता. जवाबदारी मोठी होती. ध्वनीमुद्रणाची वेळ काही तासांवर आली होती. काय करावे? आजूबाजूला गर्दीचा कोलाहल वाढत होता. या गोंगाटात एक शायर शब्दांची जुळावाजुळव करीत होता. वेळ निभावून न्यायची होतीच पण कशी? डोक्यात विचारांचे काहूर मजले होते.

प्रतिभावान व्यक्तीचा मेंदू कसोटीच्या काळात दुप्पट वेगाने काम करत असतो. त्याचा इथे प्रत्यय आला. हाती आलेली संधी गमावून चालणार नव्हते. ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे…’ अचानक शब्द ओठावर आले. अरेच्या हेच तर आपल्याला हवे होते ! मग लेखणी भरभर चालू लागली व तासाभरात गजल तयारसुध्दा झाली. मग उत्साहात ते मदन मोहन यांच्या घरी पोचले. अक्षरश: दहाव्या मिनिटाला चाल तयार झाली. दुसर्या दिवशी Lata Mangeshkar च्या स्वरात ही गजल रेकॉर्ड झाली. या गजलमध्ये रईस खान यांनी अतिशय अप्रतिम अशी सतार वाजवली आहे. (हे रईस खान म्हणजे प्रख्यात सतार वादक विलायत खान यांचे पुतणे.) मदन मोहनचे नेहमीचे आवडते गीतकार राजा मेहंदी अली खान, राजेंद्र कृष्ण नसताना नक्श (Naqsh Lyallpuri) साहेबांवर मदन मोहनने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला.
=============
हे देखील वाचा : Raj kapoor मध्यरात्री दोन वाजता गीतकार शैलेंद्र यांच्या घरी का पोहोचले?
=============
’लैला मजनू’ करीता मदन मोहन यांना त्यांचीच गाणी हवी होती पण निर्मात्याच्या आग्रहाने नक्शचा पत्ता कट झाला. आज ‘दिल कि राहे‘ हा चित्रपट कुणाला आठवतही नाही पण मधुवंती रागातील ’रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ ही रचना आज ही मनाला स्पर्शून जाते!