
Crazxy Movie Review : सोहम शहाचा ‘क्रेजी’ आहे तरी कसा?
आपण बऱ्याचवेळा एखाद्या माणसाला ‘तु किती मल्टिटास्किंग आहेस?’ असं म्हणतो. किंवा प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बॅलेन्स करता येत नाही असंही कित्येकवेळा बोलून जातो. पण हे सगळं करत असताना त्या व्यक्तीची मानसिकता नेमकी काय असते? याचा कधी विचार करतो का? साहजिकच आहे उत्तर नाही असेल. याच विषयाला एका महत्वाच्या विषयाशी आणि नात्याशी जोडून एक अप्रतिम सादरीकरण ‘Crazxy’या चित्रपटात करण्यात आलंय. ‘तुंबाड’ फेम Sohum Shah या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. जाणून घेऊयात ‘क्रेजी’ चित्रपट आहे तरी कसा? (Crazxy Review)
तर, Crazxy चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची झाली तर डॉ. सूद (सोहम शहा) हा पेशाने डॉक्टर to be very specific सर्जन आहे. एका मोठ्या अडचणीत सापडल्यामुळे त्याला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बदल्यात ५ कोटी रुपये एकाला द्यायचे असतात. एकीकडे तो स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला एका माणसाचा फोन येतो आणि तो सांगतो की तुझ्या मुलीला मी किडनॅप केलंय आणि तिला सोडवायचं असेल तर ५ कोटी रुपये घेऊन ये. चित्रपटाच्या सुरुवातीला ‘एप्रिल फुल बनाया’ हे गाणं FM वर ऐकू येतं त्यामुळे साहजिकच कुणीतरी प्रॅंक करतंय असचं सूदला वाटतं. पण किडनॅपरचा वारंवार येणारा फोन हे प्रकरण गंभीर आणि प्रॅंक नसल्याचं सिद्ध करतं. बरं सूद याची मुलगी नॉर्मल नसून तिला Down Syndrome हा आजार असतो. त्यामुळे जवळ असलेल्या ५ कोटी रुपयांमध्ये तो स्वत:चा की मुलीचा जीव वाचवणार? हे पाहण्यासाठी नक्कीच चित्रपट पाहा… (Movie Review)
============
हे देखील वाचा : Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
============
कथा ऐकून कदाचित तुम्ही विचार केला असेल किंवा तुम्ही म्हणाल की स्वाभाविक आहे वडिल असल्यामुळे तो आपल्या मुलीचा आणि त्यातही ती स्पेशल चाईल्ड असल्यामुळे तिचाच जीव वाचवणार. पण जन्मतः आपल्या मुलाला आलेलं व्यंगत्व स्वीकारू न शकल्यामुळे डॉ. सूद यांनी कधीच तिला आपली मुलगी मानलं नाही. परिणामी त्यांच्यात बाप आणि मुलीचं नातंच कधी निर्माण झालं नाही. पण आपली मुलगी किडनॅप झालीये हे ऐकल्यावर बापाचं मन हेलावणारच. यावेळी पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातील घटना तो कसा हाताळतो हे पाहण्यासारखं आहे. सुरुवातीलाच मी असं म्हटलं की एखाद्याला Multitasking आहेस असं म्हणणं सोप्पं असतं. ’क्रेजी’ या चित्रपटात अडचणीत असताना एका माणसाची मानसिकता नेमकी काय असते? पेशाने डॉक्टर असल्यामुळे आपल्या कामाप्रती आपलं डेडिकेशन काय असतं? याचं चित्रपटात अगदी उत्तम पद्धतीने सादरीकरण करण्यात आलं आहे असं नक्कीच म्हणावसं वाटतं. (Entertainment update)

क्रेजी चित्रपटाची सुरुवात जरा संथपणे होते. अगदी मध्यांतरापर्यंत चित्रपटाचं नेमकं कथानक किंवा काय म्हणायचं आहे हे कळत नाही. पण जशी कथा वेगाने पुढे जाते तसं चित्रपटाच्या नावानुसार प्रेक्षकांना Crazxy व्हायला होतं. हिंदी किंवा मराठी चित्रपट पाहताना सुरुवातीलाच कथा काय असेल? किंवा शेवट काय होऊ शकेल याचा मध्यांतरापूर्वी अंदाज बांधता येतो. पण दाक्षिणात्य चित्रपट जरा तुम्ही पाहिले तर त्यांची सुरुवात फारच Random पद्धतीने होते. मात्र, कथानक जसं पुढे सरकतं तसं प्रेक्षकांची एकाग्रता गुंतवून ठेवून चित्रपटाच्या शेवटी त्यांचे सगळेच अंदाज फेल कसे ठरतील याची खबरदारी दिग्दर्शक आणि लेखक विशेष घेतात. ‘क्रेजी’ या चित्रपटाच्या बाबतीत अगदी असंच झालं आहे. (Bollywood movie masala)
============
हे देखील वाचा :Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
============
Crazxy या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि लेखक यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं कारण त्यांनी संपूर्ण चित्रपटात केवळ मुख्य अभिनेत्यावरच फोकस केला आहे आणि इतर कलाकार केवळ आवाजाने आपल्याला दाखवले आहेत. खरं तर सोहम शहाचा चित्रपट म्हटलं की नवा प्रयोग असणारच हे आता समीकरण जुळलं आहे. शिवाय Down Syndrome या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आणि जी मुलं या आजाराशी झुंज देत आहेत नेमकी त्यांची मानसिकता काय असते आणि त्यांना आपल्या पालकांना काय सांगायचं आहे हे त्यांचं म्हणणं हा चित्रपट अधोरेखित करतो. (Crazxy Movie Review)

सध्या प्रेक्षकांना अॅक्शन, रोमॅंटिक कॉमेडी किंवा थ्रिलर चित्रपट पाहायला खूप आवडतात. पण हाणामारीच्या किंवा विनोदीपटांच्या लाटेत क्रेजी सारखे चित्रपट जे समाजातील अतिशय महत्वाच्या घटकाबद्दल भाष्य करतात ते चित्रपट पडद्यामागे जातात. मनोरंजनात्मक चित्रपट निर्माण झालेच पाहिजे कारण प्रेक्षक मनोरंजन व्हावं यासाठी चित्रपट पाहायला येतात. पण त्यासोबतच समाजातील काही समस्या किंवा अशा व्यक्ती ज्यांना आपल्या वेदना मांडता येत नाहीत त्यांच्याबद्दल एखाद्या चित्रपटातून भाष्य केलं जात असेल तर ते देखील पाहिलं गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे गिरीश कोहली दिग्दर्शित आणि लिखीत ’क्रेजी’ हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत एकदातरी चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा.
‘कलाकृती मीडिया’ क्रेजी या चित्रपटाला देत आहे 3 स्टार!
रसिका शिंदे-पॉल