
Saraswati Devi : कोणत्या संगीतकार महिलेला आपले नाव बदलून संगीत द्यावे लागले?
हिंदी सिनेमाच्या संगीत नियोजनामध्ये महिला संगीतकारांचा सहभाग हा खूप कमी आहे. संगीतकार उषा खन्ना यांचा एकमेव अपवाद वगळला तर महिला संगीतकाराला फार मोठी इनिंग इथे खेळता आली नाही हे कटू सत्य आहे. भारतातील पहिली महिला संगीतकार कोण यावर चित्रपट अभ्यासामध्ये काहीशी मत भिन्नता आहे. परंतु जद्दनबाई आणि खुर्शिद या दोघींची नावे प्रामुख्याने घेतले जातात. जद्दनबाई ह्या अभिनेत्री नर्गिस हिच्या मातोश्री. त्यांनी काही चित्रपटांना संगीत दिले. पण खुर्शिद यांनी मात्र बॉम्बे टॉकीजच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आणि नुसते संगीत दिले नाही तर लोकप्रिय संगीत दिले.(Saraswati Devi)
त्या काळात त्यांच्या संगीताची जादू सर्वत्र पसरली होती. पण गंमत म्हणजे या खुर्शिद यांना आपलं नाव चित्रपट संगीत देताना बदलावं लागलं होतं! त्यांचे बदललेले नाव काय होते, हे नाव कोणी बदलले आणि मुख्य म्हणजे त्यांना नांव का बदलावे लागले मोठा इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.

खुर्शिद वाडिया (Khurshid) ही पारशी महिला संगीतकार जेव्हा चित्रपटाच्या दुनियेत आली तेव्हा तिचे वय अवघे २५ होते. पारशी समाजातून सिनेमात आलेली ती पहिलीच महिला होती. हे पारशी समाजाला फारसं आवडलं नाही. त्यांनी खुर्शिद यांना विरोध करायला सुरुवात केली. खुर्शिदला मात्र संगीतकार व्हायचंच होतं. पारशी समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढत होता. तिच्या घरावर सामाजिक बहिष्कार टाकणे, तिच्या पोस्टरला काळे फासणे असले प्रकार सुरू झाले होते. पण खुर्शिद मागे हटायला तयार नव्हती. त्यामुळे पारशी समाजातील सनातन्यांची चिडचिड होत होती.
एकदा बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशु रॉय यांच्यासोबत खुर्शिद त्यांच्या कारमधून फिल्मीस्तान स्टुडीओमध्ये चालली होती. ही खबर पारशी समाजातील तिच्या विरोधकांना लागली. त्यामुळे पारशी समाजातील हे लोक फिल्मिस्तानच्या दारावर खुर्शिदला जाब विचारण्यासाठी उभे राहिले. हे लोक खूप प्रक्षुब्ध झाले होते. आपल्या समाजातील एक मुलगी चित्रपटात येते आपला प्रखर विरोध असूनही माघार घेत नाही हे त्यांच्या पुरुषी मानसिकतेच्या पचनी पडत नव्हते. लोक प्रचंड चिडले होते. मोठा बाका प्रसंग होता. हिमांशु रॉय यांनी दुरूनच प्रक्षुब्ध जमावाला पाहिले. त्यांनी ताबडतोब खुर्शिदला डोक्यावरून संपूर्ण चेहऱ्यावर पदर घ्यायला सांगितले; जेणेकरून तिचा चेहरा कुणालाही दिसता कामा नये. गाडी जेव्हा फिल्मीस्तानच्या पोर्चमध्ये आली तेव्हा गाडीच्या भोवती सर्व लोक जमा झाले आणि जोर जोरात घोषणा देऊ लागले आणि खुर्शिदला आमच्या हवाली करा असे ओरडून सांगू लागले. (Saraswati Devi)

हिमांशु राय यांनी बाका प्रसंग ओळखला आणि त्यांनी जोरात दार उघडले आणि चिडून ते लोकांना म्हणाले, ”काय खुर्शिद खुर्शिद असे ओरडता? ही काही खुर्शिद (Khurshid) नाहीये. ही माझी पत्नी देविकारानी आहे!” हिमांशु रॉय यांचा चिडलेला अवतार पाहून लोक थोडेसे मागे हटले. रॉय यांनी खुर्शिद हात धरून, चेहऱ्यावर घुंगट घेतलेल्या अवस्थेत तिला तसेच तरातरा घेऊन गेले. त्या जमावातील लोकांनाही वाटले की ही रॉय यांची पत्नी देवीकारानीच आहे. लोक तिथून निघून गेले. पण खुर्शिद आणि हिमांशु रॉय यांनी ठरवले की यापुढे खुर्शिद हे नाव वापरणे चुकीचे आहे. तिला संगीतकार बनायचे होते त्यामुळे त्यांनी नाव बदलले आणि तिचे नाव ठेवले सरस्वती देवी (Saraswati Devi) ! या नावाने तिने बॉम्बे टॉकीजच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आणि सर्व गाणी लोकप्रिय झाली.
=============
हे देखील वाचा : Pyar ka mausam : तुम बिन जाऊं कहां के दुनिया में आके…
=============
अशोक कुमार यांना नायक म्हणून प्रस्थापित होण्यासाठी सरस्वती देवी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी खूप महत्वपूर्ण ठरली. चाळीसच्या दशकांमधली सरस्वती देवी (Saraswati Devi) ही आघाडीची संगीतकार होती. हिमांशु रॉय यांनी तिचे नाव बदलले आणि तिला संगीतामध्ये चांगले करिअर करता आले. मै बन कि चिडिया बन के बन बन बोलू रे (अछुत कन्या), न जाने किधर मेरी नाव चली रे (झूला), आज मौसम सलोना सलोना रे (झुला) ही त्यांनी स्वरबध्द केलेली गाणी अफाट गाजली. १९३५ ते १९४९ या काळात त्यानी ३० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. महिला संगीतकार म्हणून त्यांचे योगदान नक्कीच महत्वपूर्ण आहे. ९ ऑगस्ट १९८० रोजी त्यांचे निधन झाले. (Untold stories)